Revised Common Lectionary (Semicontinuous)
परमेश्वराचे निवासस्थान-बेथेल
10 याकोबाने बैर-शेबा सोडले व तो हारानाला गेला; 11 प्रवास करताना सूर्य मावळला म्हणून त्याने एके जागी रात्रीं मुक्काम केला; तेथे रात्रीं झोंपताना त्याला एक धोंडा दिसला तो उशास घेऊन तो रात्रीं तेथेच झोंपला; 12 तेव्हा त्याला एक स्वप्न पडले; स्वप्नात एक उंच शिडी आहे, तिचे एक टोक जमिनीवर व दुसरे टोक वर स्वर्गापर्यंत पाहोचलेले आहे असे त्याने पाहिले; 13 याकोबाने पाहिले की देवदूत शिडीवर चढत व उतरत आहेत. शिडीवरती परमेश्वर उभा असल्याचे त्याला दिसले; परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझे आजोबा अब्राहाम व तुझे वडील इसहाक यांचा मी परमेश्वर व देव आहे; तू ज्या भूमिवर झोंपला आहेस ती भूमि म्हणजे तो देश मी तुला व तुझ्या वंशजांना देईन 14 तसेच मी तुला भरपूर वंशज देईन; तुझे वंशज पृथ्वीवरील मातीच्या कणाइतके अगणित होतील; ते उत्तर व दक्षिण, पूर्व व पश्चिम या दिशांकडील देशात पसरतील; तुझ्यामुळे व तुझ्या वंशजांमुळे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील.
15 “मी सतत तुझ्याबरोबर आहे आणि तू ज्या ज्या ठिकाणी जाशील त्या प्रत्येक ठिकाणी मी तुझे रक्षण करीन आणी तुला या देशात परत आणीन; मी हे माझे वचन पूर्ण करीपर्यंत तुला अंतर देणार नाही.”
16 मग याकोब झोपेतून जागा झाला व म्हणाला, “खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे हे मला समजले आहे; परंतु झोंपून उठेपर्यंत ते मला कळले नाही.”
17 याकोबाला भीती वाटली, तो म्हणाला, “हे फार महान ठिकाण आहे, हे देवाचे निवासस्थान, त्याचे घर व स्वर्गाचे दार आहे.”
18 याकोब पहाटे लवकर उठला; त्याने उशास घेतलेला धोंडा एका टोकावर उभा करुन जमिनीत रोवला; मग त्याने त्यावर तेल ओतले. अशा प्रकारे त्याने त्या धोंड्याचे देवाचे स्मारक केले. 19 त्या ठिकाणाचे नाव लूज होते परंतु याकोबाने त्याचे नाव बेथेल ठेवले.
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तुतिगीत.
139 परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस
तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे.
2 मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते
तुला माहीत आहे तुला माझे विचार खूप दुरुनही कळतात.
3 परमेश्वरा, मी कुठे जातो आणि केव्हा झोपतो ते तुला कळते.
मी जे जे करतो ते सर्व तुला माहीत आहे.
4 परमेश्वरा, मला काय म्हणायचे आहे
ते तुला माझे शब्द तोंडातून बाहेर पडायच्या आधीच कळते.
5 परमेश्वरा, तू माझ्या सभोवताली आहेस.
माझ्या पुढे आणि माझ्या मागे आहेस तू तुझा हात हळूवारपणे माझ्यावर ठेवतोस.
6 तुला जे सर्वकाही माहीत आहे
त्याचे मला आश्र्चर्य वाटते ते समजून घेणे मला खूप कठीण वाटते.
7 मी जिथे जातो तिथे तिथे तुझा आत्मा असतो.
परमेश्वरा, माझी तुझ्यापासून सुटका नाही.
8 परमेश्वरा, मी जर स्वर्गात गेलो तर तिथे
तू असतोस मी जर खाली मृत्यूलोकात गेलो तर तिथे ही तू असतोस.
9 परमेश्वरा, मी जर पूर्वेकडे, जिथे सूर्य उगवतो तिथे गेलो तर तिथे ही तू असतोस.
मी जर पश्चिमेकडे समुद्रावर गेलोतर तिथे ही तू असतोस.
10 तिथेही तुझा उजवा हात मला धरतो.
आणि तू मला हाताने धरुन नेतोस.
11 परमेश्वरा, कदाचित् मी तुझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करीन आणि म्हणेन,
“दिवस रात्रीत बदलला आहे आणि आता काळोख मला खरोखरच लपवेल.”
12 पण परमेश्वरा, काळोख देखील तुझ्यासाठी पुरेसा दाट नाही
तुझ्यासाठी रात्र दिवसासारखीच प्रकाशमय आहे.
23 परमेश्वरा, माझ्याकडे बघ आणि
माझे मन जाण माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे.
24 माझ्या मनात काही दुष्ट विचार आहेत का ते बघ
आणि मला “सनातन मार्गाचा” रस्ता दाखव.
12 तर मग बंधूनो, आम्ही कर्जदार आहोत, देहाप्रमाणे जगण्यास देहाचे नव्हे. 13 कारण जर तुम्ही तुमच्या पापी देहस्वभावाप्रमाणे जीवन जगाल तर तुम्ही मरणार आहात, परंतु आत्म्याच्या करवी जर तुम्ही देहाची कर्मे ठार माराल तर तुम्ही जगाल.
14 कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवितो, तितके देवाची मुले आहेत. 15 पुन्हा भीति वाटू नये म्हणून तुम्हांला गुलामगिरीचा आत्मा मिळाला नाही, तर तुम्हांला दतकपणाचा आत्मा मिळाला आहे. त्याच्यायोगे आम्ही “अब्बा, बापा” अशी हाक मारतो. 16 तो आत्मा स्वतः आपल्याबरोबर दुजोरा देतो की, आपण देवाची मुले आहोत. 17 आपण जर देवाची मुले आहोत तर आम्ही वारसही आहोत आणि ख्रिस्ताबरोबर वारस आहोत. खरोखर आपण त्याच्याबरोबर दु:ख भोगतो यासाठी की, त्याच्याबरोबर आपणांस गौरवही मिळावे.
भविष्यात आम्हांला गौरव मिळेल
18 कारण भविष्यकाळात आपल्याला प्रगट करण्यात येणाऱ्या गौरवाच्या तुलनेने सध्याच्या काळातील दु:खे काहीच नाहीत असे मी मानतो. 19 कारण निर्माण केलेले जग पुत्राच्या प्रगट होण्याच्या काळाची वाट पाहत आहे. 20 निर्माण केलेले जग सर्व स्वाधीन होते ते इच्छेने नव्हे तर देवाने ते अधीन ठेवले होते म्हणून, 21 या आशेने की, निर्माण केलेले जग त्याच्या अशुद्धतेच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे, व देवाच्या मुलांचे वैभवी गौरव त्याने उपभोगावे.
22 कारण आपल्याला माहीत आहे की, आजपर्यंत, निर्माण केलेले संपूर्ण जग कण्हत, वेदना भोगीत आहे. 23 परंतु निर्माण केलेले जगच नव्हे तर आपणांस ज्यांना आत्म्याचे प्रथम फळही मिळाले आहे ते, आपणही संपूर्ण दत्तकपणासाठी आपल्या शरीराच्या नाशवंत, मर्त्य स्वभावापासून मुक्ती व्हावी म्हणून आतल्याआत कण्हत आहोत. 24 आपण आपल्या मनातील या आशेने तारले गेलो आहोत. परंतु आपण ज्याची आशा धरली ते पाहू शकलो तर ही आशा नसेल. कारण जे पाहतो त्याची आशा कोण धरील? 25 परंतु जर आपण जे पाहत नाही त्याची आशा धरतो तर आपण धीराने त्याची वाट पाहतो.
गहू आणि निदण यांची बोधकथा
24 नंतर येशूने त्यांना दुसरी बोधकथा सांगितली. तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य हे एखाद्या मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरण्यासारखे आहे. 25 पण लोक झोपेत असता त्या मनुष्याचा शत्रू आला व गव्हामध्ये निदण पेरून गेला. 26 पण जेव्हा रोपे वाढली व दाणे आले तेव्हा निदणही दिसू लागले. 27 मग त्या माणसाचे नोकर त्याच्याकडे आले व म्हणाले, मालक आपण आपल्या शेतात चांगले बी पेरले ना? मग त्यात निदण कोठून आले?
28 “तो त्यांना म्हणाला, ‘कोणीतरी शत्रूने हे केले आहे.’
“त्याच्या नोकरांनी विचारले, ‘आम्ही जाऊन ते उपटून टाकावे अशी आपली इच्छा आहे काय?’
29 “पण तो मनुष्य म्हणाला, ‘नको तुम्ही निदण जमा करीत असताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. 30 कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की पहिल्याने निदण जमा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा. पण गहू माझ्या गोदामात साठवा.’”
येशू बोधकथा समजावून सांगतो
36 मग येशू लोकांना सोडून घरात गेला. त्याच्याकडे त्याचे शिष्य आले आणि म्हणाले, “शेतातील निदणाची बोधकथा आम्हांला नीट समजावून सांगा.”
37 येशूने उत्तर दिले, “शेतामध्ये चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. 38 आणि शेत हे जग आहे. चांगले बी हे देवाच्या राज्यातील मुले आहेत आणि निदण हे दुष्टाचे (सैतानाचे) मुलगे आहेत. 39 हे निदण पेरणारा शत्रू हा सैतान आहे आणि कापणी या काळाची समाप्ति आहे व कापणी करणारे देवदूत आहेत.
40 “म्हणून जसे निदण गोळा करून अग्नीत टाकतात त्याप्रमाणे या काळाच्या शेवटी होईल. 41 मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील आणि ते त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व गोष्टी आणि अन्याय करणारे यांना बाजूला काढतील. 42 आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दात खाणे चालेल. 43 तेव्हा नीतिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐका.
2006 by World Bible Translation Center