Revised Common Lectionary (Semicontinuous)
ती पुन्हा बोलते
8 मी माझ्या सख्याचा आवाज ऐकते.
तो येत आहे डोंगरावरुन उड्या मारत,
टेकड्यांवरुन बागडत येत आहे.
9 माझा प्रियकर मृगासारखा,
हरिणाच्या पाडसासारखा आहे.
आमच्या भिंतीच्या पलिकडे उभ्या असलेल्या,
खिडकीतून डोकावणाऱ्या,
झरोक्यातून [a] पहाणाऱ्या माझ्या प्रियकराला बघा.
10 माझा प्रियकर माझ्याशी बोलतो,
“प्रिये, हे सुंदरी ऊठ
आपण दूर जाऊ या!
11 बघ आता हिवाळा संपला आहे.
पाऊस आला आणि गेला.
12 शेतात फुले उमलली आहेत,
आता गाण्याचे दिवस आले आहेत.
ऐक कबूतरे परतली आहेत.
13 अंजिराच्या झाडावर अंजिर लागले आहेत व वाढत आहेत.
बहरलेल्या द्राक्षवेलींचा गंध येत आहे.
प्रिये, सुंदरी, ऊठ
आपण आता दूर जाऊ या.”
एसावाला दिलेला आशीर्वाद
30 इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देण्याचे संपविले. त्यानंतर याकोब आपल्या बापापासून निघून गेला तोंच एसाव शिकारीहून आला. 31 त्याने आपल्या बापाच्या विशेष आवडीचे रुचकर भोजन तयार केले, व तो ते घेऊन आपल्या बापाकडे आला, तो बापाला म्हणाला, “बाबा, उठा आणि तुमच्या मुलाने शिकार करुन आणलेल्या मृग मांसाचे हे रुचकर जेवण खा; आणि मग मला आशीर्वाद द्या.”
32 परंतु इसहाक त्याला म्हणाला, “तू कोण आहेस?”
त्याने उत्तर दिले, “बाबा, मी तुमचा मुलगा, वडील मुलगा एसाव आहे.”
33 मग इसहाक अतिशय अस्वस्थ झाला; तो म्हणाला, “तर मग तू येण्याअगोदर ज्याने जेवण तयार करुन मला आणून दिले तो कोण होता? मी ते सर्व जेवण खाल्ले आणि त्याला आशीर्वादही दिला. तो आशीर्वाद मागे घेण्यास आता फार उशीर झाला आहे; तो त्याला मिळणार.”
34 एसावाने आपल्या बापाचे शब्द ऐकले तेव्हा त्याला फार राग आला व तो खिन्न झाला; हंबरडा फोडून तो बापाला म्हणाला, “तर मग मला ही आशीर्वाद द्या हो बाबा!”
35 इसहाक म्हणाला, “तुझ्या भावाने मला फसवले; तो आला व तुझा आशीर्वाद घेऊन गेला.”
36 एसाव म्हणाला, “त्याचे नाव याकोब (म्हणजे युक्तीबाज, किंवा युक्तीने हिरावून घेणारा) असे आहे ते त्याला योग्यच आहे; त्याने मला दोनदा फसवले; आहे त्याने माझा ज्येष्ठपणाचा हक्क हिरावून घेतला आणि आता त्याने माझा आशीर्वादही काढून घेतला आहे.” मग एसाव पुढे म्हणाला, “बाबा माझ्याकरिता तुम्ही काही आशीर्वाद राखून ठेवला आहे काय?”
37 इसहाकाने उत्तर दिले, “नाही बाळा, आता फार उशीर झाला आहे; मी याकोबाला तुझ्यावर धनीपणा करण्याचा अधिकार दिला आहे, आणि तुझे बंधू तुझे सेवक होतील असाही आशीर्वाद दिला आहे; त्याच प्रमाणे त्याला भरपूर धान्य व द्राक्षारस मिळावा असाही आशीर्वाद दिला आहे; तेव्हा माझ्या बाळा, आता तुला द्यावयाला काही राहिले नाही.”
38 परंतु एसाव आपल्या बापाला दिनवणी करीतच राहिला; तो म्हणाला, “बाबा तुमच्याकडे एकच आशीर्वाद होता काय? बाबा, माझे बाबा, मलाही आशीर्वाद द्या हो!” असे म्हणत तो टाहो फोडून रडू लागला!
39 तेव्हा इसहाक म्हणाला,
“तुला चांगल्या सुपीक जमिनीवर राहावयास मिळणार नाही
व तुला भरपूर पाऊसही मिळणार नाही;
40 जगण्यासाठी तुला झगडावे लागेल;
आणि तु तुझ्या भावाचा गुलाम होशील,
परंतु तू स्वतंत्र होण्यासाठी लढशील
आणि तुझ्या भावाचे नियंत्रण झुगारुन देशील व त्याच्या पासून वेगळा होशील.”
41 त्यानंतर आपला आशीर्वाद हिरावून घेतल्याबद्दल एसाव याकोबाचा द्वेष करु लागला; एसाव विचार करुन स्वतःशीच म्हणाला, “लवकरच माझा बाप मरुन जाईल आणि बापाच्या वियोगामुळे मला दु:ख होईल; परंतु त्यानंतर मात्र मी याकोबाला ठार मारीन.”
42 याकोबाला ठार मारण्याचा बेताचा रिबकेला सुगावा लागला; तेव्हा तिने त्याला बोलावून घेतले; मग ती त्याला म्हणाली, “माझ्या बाळा, ऐक, तुझा भाऊ तुला ठार मारण्याचा बेत करीत आहे; 43 तेव्हा बाळा, मी सांगते ते कर; हारान प्रांतात माझा भाऊ लाबान राहत आहे, त्याच्याकडे जाऊन तू लपून राहा. 44 तुझ्या भावाचा राग शांत होईपर्यंत थोडा काळ त्याजकडे राहा. 45 तू त्याला काय केलेस हे थोडया काळाने तो विसरुन जाईल; मग सेवक पाठवून मी तुला मागे बोलावून घेईन एकाच दिवशी मी माझ्या दोन्हीही मुलांना अंतरावे असे न होवो.”
46 मग रिबका इसहाकाला म्हणाली, “तुमचा मुलगा एसाव याने हेथी स्त्रीयांशी लग्न केले, मला त्यांच्यामुळे जीव नकोसा झाला आहे, कारण त्या काही आपल्यापैकी नाहीत; जर याकोबाने ही यांच्या सारख्या स्थानिक स्त्रीयांशीं लग्न केले तर मात्र मी मेलेलीच बरी.”
सर्व लोकांनी चुका केल्या आहेत
18 लोकांनी केलेल्या प्रत्येक अनितीच्या कृत्यांमुळे व जे आपल्या अनीतीने सत्य दाबून ठेवतात, त्यांच्यामुळे स्वर्गातून देवाचा क्रोध प्रगट होतो. 19 हे असे होत आहे कारण देवाविषयीचे ज्ञान त्यांच्यात दिसून येते व देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे.
20 जगाच्या निर्मितीपासून देवाचे अदृश्य गुण, त्याचे सनातन सामर्थ्य व त्याचे देवपण हे देवाने ज्या गोष्टी निर्माण केल्या त्यावरुन प्रगट होतात. आणि जर तुम्हांला हे कळत नाही, तर ह्याचे तुम्हांला कसलेच समर्थन करता येणार नाही.
21 कारण जरी त्यांना देव माहीत होता तरी त्यांनी देव म्हणून त्याचा आदर केला नाही, किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते आपल्या विचारात निष्फळ झाले आणि मूर्ख अंतःकरणे अंधकारमय झाली. 22 जरी गर्वाने त्यांनी स्वतःला शहाणे समजले तरी ते मूर्ख ठरले. 23 आणि अविनाशी देवाचे गौरव याची मर्त्य मानव, पक्षी, चार पायाचे प्राणी, सरपटणारे प्राणी यांच्यासारख्या दिसणाऱ्या प्रतिमांशी अदलाबदल केली.
24 यासाठी देवाने त्यांना त्यांच्या मनातील वाईट वासनांच्या व वैषयिक अशुद्धतेमुळे सोडून दिले आणि त्यांनी एकमेकांच्या देहाचा अनादर करावा यासाठी त्यांस मोकळीक दिली. 25 त्यांनी देवाच्या खरेपणाशी लबाडीची अदलाबदल केली व निर्माणकर्त्याऐवजी जे निर्मिलेले त्याची उपासना केली. निर्माणकर्ता सर्वकाळ धन्यवादित आहे. आमेन.
2006 by World Bible Translation Center