Revised Common Lectionary (Semicontinuous)
ती पुन्हा बोलते
8 मी माझ्या सख्याचा आवाज ऐकते.
तो येत आहे डोंगरावरुन उड्या मारत,
टेकड्यांवरुन बागडत येत आहे.
9 माझा प्रियकर मृगासारखा,
हरिणाच्या पाडसासारखा आहे.
आमच्या भिंतीच्या पलिकडे उभ्या असलेल्या,
खिडकीतून डोकावणाऱ्या,
झरोक्यातून [a] पहाणाऱ्या माझ्या प्रियकराला बघा.
10 माझा प्रियकर माझ्याशी बोलतो,
“प्रिये, हे सुंदरी ऊठ
आपण दूर जाऊ या!
11 बघ आता हिवाळा संपला आहे.
पाऊस आला आणि गेला.
12 शेतात फुले उमलली आहेत,
आता गाण्याचे दिवस आले आहेत.
ऐक कबूतरे परतली आहेत.
13 अंजिराच्या झाडावर अंजिर लागले आहेत व वाढत आहेत.
बहरलेल्या द्राक्षवेलींचा गंध येत आहे.
प्रिये, सुंदरी, ऊठ
आपण आता दूर जाऊ या.”
याकोबाची वंशावळ वाढली
31 परमेश्वराने पाहिले की याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम आहे, म्हणून परमेश्वराने लेआला मुले होऊ दिली परंतु राहेलीस मूलबाळ दिले नाही;
32 लेआला मुलगा झाला; तिने त्याचे नाव रऊबेन ठेवले; कारण ती म्हणाली, “परमेश्वराने माझे दु:ख पाहिले आहे; कारण माझा नवरा माझ्यावर प्रेम करीत नाही; परंतु आता कदाचित तो माझ्यावर प्रेम करील.”
33 लेआ पुन्हा गरोदर राहिली आणि तिला आणखी एक मुलगा झाला; ह्या मुलाचे नाव तिने शिमोन ठेवले, कारण ती म्हणाली, “माझ्या नवऱ्याचे माझ्यावर प्रेम नाही हे परमेश्वराने ऐकले आहे म्हणून त्याने मला हा मुलगा दिला आहे.”
34 लेआ आणखी गर्भवती झाली व तिला मुलगा झाला; तेव्हा तिने त्याचे नाव लेवी असे ठेवले; कारण ती म्हणाली, “आता मात्र माझा नवरा माझ्यावर नक्की प्रेम करील कारण मी त्यांना तीन मुलगे दिले आहेत.”
35 त्यानंतर लेआला आणखी एक मुलगा झाला; तिने त्याचे नाव यहूदा ठेवले; करण ती म्हणाली, “आता मी परमेश्वराची स्तुति करीन.” नंतर तिचे जनन थांबले.
येशू त्याच्या शिष्यांचे पाय धुतो
13 मग वल्हांडण सणापूर्वी येशूने आपण या जगातून निघून पित्याकडे जावे असा समय आला आहे, हे जाणून आपले स्वतःचे लोक जे जगात होते त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रीति केली.
2 मग संध्याकाळचे भोजन होण्याच्या वेळेस सैतानाने शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत याच्या मनात त्याला शत्रूंच्या हाती घावे असे आधीच घालून दिले असताना, 3 आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे आणि आपण देवापासून आलो आणि आता देवाकडे जातो हे ओळखून, 4 येशू जेवणावरून उठला, त्याने आपली बाह्यवस्त्रे काढून ठेवली व रुमाल घेऊन आपल्या कमरेस बांधला. 5 मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊ लागला. आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने पुसू लागला.
6 मग तो शिमोन पेत्राकडे आला; पण पेत्र त्याला म्हणाला, “प्रभु, तू माझे पाय धुणार काय?”
7 येशूने उत्तर दिले, “मी आता जे करीत आहे, ते तुला आता कळणार नाही, तर पुढे तुला कळेल.”
8 पेत्र त्याला म्हणाला, “तू माझे पाय कधीही धुवायचे नाहीत.”
येशूने उत्तर दिले, “जर मी तुझे पाय धुतले नाहीत तर तुला माझ्या बरोबर वाटा नाही.”
9 शिमोन पेत्राने उत्तर दिले,“मग प्रभु माझे पायच नव्हे तर हात व डोकेही धुवा.”
10 येशूने उत्तर दिले, “ज्याची आंघोळ झाली आहे, त्याचे फक्त पाय धुतले तरी चालेल, कारण तो स्वच्छच आहे. तुम्ही स्वच्छ आहात पण सर्वच नाहीत.” 11 आपल्याला कोण धरून देणार हे येशूला माहीत होते, म्हणून “तुम्ही सर्वच शुद्ध नाहीत” असे तो म्हणाला.
12 जेव्हा त्याने त्याचे पाय धुण्याचे संपविले तेव्हा त्याने आपली बाह्यवस्त्रे घातली व आपल्या जागेवर आला. त्याने त्यांना विचारले, “मी काय केले हे तुम्हांला समजले काय? 13 तुम्ही मला ‘गुरुजी’ आणि ‘प्रभु’ म्हणता आणि योग्य म्हणता, कारण मी तोच आहे. 14 म्हणून मी जो प्रभु आणि गुरु असूनही मी तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुवावे. 15 कारण जसे मी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला उदाहरण घालून दिले. 16 मी खरे सांगतो, दास आपल्या मालकापेक्षा श्रेष्ठ नाही आणि पाठविलेला ज्याने पाठविले त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. 17 या गोष्टी जर तुम्ही समजता आणि त्या तुम्ही जर केल्या तर तुम्ही आशीर्वादित आहात.
2006 by World Bible Translation Center