Revised Common Lectionary (Semicontinuous)
ती पुन्हा बोलते
8 मी माझ्या सख्याचा आवाज ऐकते.
तो येत आहे डोंगरावरुन उड्या मारत,
टेकड्यांवरुन बागडत येत आहे.
9 माझा प्रियकर मृगासारखा,
हरिणाच्या पाडसासारखा आहे.
आमच्या भिंतीच्या पलिकडे उभ्या असलेल्या,
खिडकीतून डोकावणाऱ्या,
झरोक्यातून [a] पहाणाऱ्या माझ्या प्रियकराला बघा.
10 माझा प्रियकर माझ्याशी बोलतो,
“प्रिये, हे सुंदरी ऊठ
आपण दूर जाऊ या!
11 बघ आता हिवाळा संपला आहे.
पाऊस आला आणि गेला.
12 शेतात फुले उमलली आहेत,
आता गाण्याचे दिवस आले आहेत.
ऐक कबूतरे परतली आहेत.
13 अंजिराच्या झाडावर अंजिर लागले आहेत व वाढत आहेत.
बहरलेल्या द्राक्षवेलींचा गंध येत आहे.
प्रिये, सुंदरी, ऊठ
आपण आता दूर जाऊ या.”
याकोब राहेलला भेटतो
29 नंतर याकोबाने आपला प्रवास पुढे चालून ठेवला. तो पूर्वेकडील प्रदेशात गेला. 2 त्याने समोर पाहिले तेव्हा त्याला एका शेतात एक विहीर दिसली; त्या विहिरी जवळ शेरडामेंढराचे तीन कळप बसलेले होते; ही विहीर त्यांची पाणी पिण्याची जागा होती. या विहिरीचे तोंड एका मोठया दगडाने झाकलेले होते; 3 जेव्हा सर्व कळप तेथे जमत तेव्हा मेंढपाळ विहिरीच्या तोंडावरील मोठा दगड ढकलून बाजूला सारीत मग सर्व कळपांचे पाणी पिऊन झाल्यावर ते तो दगड परत त्याच जागेवर ठेवीत.
4 याकोब त्या मेंढपाळांना म्हणाला, “माझ्या बंधूंनो, तुम्ही कोठून आलात?”
ते म्हणाले, “आम्ही हारानाहून आलो आहोत.”
5 मग याकोब म्हणाला, “नाहोराचा मुलगा लाबान याला तुम्ही ओळखता का?”
ते म्हणाले, “होय, आम्ही त्याला ओळखतो.”
6 याकोबाने त्यांना विचारले, “तो बरा आहे काय?”
त्यानी उत्तर दिले, “तो बरा व खुशाल आहे आणि त्याचे सर्वकाही चांगले आहे. ती पाहा त्याची मुलगी राहेल, त्याची मेंढरे घेऊन इकडे येत आहे.”
7 याकोब म्हणाला, “हे पाहा, अद्याप दिवस बराच आहे आणि सूर्य मावळण्यास अजून बराच वेळ आहे; तसेच रात्रीसाठी कळपांना गोळा करण्यास अजून बराच अवकाश आहे; तेव्हा त्यांना पाणी पाजा, आणि चरण्यासाठी त्यांना परत शेतात जाऊ द्या.”
8 परंतु ते म्हणाले, “आम्हाला तसे करता येत नाही, कारण सर्व कळप एकत्र आल्यावरच आम्ही विहिरीवरील दगड बाजूला सारतो व मग सर्व कळपांना पाणी पाजतो.”
9 याकोब मेंढपाळांशी बोलत असतानाच राहेल आपल्या बापाची मेंढरे घेऊन आली; (कारण शेरडा मेंढराना चारण्याचे व त्यांची निगा राखण्याचे काम ती करीत असे.) 10 राहेल ही याकोबाच्या मामाची म्हणजेच याकोबाची आई रिबका हिचा भाऊ लाबान याची मुलगी होती. याकोबाने जेव्हा राहेलीस पाहिले तेव्हा त्याने जाऊन विहिरीच्या तोंडावरील दगड लोटला आणि आपल्या मामाच्या मेंढरास पाणी पाजले. 11 नंतर त्याने राहेलीचे चुंबन घेतले आणि तो खूप रडला; 12 आपण तिच्या बापाच्या आप्तातील असल्याचे म्हणजे तिच्या बापाची धाकटी बहीण रिबका हिचा मुलगा असल्याचे त्याने राहेलीस सांगितले; तेव्हा राहेल धावत घरी गेली आणि या गोष्टी तिने आपल्या बापाला सांगितल्या.
13 आपला भाचा याकोब आल्याचे वर्तमान लाबानाने ऐकले तेव्हा लाबान धावत त्याला भेटावयास गेला; त्याने याकोबला मिठी मारली व त्याची चुंबने घेतली आणि त्याला आपल्या घरी आणले; मग याकाबाने घडलेल्या सर्व गोष्टी आपला मामा लाबान याला सांगितल्या.
14 मग लाबान म्हणाला, “हे आश्चर्य आहे की आपले रक्ताचे नाते आहे.” तेव्हा त्यानंतर याकोब एक महिनाभर लाबानापाशी राहिला.
3 तर मग यहूदी असण्यात फायदा काय? किंवा सुंतेपासून फायदा काय? 2 सर्व बाबतीत पुष्कळच आहे. कारण सर्वप्रथम त्यांना देवाची वचने विश्वासाने सोपविण्यात आली होती. 3 हे खरे आहे की त्यातील काही अविश्वासू होते; देवाच्या विश्वासूपणाला अविश्वासूपणा नाहीसा करील काय? 4 खात्रीने नाही! देव खरा असलाच पाहिजे आणि प्रत्येक मनुष्य खोटा, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
“तू बोलशील तेव्हा योग्य ठरशील आणि तुझा न्याय होत
असता तू विजय मिळविशील.” (A)
5 जर आपल्या दुष्टपणामुळे देवाचा न्याय स्पष्ट होत असेल तर त्याला काय म्हणावे? देव जो आपणावर क्रोध आणतो त्याला अनीतिमान म्हणावे काय? (मी हे मानवाप्रमाणे बोलतो). 6 खात्रीने नाही! कारण मग देव जगाचा न्याय कसा करील?
7 परंतु तुम्ही असे म्हणाला की, “जर देवाचा खरेपणा माझ्या खोटेपणामुळे त्याच्या गौरवासाठी उठून दिसत असेल, तर मग मी पापी का गणला जातो?” 8 आपण का वाईट करु नये जर त्याचा परिणाम चांगला होत असेल. कारण काही जण आपल्या विरुध्द वाईट बोलत आहेत, आणि त्यांना मिळणारी शिक्षा त्याबद्दलचा न्याय आहे.
2006 by World Bible Translation Center