Revised Common Lectionary (Semicontinuous)
10 मुली, माझे ऐक, लक्षपूर्वक ऐक म्हणजे तुला कळेल.
तुझी माणसे आणि तुझ्या वडिलांचे कुटुंबयांना विसरुन जा.
11 राजाला तुझे सौंदर्य आवडते.
तो तुझा नवा नवरा (स्वामी) असेल.
तू त्याला मान देशील.
12 सोराचे लोक तुझ्यासाठी भेटी आणतील.
श्रीमंत लोक तुला भेटायची इच्छा धरतील.
13 राजकन्या म्हणजे एक किमती
आणि सोन्यात मढवलेला सुंदर हिरा आहे.
14 सुंदर वस्त्रप्रावरणांनी सजलेल्या वधूला राजाकडे नेले जाते.
तिच्या करवल्या तिच्या मागून जातात.
15 त्या अतिशय आनंदात आहेत.
आनंदविभोर होऊन त्या राजाच्या राजवाड्यात प्रवेश करतात.
16 राजा, तुझी मुले तुझ्यानंतर राज्य करतील.
तू त्यांना तुझ्या संपूर्ण राज्याचे अधिपती करशील.
17 मी तुझे नाव सदैव प्रसिध्द राहील असे करीन.
लोक सदैव तुझी स्तुती करतील.
18 ते घेऊन याकोब आपल्या बापाकडे गेला आणि त्याने बापाला हाक मारली, “बाबा!”
त्याचा बाप म्हणाला, “काय मुला; तू कोण आहेस?”
19 याकोब म्हणाला, “मी तुमचा वडील मुलगा एसाव आहे; तुम्ही सांगतिल्याप्रमाणे सर्वकाही करुन मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो आहे; तेव्हा आता उठून जेवावयास बसा व तुमच्यासाठी शिकार करुन आणलेले मांस खा आणि मग मला आशीर्वाद द्या.”
20 परंतु इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, “एवढया लवकर तुला शिकार कशी काय मिळाली?”
याकोब म्हणाला, “कारण तुमच्या परमेश्वराने मला लवकर शिकार मिळू दिली.”
21 मग इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, “माझ्या मुला, जरा माझ्याजवळ ये, म्हणजे मी तुला चाचपून पाहतो, मग चाचपण्यावरुन तू खरेच एसाव आहेस का? ते मला समजेल”
22 तेव्हा याकोब आपल्या बापाजवळ गेला; त्याला चाचपून इसहाक म्हणाला, “तुझा आवाज तर याकोबाच्या आवाजासारख आहे परंतु तुझे हात मात्र एसावाच्या हातासारखे केसाळ आहेत.” 23 तो याकोब आहे असे इसहाकाला समजले नाही कारण त्याचे हात एसावाच्या हाता सारखे केसाळ होते; म्हणून त्याने याकोबाला आशीर्वाद दिला.
24 तो म्हणाला, “तू खरेच माझा मुलगा एसावच आहेस काय?”
याकोबाने उत्तर दिले, “होय बाबा, मी एसावच आहे.”
याकोब इसहाकाला युक्तीने फसवतो
25 मग इसहाक म्हणाला, “तू जेवण माझ्याकडे आण, मी ते खाईन, मग तुला आशीर्वाद देईन.” तेव्हा याकोबाने आपल्या बापाला जेवण दिले; ते त्यानी खाल्ले, त्याने त्यांना द्राक्षमद्यही दिले, आणि ते ते प्याले.
26 मग इसहाक त्याला म्हणाला, “माझ्या मुला जरा माझ्याजवळ ये व मला मुका दे.” 27 मग याकोब आपल्या बापाजवळ गेला आणि त्याने बापाचे चुंबन घेतले; इसहाकाला एसावाच्या कपडयांचा वास आला; तेव्हा त्याने त्याला आशीर्वाद दिला; तो म्हणाला,
“परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या,
पिकाने भरलेल्या शेताच्या सुगंधासारख माझ्या मुलाचा सुगंध दरवळत आहे.
28 परमेश्वर तुला भरपूर पाऊस देवो म्हणजे हंगामाच्या वेळी
तुझी सुपीक शेते तुला भरपूर धान्य व द्राक्षारस देतील.
29 सर्व लोक तुझी सेवा करोत;
राष्ट्रे तुझ्यापुढे नमोत;
तू तुझ्या भावांवर राज्य करशील;
ते तुला वंदन करतील व तुझ्या आज्ञा पाळतील;
तुला शाप देणारे शापित होतील
आणि तुला आशीर्वाद देणारे आशीर्वादित होतील.”
येशू पित्याला प्रार्थना करतो(A)
21 त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात उल्हासित झाला, आणि म्हणाला, “हे पित्या, स्वार्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभु मी तुझी स्तुति करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धिमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बाळकांस प्रकट केल्या आहेस. होय, पित्या कारण तुला जे बरे वाटले ते तू केलेस.
22 “माइया पित्याने सर्व गोष्टी माझ्यासाठी दिल्या होत्या. आणि पुत्र कोण आहे हे पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही. आणि पुत्राशिवाय कोणालाही पिता कोण आहे हे माहीत नाही व ज्या कोणाला ते प्रगट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्यालाच फक्त माहीत आहे.”
23 आणि शिष्यांकडे वळून तो एकांतात बोलला, “तुम्ही जे पाहता ते पाहणारे डोळे धन्य. 24 मी तुम्हांस सांगतो, अनेक राजांनी व संदेष्ट्यांनी तुम्ही जे पाहता ते पाहण्याची इच्छ बाळगली, परंतु त्यांनी ते पाहिले नाही आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकण्याची इच्छा बाळगली, परंतु त्यांनी ते ऐकले नाही.”
2006 by World Bible Translation Center