Revised Common Lectionary (Semicontinuous)
इसहाकाचा वंश
19 इसहाकाची घराणी अशी, अब्राहामाला इसहाक नावाचा मुलगा होता. 20 तो चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पदन अराम येथील अरामी बथुवेलाची कन्या व लाबान याची बहीण रिबका इजशी लग्न केले. 21 इसहाकाच्या बायकोला मूलबाळ होईना म्हणून इसहाकाने रिबकेसाठी परमेश्वराची प्रार्थना केली; परमेश्वराने इसहाकाची प्रार्थना ऐकली आणि रिबका गर्भवती झाली.
22 ती गरोदर असताना तिच्या उदरातील दोन मुले एकमेकांशी झगडू लागली; तेव्हा परमेश्वराची प्रार्थना करुन ती म्हणाली, “परमेश्वरा, मला हे असे का होत आहे?” 23 परमेश्वर तिला म्हणाला,
“दोन राष्ट्राचे राज्यकर्ते
तुझ्या उदरातून जन्म घेतील;
एक मुलगा दुसऱ्यापेक्षा बलवान होईल;
वडील मुलगा धाकट्याची सेवा करील.”
24 मग रिबकेची प्रसूतीची वेळ आली तेव्हा तिला जुळी मुले झाली; 25 पहिला मुलगा तांबूस रंगाचा होता, त्याचे अंग जणूकाय केसाळ झग्यासारखे होते; म्हणून त्याचे नाव एसाव (म्हणजे केसाळ) असे ठेवले. 26 पाठोपाठ दुसरा मुलगा जन्मला तेव्हा त्याने एसावाची टाच हाताने घट्ट धरली होती; म्हणून त्याचे नाव याकोब असे ठेवले. रिबकेला ही जुळी मुले झाली तेव्हा इसाहक साठ वर्षांचा होता.
27 ही जुळी मुले वाढत जाऊन मोठी झाली तेव्हा एसाव तरबेज शिकारी झाला; शेताशेतातून व रानावनातून फिरण्याची त्याला आवड होती. पण याकोब शांत होता तो त्याच्या तंबूत राहिला. 28 एसाव इसहाकाचा आवडता होता; त्याने शिकार करुन आणलेल्या प्राण्यांचे मांस खाणे इसहाकाला आवडत असे; परंतु याकोब रिबकेचा आवडता होता.
29 एके दिवशी एसाव शिकारीहून परत आला; तो फार थकलेला होता व भुकेने अगदी गळून गेला होता. याकोब मसुरीच्या लाल डाळीचे वरण शिजवीत होता. 30 तेव्हा एसाव याकोबाला म्हणला, “मी भुकेने व्याकूळ झालो आहे तर मला थोडे तांबड्या डाळीचे वरण खावयास घेऊ दे;” यावरुन लोक त्याला अदोम (म्हणजे तांबडा) म्हणत.
31 परंतु याकोब म्हणाला, “त्याबद्दल तू मला आजच तुझा ज्येष्ठपणाचा हक्क दिला पाहिजेस.”
32 एसाव म्हणाला, “भुकेने माझा प्राण चालला आहे, मी जर मेलो तर माझ्या बापाची मालमत्ता मला काय उपयोगाची? तेव्हा मी माझ्या ज्येष्टपणाचा हक्क तुला देतो.”
33 परंतु याकोब म्हणाला, “तर प्रथम, तू तुझा ज्येष्ठपणाचा वारसा हक्क मला देशील अशी शपथ माझ्याशी वाहा.” तेव्हा एसावाने तशी शपथ वाहिली; अशा रीतीने एसावाने आपल्या बापाकडून मिळणाऱ्या सगळ्या मालमत्तेचा व ज्येष्टपणाचा आपला वारसा हक्क आपला धाकटा भाऊ याकोब याला मोबदला म्हणून दिला. 34 मग याकोबाने त्याला भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले. एसावाने ते खाल्ले व पाणी पिऊन झाल्यावर तो तेथून निघून गेला. अशा रीतीने आपल्या बापाकडून मिळणाऱ्या ज्येष्ठपणाच्या हक्काची एसावाने बेपर्वाईने कदर केली नाहीं.
नून
105 परमेश्वरा, तुझे शब्द दिव्याप्रमाणे
माझा मार्ग उजळतात.
106 तुझे नियम चांगले आहेत.
मी ते पाळायचे वचन देतो आणि मी दिलेले वचन पाळीन.
107 परमेश्वरा, मी खूप काळ दुख: भोगले आहे.
कृपा करुन आज्ञा दे आणि मला पुन्हा जगू दे.
108 परमेश्वरा, माझ्या स्तुतीचा स्वीकार कर
आणि मला तुझे नियम शिकव.
109 माझे आयुष्य नेहमीच धोक्यात असते
पण मी तुझी शिकवण विसरलो नाही.
110 दुष्ट लोक मला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात.
पण मी तुझ्या आज्ञा मोडल्या नाहीत.
111 परमेश्वरा, मी सदैव तुझ्या कराराप्रमाणे वागेन
त्यामुळे मला खूप आनंद होतो.
112 मी अगदी नेहमी प्रयत्नपूर्वक
तुझे नियमपाळायचा प्रयत्न करीन.
पवित्र आत्म्यात जीवन
8 म्हणून आता जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना शिक्षा नाही. 2 कारण आत्म्याचा जो नियम ख्रिस्त येशूमध्ये जीवन देतो त्याने पापाचा नियम जो तुम्हांला मरणाकडे नेतो त्यापासून मुक्त केले आहे. 3 नियमशास्त्र समर्थ आहे पण आपण दूर्बळ आहोत त्यामुळे वाचु शकत नाही, देवाने आपल्या पुत्राला पापी देहाच्या प्रतिरुपाने व पापाकरिता पाठवून ख्रिस्ताच्या देहामध्ये पापाला न्यायदंड ठरविला. 4 यासाठी की, नीतिच्या व आवश्यक गोष्टी आपण जे देहाच्या पापमय स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो, त्या आमच्याद्वारे पूर्ण व्हाव्यात.
5 कारण जे त्यांच्या मानवी पापी देहाप्रमाणे जगतात ते देहाच्या गोष्टींचा विचार करतात, परंतु जे आत्म्याने चालतात व ज्यांचे मन आत्म्याच्या गोष्टींकडे लागलेले असते ते त्याप्रमाणे जीवन जगतात. 6 देहाचे चिंतन हे मरण आहे. पण आत्म्याचे मनन हे जीवन आणि शांति आहे. 7 मानवी स्वभावाचे अधिकार असलेले पापी मन म्हणजे देवाबरोबर वैर आहे. कारण ते देवाच्या नियमाच्या आधीन होत नाही, व त्याला आधीन होताही येत नाही. 8 कारण जे देहस्वभावाच्या आधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्र करता येत नाही.
9 देवाचा आत्मा तुम्हांमध्ये राहतो, तर तुम्ही देहाचे नसून आत्म्याचे आहात. परंतु जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. 10 उलट जर ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे व तुमचा देह पापामुळे मेला आहे तरी नीतिमत्वामुळे तुमच्या आत्म्याच जीवन आहे. 11 आणि ज्या आत्म्याने येशूला मरणातून उठविले तो त्याचा आत्मा तुम्हांमध्ये राहतो त्या तुमच्या मर्त्य शरीराला जीवन देईल.
बी पेरणाऱ्याची बोधकथा(A)
13 त्याच दिवशी येशू घराबाहेर पडून सरोवराच्या काठी जाऊन बसला. 2 पुष्कळ लोक त्याच्याभोवती जमले, म्हणून येशू नावेत जाऊन बसला व सर्व लोकसमुदाय किनाऱ्यावर उभा राहिला. 3 तेव्हा त्याने त्यांना गोष्टीरूपाने बोध केला. तो म्हणाला,
“एक शेतकरी बी पेरायला निघाला. 4 तो पेरीत असता काही बी रस्त्यावर पडले, पक्षी आले व त्यांनी ते खाऊन टाकले. 5 काही बी खडकाळ जमिनीवर पडले. तेथे पुरेशी माती नव्हती. तेथे बी फार झपाट्याने वाढले. पण जमीन खोलवर नव्हती, 6 म्हणून जेव्हा सूर्य उगवाला तेव्हा रोपटे वाळून गेले. कारण त्याला खोलवर मुळे नव्हती. 7 काही बी काटेरी झुडपावर पडले. काटेरी झुडूप वाढले आणि त्याने रोपाची वाढ खुंटविली. 8 काही बी चांगल्या जमिनीवर पडले, ते रोप वाढले व त्याला धान्य आले. आणि कोठे शंभरपट, कोठे साठपट. कोठे तीसपट असे त्याने पीक दिले. 9 ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.”
येशू बीयांविषयी स्पष्टीकरण करतो(A)
18 “पेरणाऱ्याच्या बोधकथेचा अर्थ काय हे समजून घ्या,
19 “कोणी राज्याची गोष्ट ऐकतो पण ती त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट (सैतान) येतो व त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते घेतो, वाटेवर पेरलेला तो हाच आहे.
20 “खडकाळ जागेवर पेरलेला तो असा आहे की, तो वचन ऐकतो व लगेच आनंदाने स्वीकारतो. 21 तरी त्याच्यामध्ये मूळ नसल्याने तो थोडा काळच टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा कोणी छळ केला, व त्रास झाला म्हणजे तो लगेच अडखळतो.
22 “आणि काटेरी झाडांमध्ये पेरलेला असा आहे की, तो वचन ऐकतो पण जगिक गोष्टीविषयीचा ओढा, संपत्तीचा मोह ही वचनाला वाढू देत नाहीत आणि तो निष्फळ होतो.
23 “चांगल्या जमिनीवर पेरलेला असा आहे की, तो वचन ऐकतो, ते समजतो व तो निश्चितपणे पीक देतो. कोणी शंभरपट, कोणी साठपट, कोणी तीसपट असे पीक देतो.”
2006 by World Bible Translation Center