Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तुतिगीत.
139 परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस
तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे.
2 मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते
तुला माहीत आहे तुला माझे विचार खूप दुरुनही कळतात.
3 परमेश्वरा, मी कुठे जातो आणि केव्हा झोपतो ते तुला कळते.
मी जे जे करतो ते सर्व तुला माहीत आहे.
4 परमेश्वरा, मला काय म्हणायचे आहे
ते तुला माझे शब्द तोंडातून बाहेर पडायच्या आधीच कळते.
5 परमेश्वरा, तू माझ्या सभोवताली आहेस.
माझ्या पुढे आणि माझ्या मागे आहेस तू तुझा हात हळूवारपणे माझ्यावर ठेवतोस.
6 तुला जे सर्वकाही माहीत आहे
त्याचे मला आश्र्चर्य वाटते ते समजून घेणे मला खूप कठीण वाटते.
7 मी जिथे जातो तिथे तिथे तुझा आत्मा असतो.
परमेश्वरा, माझी तुझ्यापासून सुटका नाही.
8 परमेश्वरा, मी जर स्वर्गात गेलो तर तिथे
तू असतोस मी जर खाली मृत्यूलोकात गेलो तर तिथे ही तू असतोस.
9 परमेश्वरा, मी जर पूर्वेकडे, जिथे सूर्य उगवतो तिथे गेलो तर तिथे ही तू असतोस.
मी जर पश्चिमेकडे समुद्रावर गेलोतर तिथे ही तू असतोस.
10 तिथेही तुझा उजवा हात मला धरतो.
आणि तू मला हाताने धरुन नेतोस.
11 परमेश्वरा, कदाचित् मी तुझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करीन आणि म्हणेन,
“दिवस रात्रीत बदलला आहे आणि आता काळोख मला खरोखरच लपवेल.”
12 पण परमेश्वरा, काळोख देखील तुझ्यासाठी पुरेसा दाट नाही
तुझ्यासाठी रात्र दिवसासारखीच प्रकाशमय आहे.
23 परमेश्वरा, माझ्याकडे बघ आणि
माझे मन जाण माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे.
24 माझ्या मनात काही दुष्ट विचार आहेत का ते बघ
आणि मला “सनातन मार्गाचा” रस्ता दाखव.
21 देव म्हणाला, “मी जे केले, ते इतर राष्ट्रांना पाहू देईन. मग ती राष्ट्रे मला मान द्यायला लागतील. त्या शत्रूविरुद्ध वापरलेले माझे सामर्थ्य ते पाहतील. 22 मग त्या दिवसापासून, इस्राएलच्या लोकांना मीच त्यांचा परमेश्वर देव असल्याचे समजून येईल. 23 आणि इस्राएलच्या लोकांना कैदी म्हणून इतर देशांत का नेले गेले, हेही इतर राष्ट्रांना कळेल. त्यांना समजेल की माझी माणसेच माझ्याविरुद्ध गेली म्हणून मी त्यांच्याकडे पाठ फिरविली. त्यांच्या शत्रूंना त्यांचा पराभव करु दिला म्हणून माझे लोक लढाईत मारले गेले. 24 त्यांनी पाप केले व स्वतःला अमंगळ करुन घेतले म्हणून त्यांनी केलेल्या कर्माबद्दल मी त्यांना शिक्षा केली. मी त्यांच्याकडे पाठ फिरविली आणि त्यांना मदत करण्याचे नाकारले.”
25 म्हणून परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “याकोबच्या लोकांना कैदेतून परत आणीन. इस्राएलच्या सर्व लोकांवर मी दया करीन. माझ्या पवित्र नावाबद्दल आवेशाने भावना प्रकट करीन. 26 पूर्वी माझ्या विरुद्ध केलेल्या दुष्टाव्याची लोकांना लाज वाटेल. ते माझ्याविरुद्ध गेले ते सर्व विसरतील. ते त्यांच्या देशात सुरक्षितपणे राहतील. त्यांना कोणीही घाबरविणार नाही. 27 इतर देशांतून मी माझ्या माणसांना परत आणीन. त्यांच्या शत्रूंच्या देशांतून त्यांना गोळा करीन. मग मी किती पवित्र आहे ते इतर पुष्कळ राष्ट्रांना कळेल. 28 त्यांना कळेल की मीच त्यांचा परमेश्वर आहे. का? कारण मीच त्यांना कैदी म्हणून दुसऱ्या देशांत जायला भाग पाडले आणि मीच त्याना एकत्र गोळा करुन त्यांच्या देशात परत आणले. 29 इस्राएलच्या लोकांमध्ये मी माझा आत्मा ओतीन आणि त्या नंतर मी कधीच माझ्या लोकांपासून दूर जाणार नाही.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या.
13 जेव्हा देवाने अब्राहामाला वचन दिले, तेव्हा त्याच्यापेक्षा कोणी मोठा नसल्याने देवाने स्वतःच्याच नावाने शपथ वाहिली. 14 तो म्हणाला, “मी तुला भरपूर आशीर्वाद देईन आणि मी तुझ्या वंशजांना सतत बहुगुणित करीत राहीन.” 15 म्हणून धीराने वाट पाहिल्यानंतर देवाने जे वचन त्याला दिले होते ते त्याला प्राप्त झाले.
16 लोक, नेहमी शपथ वाहताना आपल्यापेक्षा जो मोठा असतो त्याच्या नावाचा उपयोग करतात. कारण शपथ ही विदित केलेल्या सत्याची खात्री पटविणे व सर्व वादाचा शेवट करणे यासाठी असते. 17 आपल्या योजनेचे कधीही न बदलणारे स्वरूप वचनाच्या वारसदारांना कळावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून त्याने वाहिलेल्या शपथेच्या द्वारे याबाबत हमी दिली. 18 देवाने असे केले यासाठी की, ज्यांच्याविषयी लबाडी करणे देवासाठी अशक्य आहे अशा दोन न बदलणाऱ्या कृतींमुळे (त्याचे वचन व शपथ) जे आपण आश्रयाकरिता निघालो आहोत, त्या आपणांस त्या आशेसंबधाने अधिक उत्तेजन प्राप्त व्हावे.
19 आम्हांला ही आशा जणू काय भक्कम, सुरक्षित अशा नांगरासारखी आत्म्याला आहे व ही आशा मंदिराच्या पडद्यामागील आतील बाजूस प्रवेश करते, 20 जेथे आमच्यापुढे धावत येशू आमच्यासाठी आत गेलेला आहे. तो मलकीसदेकाप्रमाणे अनंतकाळासाठी मुख्य याजक झाला आहे.
2006 by World Bible Translation Center