Revised Common Lectionary (Semicontinuous)
13 परमेश्वरा, तू माझे संपूर्ण शरीर निर्माण केलेस
मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हाच तुला माझ्याबद्दल सर्वकाही माहीत होते.
14 परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो.
तू मला अद्भुत आणि अतिशय सुंदररीतीने निर्मिलेस
तू जे केलेस ते खूपच अद्भुत आहे हे मला चांगलेच माहीत आहे.
15 तुला माझ्याबद्दल सारे माहीत आहे
माझे शरीर आईच्या गर्भात लपून आकार घेत होते तेव्हा तू माझी हाडे वाढत असताना पाहिलीस.
16 माझे अवयव वाढत असताना तू पाहिलेस तू तुझ्या पुस्तकात त्यांची यादी केलीस.
तू माझी रोज पाहणी केलीस.
त्यातला एकही अवयव हरवलेला नाही.
17 तुझे विचार मला महत्वाचे आहेत,
देवा तुला खूप माहिती आहे.
18 मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल.
आणि जेव्हा माझी झोप संपेल तेव्हा मी तुझ्याजवळच असेन.
3 याकोबाचा भाऊ एसाव सेइर नावाच्या देशात राहात होता. हा देश म्हणजे अदोमाचा डोंगराळ प्रांत होता. याकोबाने एसावाकडे निरोपे पाठवले. 4 त्याने त्यांना सांगितले “तुम्ही या सर्व गोष्टी माझे स्वामी एसाव त्यांना सांगा, ‘आपला सेवक याकोब असे म्हणतो की आजपर्यंत अनेक वर्षे मी लाबानाकडे राहिलो; 5 माझ्यापाशी पुष्कळ गाईगुरे, गाढवे, शेरडामेंढराचे कळप आणि दास व दासी आहेत. महराज, आपण आमचा स्वीकार करावा अशी विंनती करण्यासाठी मी आपणाकडे हा निरोप पाठवीत आहे.’”
6 निरोपे याकोबाकडे मागे आले आणि म्हणाले, “आम्ही आपला भाऊ एसाव याजकडे गेलो व त्यांस भेटलो तो आपणाला भेटावयास येत आहे; त्याच्या बरोबर चारशे माणसे आहेत.”
7 त्या निरोपामुळे याकोब घाबरला. आपल्या जवळच्या लोकांच्या त्याने दोन टोळ्या केल्या. तसेच शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि उंट गाढवे यांच्याही त्याने दोन टोळ्या केल्या. 8 त्याने विचार केला, “जर एसाव आला व त्याने एका टोळीचा नाश केला तर दुसरी टोळी पळून जाईल व वाचवली जाईल.”
9 याकोब म्हणाला, “माझे वडील अब्राहाम, इसहाक यांच्या देवा! परमेश्वरा! तू मला माझ्या देशात व माझ्या कुटुंबात परत येण्यास सांगितलेस; तसेच तू माझे कल्याण करशील असेही तू म्हणालास. 10 तू माझ्यावर दया केली आहेस आणि माझ्या करिता अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेस हे मी जाणतो. मी पहिल्याच वेळी यार्देन नदी उतरुन प्रवास केला तेव्हा माझ्याजवळ एका काठी शिवाय माझ्या मालकीचे काहीही नव्हते; परंतु आता माझ्या मालकीच्या, भरपूर वस्तूंच्या व माणसांच्या पूर्ण दोन टोळ्या आहेत. 11 मी तुझी प्रार्थना करतो की कृपाकरुन तू माझा भाऊ एसाव याच्यापासून मला वाचव; मला त्याची भीती वाटते, की तो येऊन आम्हा सर्वांस ठार मारील; मुलांच्या मातांनाही लेंकरासकट तो मारुन टाकील. 12 परमेश्वरा! तू मला वचन दिलेस, ‘मी तुझे भले करीन; मी तुझी संतनी वाढवीन आणि ती समुद्राच्या वाळू इतकी करीन; त्याची गणती करता येणार नाही एवढी ती करीन.’”
13 त्या रात्री याकोब त्या ठिकाणी राहिला. त्याने एसावाला देणगी म्हणून देण्यासाठी काही गोष्टींची भेट तयार केली. 14 त्याने दोनशे शेळ्या व वीस बोकड, दोनशें मेंढ्या व वीस एडके, 15 तसेच तीस साडणी व त्यांची बछडी, चाळीस गाई व दहा खोंड, वीस गाढवी व दहा गाढवे घेतली व एवढ्यांचे वेगवेगळे कळप केले. 16 त्याने प्रत्येक कळप एकेका नोकराच्या ताब्यात दिला; मग तो नोकरांना म्हणाला, “प्रत्येक कळप वेगळा करा आणि कळपाकळपात थोडे अंतर ठेवून माझ्यापुढे चाला.” 17 याकोबाने चाकरांना आज्ञा दिल्या; जनावरांच्या पहिल्याच टोळीच्या चाकराला तो म्हणाला, “जेव्हा माझा भाऊ एसाव तुझ्याकडे येईल व विचारील, ‘ही कोणाची जनावरे आहेत? तू कोठे चाललास? तू कोणाचा नोकर आहेस?’ 18 तेव्हा तू त्याला असे उत्तर दे, ‘ही जनावरे आपला सेवक याकोब याच्या मालकीची आहेत. याकोबाने ही स्वामी आपल्याला भेट म्हणून पाठवली आहेत आणि याकोब आमच्या पाठोपाठ येत आहे.’”
19 याकोबाने दुसऱ्या तिसऱ्या आणि इतर सर्व चाकरांना अशीच आज्ञा करुन अशाच प्रकारे उत्तर देण्यास सांगितले. तो म्हणाला, “तुम्हाला जेव्हा एसाव भेटेल तेव्हा तुम्ही असेच करावे. 20 तुम्ही म्हणावे, ‘ही आपणाकरिता भेट आहे आणि आपला दास याकोब आमच्या मागून येत आहे.’”
याकोबाने विचार केला, “जर मी ही माणसे भेटीसह पुढे पाठवली तर कदाचित एसाव मला क्षमा करील व माझा स्वीकार करील.” 21 म्हणून त्याप्रमाणे याकोबाने भेट पुढे पाठवली परंतु तो त्या रात्री तळावरच मागे राहिला.
12 याचा अर्थ असा की, देवाच्या पवित्र लोकांनी धीर धरला पाहिजे. त्यांनी देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. आणि येशूमधील त्यांचा विश्वास टिकवला पाहिजे.
13 मग मी स्वर्गातून एक आवाज ऐकला, तो आवाज म्हणाला, “हे लिही: येथून पुढे, जे प्रभूमध्ये मेलेले आहेत, ते त्यांच्या श्रमापासून विश्रांति घेतील.”
आत्मा म्हणतो, “होय, हे खरे आहे. ते लोक आपल्या कठीण कामापासून विश्रांति पावतील. त्यांनी केलेल्या गोष्टी त्यांच्याबरोबर राहतील.”
पूथ्वीची कापणी
14 मी पाहिले आणि तेथे माझ्यासमोर पांढरा ढग होता. त्या ढगावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा दिसत होता. त्याच्या डोक्यावर सोनेरी मुगुट आणि त्याच्या हातात धारदार विळा होता. 15 मग आणखी एक देवदूत मंदिरामधून बाहेर आला व ढगावर बसलेल्यास मोठ्याने म्हणाला, “तुझा विळा घे व (पृथ्वीवरुन) पीक गोळा कर, कापणीची वेळ आली आहे, पृथ्वीचे फळ पिकले आहे.” 16 मग जो ढगावर बसला होता त्याने त्याचा विळा पृथ्वीवर चालविला. आणि पृथ्वीची कापणी केली.
17 मग दुसरा देवदूत स्वर्गातील मंदिरातून बाहेर आला. या देवदूताकडेसुद्धा धारदार विळा होता. 18 मग आणखी एक देवदूत वेदीकडून आला. या देवदूताचा अग्नीवर अधिकार होता. या देवदूताने धारदार विळा असलेल्या देवदूताला बोलाविले. तो म्हणाला, “तुझा धारदार विळा घे आणि पृथ्वीवरील द्राक्षाचे घड काढ. पृथ्वीची द्राक्षे पिकली आहेत.” 19 देवदूताने त्याचा विळा पृथ्वीवर चालवला. देवदूताने पृथ्वीची द्राक्षे गोळा केली आणि देवाच्या क्रोधाच्या घाण्यात टाकली. 20 ती द्राक्षे द्राक्षाच्या कुंडात शहराबाहेर तुडवीली गेली. त्यांतून रक्त वाहिले. त्याचा प्रवाह घोड्याच्या डोक्यापर्यंत पोहोंचेल इतका असून तो 200 मैलांपर्यंत वाहत गेला.
2006 by World Bible Translation Center