Revised Common Lectionary (Semicontinuous)
रिबकेसाठी सौदा
34 तो सेवक म्हणाला, “मी अब्राहामाचा सेवक आहे; 35 परमेश्वराने माझ्या स्वामीला सर्व बाबतीत आशीर्वाद देऊन त्याचे कल्याण केले आहे. माझा स्वामी आता एक थोर माणूस झाला आहे; परमेश्वराने त्याला मेंढरांचे कळप, गुराढोरांची खिल्लारे तसेच खूप सोने. चांदी, दासदासी, उंट व गाढवे दिली आहेत. 36 सारा, ही माझ्या स्वामीची पत्नी, स्वामीने त्याची सगळी मालमत्ता आपल्या मुलास दिली आहे. 37 माझ्या स्वामीने सक्तीने माझ्याकडून वचन घेतले; तो म्हणाला, ‘आपण या कनान देशात राहतो खरे, परंतु माझ्या मुलासाठी येथील कनानी मुलीतून कोणतीच मुलगी बायको करुन देऊ नकोस; 38 माझ्या स्वामीने मला शपथ घ्यावयास लावले व सांगितले, तू माझ्या बापाच्या देशात माझ्या आप्ता कडे, गणगोताकडे जा व तेथून माझ्या मुलाकरिता तू नवरी शोधून आण.’
42 “आज मी या विहिरीपाशी आलो आणि परमेश्वराला प्रार्थना केली, ‘हे माझ्या स्वामीच्या अब्राहामच्या परमेश्वरा, ही माझ्या प्रवासाची फेरी सफळ कर; 43 पाहा, मी येथे या विहिरीजवळ उभा राहतो; येथे पाणी भरण्यास येणाऱ्या तरुण मुलीची वाट पाहतो; ती आल्यावर मी तिला विचारीन, “मुली, कृपा करुन तुझ्या घागरीतून मला थोडे पाणी पाज!” 44 तेव्हा ती योग्य मुलगी विशेष प्रकारे असे उत्तर देईल, ती म्हणेल, “प्या बाबा, आणि मी तुमच्या उंटासाठी ही पाणी आणते,” असे घडेल तेव्हा ती मुलगी माझ्या धन्याच्या मुलाकरिता परमेश्वराने निवडलेली नवरी आहे असे मी समजेन.’
45 “माझी प्रार्थना संपण्याच्या आत रिबका खांद्यावर घागर घेऊन पाणी भरण्यास विहिरीवर आली; तिने विहिरीत उतरुन पाणी आणले; मी तिला म्हणालो, ‘मुली, कृपा करुन मला थोडे पाणी व्यावयाला दे.’ 46 तेव्हा तिने लगेच खांघावरुन घागर उतरवली आणि माझ्यासाठी पाणी ओतीत ती म्हणाली, ‘बाबा, हे पाणी प्या आणि तिने माझ्या उंटांनाही पाणी पाजले;’ 47 मग मी तिला विचारले, ‘तू कोणाची मुलगी आहेस? तुझ्या बापाचे नाव काय?’ तिने उत्तर दिले, ‘नाहोरापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची मी कन्या;’ तेव्हा मग मी तिला सोन्याची आंगठी आणि हातात घालण्यासाठी सोन्याच्या दोन बांगडया दिल्या; 48 त्यावेळी मी मस्तक लववून माझ्या धन्याच्या परमेश्वराची उपकारस्तुती केली, कारण त्याने मला माझ्या स्वामीच्या भावाच्या मुलीला त्याच्या मुलाकडे नेण्याचा योग्य मार्ग दाखवला; 49 तेव्हा आता तुम्ही मला सांगा; तुम्ही माझ्या धन्याशी खरेपणाने आणि दयाळूपणाने वागाल का? आणि तुमची मुलगी त्याला देता का? की मुलगी देण्यास नकार देता? बोला, काय करता हे मला नक्की सांगा म्हणजे मग मी काय करावे हे मला समजेल.”
58 मग त्यांनी तिला बोलावून विचारिले, “अब्राहामाच्या या सेवकाबरोबर तू आता जाण्यास तयार आहेस काय?”
ती म्हणाली, “होय, मी तयार आहे.”
59 तेव्हा त्यांनी रिबकेला अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे यांच्या सोबत जाण्यास परवानगी दिली; रिबकेचा लहानपणापासून सांभाळ करणारी तिची दाईही त्यांच्याबरोबर गेली; 60 ते सर्व जाण्यास निघाले तेव्हा त्यांनी तिला निरोप देताना आशीर्वाद देऊन म्हटले,
“आमचे भगिनी,
तू लाखो लोकांची माता हो;
तुझी संतती त्यांच्या शत्रुंचा बिमोड करुन
त्यांची नगरे जिकूंन त्यांचा ताबा घेवोत.”
61 मग रिबका व तिच्या दाई-दासी उंटावर बसल्या आणि अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे यांच्या मागे निघाल्या; अशा रीतीने तो सेवक रिबकेला घेऊन माघारे आपल्या घराकडे प्रवासास निघाला.
62 ह्या वेळी इसहाक बैर-लहाय-रोई सोडून नेगेबात राहात होता. 63 तो एका संध्याकाळी ध्यानमनन करण्यास शेतात गेला असता त्याने नजर वर करुन पाहिले तेव्हा त्याला दूर अंतरावरुन उंट येताना दिसले;
64 रिबकेने नजर वर करुन इसहाकाला पाहिले तेव्हा ती उंटावरुन खाली उतरली. 65 तिने सेवकाला विचारले, “शेतातून आपल्याला भेटावयास सामोरा येत असलेला तरुण पुरुष कोण आहे?”
सेवकाने उत्तर दिले, “तो माझ्या स्वामीचा पुत्र आहे.” तेव्हा रिबकेने बुरख्याने आपले तोंड झाकून घेतले.
66 सेवकाने इसहाकाला काय काय घडले त्याविषयी सविस्तर सांगितले; 67 मग इसहाकाने मुलीला आपल्या आईच्या तंबूत आणले; त्या दिवशी रिबका त्याची बायको झाली; इसहाकाचे रिबकेवर फार प्रेम जडले; त्यामुळे आपल्या आईच्या मरणानंतर रिबकेमुळे त्याला समाधान मिळाले.
10 मुली, माझे ऐक, लक्षपूर्वक ऐक म्हणजे तुला कळेल.
तुझी माणसे आणि तुझ्या वडिलांचे कुटुंबयांना विसरुन जा.
11 राजाला तुझे सौंदर्य आवडते.
तो तुझा नवा नवरा (स्वामी) असेल.
तू त्याला मान देशील.
12 सोराचे लोक तुझ्यासाठी भेटी आणतील.
श्रीमंत लोक तुला भेटायची इच्छा धरतील.
13 राजकन्या म्हणजे एक किमती
आणि सोन्यात मढवलेला सुंदर हिरा आहे.
14 सुंदर वस्त्रप्रावरणांनी सजलेल्या वधूला राजाकडे नेले जाते.
तिच्या करवल्या तिच्या मागून जातात.
15 त्या अतिशय आनंदात आहेत.
आनंदविभोर होऊन त्या राजाच्या राजवाड्यात प्रवेश करतात.
16 राजा, तुझी मुले तुझ्यानंतर राज्य करतील.
तू त्यांना तुझ्या संपूर्ण राज्याचे अधिपती करशील.
17 मी तुझे नाव सदैव प्रसिध्द राहील असे करीन.
लोक सदैव तुझी स्तुती करतील.
ती पुन्हा बोलते
8 मी माझ्या सख्याचा आवाज ऐकते.
तो येत आहे डोंगरावरुन उड्या मारत,
टेकड्यांवरुन बागडत येत आहे.
9 माझा प्रियकर मृगासारखा,
हरिणाच्या पाडसासारखा आहे.
आमच्या भिंतीच्या पलिकडे उभ्या असलेल्या,
खिडकीतून डोकावणाऱ्या,
झरोक्यातून [a] पहाणाऱ्या माझ्या प्रियकराला बघा.
10 माझा प्रियकर माझ्याशी बोलतो,
“प्रिये, हे सुंदरी ऊठ
आपण दूर जाऊ या!
11 बघ आता हिवाळा संपला आहे.
पाऊस आला आणि गेला.
12 शेतात फुले उमलली आहेत,
आता गाण्याचे दिवस आले आहेत.
ऐक कबूतरे परतली आहेत.
13 अंजिराच्या झाडावर अंजिर लागले आहेत व वाढत आहेत.
बहरलेल्या द्राक्षवेलींचा गंध येत आहे.
प्रिये, सुंदरी, ऊठ
आपण आता दूर जाऊ या.”
15 मी काय करतो हे मला माहीत नाही कारण काय करायचे हे मला माहीत नाही. कारण ज्या गोष्टींचा मी द्वेष करतो, त्याच गोष्टी मी करतो. 16 आणि ज्या गोष्टी मला कराव्याशा वाटत नाही त्याच करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे हे मान्य करतो. 17 परंतु खरे तर मी त्या करतो असे नव्हे तर माझ्या ठायी वसत असलेले पाप त्या गोष्टी करते. 18 होय, मला माहीत आहे की, जे चांगले आहे ते माझ्यामध्ये वसत नाही. 19 चांगले करण्याची माझ्या ठायी इच्छा आहे, परंतु तसे मी करीत नाही, त्याऐवजी जे फार वाईट व जे मला करावेसे वाटत नाही तेच करतो. 20 आणि ज्याअर्थी, ज्या गोष्टी मला कराव्याशा वाटत नाहीत त्या मी करतो, तेव्हा खरे तर त्या गोष्टी मी करतो असे नाही तर माझ्याठायी असणारे पाप त्या गोष्टी करते.
21 तर माझ्यामध्ये मला हा नियम आढळतो की, माझ्यातील मनुष्याला चांगले करावेसे वाटते पण वाईट ही एकच गोष्ट माझ्याबरोबर आहे. 22 माझ्या आत असलेला मनुष्य देवाच्या नियमशास्त्रामुळे आनंद करतो. 23 परंतु माझ्या अवयवात मला निराळाच नियम कार्य करताना दिसतो. तो माझ्या मनावर अमल करणाऱ्या नियमाबरोबर लढतो, आणि पापाने मजवर लादलेल्या नियमाचा, जो माझ्या शरीरात कार्य करतो, त्याचा कैदी करतो. 24 मी अत्यंत दु:खी मनुष्य आहे! मरणाधीन असलेल्या शरीरापासून मला कोण सोडवील? 25 परंतु आमचा प्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे देवाचे आभार मानतो.
तर मग माझ्या मनाने मी देवाच्या नियमाचा गुलाम आहे. पण माझ्या पापी स्वभावाने मी पापाने माझ्यावर लादलेल्या नियमाचा गुलाम आहे.
16 “या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारतात त्यांच्यासारखी ही पिढी आहे. ती म्हणतात,
17 ‘आम्ही तुमच्यासाठी संगीत वाजविले
तरी तुम्ही नाचला नाहीत
आम्ही विलाप केला
तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाही.’
18 योहान काही न खाता व पिता आला, पण ते म्हणतात ‘त्याला भूत लागले आहे.’ 19 इतरांप्रमाणेच मनुष्याचा पुत्र खात पीत आला. लोक म्हणतात, ‘पाहा हा किती खातो? किती पितो? जकातदार व पापी लोकांचा मित्र’, परन्तु ज्ञानाची योग्यता त्याच्याद्वारे घडणाऱ्या योग्य गोष्टीमुळे ठरते.”
येशू त्याच्या लोकांना विश्रांति देतो(A)
25 मग येशू म्हणाला, “हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभु मी तुझे उपकार मानतो. कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुद्धिमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकांना प्रकट केल्या 26 होय पित्या, तू हे केलेस, कारण खरोखर तुला असेच करायचे होते.
27 “माझ्या पित्याने मला सर्व काही दिले आहे. आणि पित्यावाचून कोणी पुत्राला ओळखीत नाही, आणि पुत्रावाचून ज्याला प्रगट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्याशिवाय कोणीही पित्याला ओळखीत नाही.
28 “जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हांला विश्रांति देईन. 29 माझे जू आपणांवर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या आत्म्यास विश्रांति मिळेल. 30 कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे.”
2006 by World Bible Translation Center