Revised Common Lectionary (Semicontinuous)
10 मुली, माझे ऐक, लक्षपूर्वक ऐक म्हणजे तुला कळेल.
तुझी माणसे आणि तुझ्या वडिलांचे कुटुंबयांना विसरुन जा.
11 राजाला तुझे सौंदर्य आवडते.
तो तुझा नवा नवरा (स्वामी) असेल.
तू त्याला मान देशील.
12 सोराचे लोक तुझ्यासाठी भेटी आणतील.
श्रीमंत लोक तुला भेटायची इच्छा धरतील.
13 राजकन्या म्हणजे एक किमती
आणि सोन्यात मढवलेला सुंदर हिरा आहे.
14 सुंदर वस्त्रप्रावरणांनी सजलेल्या वधूला राजाकडे नेले जाते.
तिच्या करवल्या तिच्या मागून जातात.
15 त्या अतिशय आनंदात आहेत.
आनंदविभोर होऊन त्या राजाच्या राजवाड्यात प्रवेश करतात.
16 राजा, तुझी मुले तुझ्यानंतर राज्य करतील.
तू त्यांना तुझ्या संपूर्ण राज्याचे अधिपती करशील.
17 मी तुझे नाव सदैव प्रसिध्द राहील असे करीन.
लोक सदैव तुझी स्तुती करतील.
इसहाकाचा वंश
19 इसहाकाची घराणी अशी, अब्राहामाला इसहाक नावाचा मुलगा होता. 20 तो चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पदन अराम येथील अरामी बथुवेलाची कन्या व लाबान याची बहीण रिबका इजशी लग्न केले. 21 इसहाकाच्या बायकोला मूलबाळ होईना म्हणून इसहाकाने रिबकेसाठी परमेश्वराची प्रार्थना केली; परमेश्वराने इसहाकाची प्रार्थना ऐकली आणि रिबका गर्भवती झाली.
22 ती गरोदर असताना तिच्या उदरातील दोन मुले एकमेकांशी झगडू लागली; तेव्हा परमेश्वराची प्रार्थना करुन ती म्हणाली, “परमेश्वरा, मला हे असे का होत आहे?” 23 परमेश्वर तिला म्हणाला,
“दोन राष्ट्राचे राज्यकर्ते
तुझ्या उदरातून जन्म घेतील;
एक मुलगा दुसऱ्यापेक्षा बलवान होईल;
वडील मुलगा धाकट्याची सेवा करील.”
24 मग रिबकेची प्रसूतीची वेळ आली तेव्हा तिला जुळी मुले झाली; 25 पहिला मुलगा तांबूस रंगाचा होता, त्याचे अंग जणूकाय केसाळ झग्यासारखे होते; म्हणून त्याचे नाव एसाव (म्हणजे केसाळ) असे ठेवले. 26 पाठोपाठ दुसरा मुलगा जन्मला तेव्हा त्याने एसावाची टाच हाताने घट्ट धरली होती; म्हणून त्याचे नाव याकोब असे ठेवले. रिबकेला ही जुळी मुले झाली तेव्हा इसाहक साठ वर्षांचा होता.
27 ही जुळी मुले वाढत जाऊन मोठी झाली तेव्हा एसाव तरबेज शिकारी झाला; शेताशेतातून व रानावनातून फिरण्याची त्याला आवड होती. पण याकोब शांत होता तो त्याच्या तंबूत राहिला.
विवाहावरुन उदाहरण
7 बंधूनो, तुम्हांस माहीत नाही काय? कारण नियमशास्त्र माहीत असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे की, जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे, तोपर्यंत नियमशास्त्र त्याच्यावर सता चालविते. 2 कारण लग्न झालेली स्त्री जोपर्यंत तिचा पती जिवंत आहे तोपर्यंत ती नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते, पण जर तिचा नवरा मेला तर ती पतीविषयीच्या नियमातून मोकळी होते. 3 म्हणून पती जिवंत असताना ती दुसन्याची झाली, तर तिला व्यभिचारिणी असे म्हणतील. पण जर तिचा पती मरण पावला तर ती लग्नाच्या नियमातून मुक्त होते आणि जरी ती दुसऱ्या पुरुषाची पत्नी झाली तरी ती व्यभिचारिणी होत नाही.
4 माझ्या बंधूनो, अशाच प्रकारे नियमशास्त्राप्रमाणे तुम्हांलाही ख्रिस्ताच्या शरीराद्वारे ठार मारण्यात आले यासाठी की तुम्ही दुसऱ्या पुरुषाचे, जो मेलेल्यातून उठविला गेला होता त्याचे व्हावे, यासाठी की देवाच्या सेवेसाठी आमचा वापर व्हावा. 5 कारण जेव्हा आम्ही आमच्या पापी मानवी स्वभावाप्रमाणे जगत होतो तेव्हा पापी वासना नियमशास्त्राच्या द्वारे मरणाला फळ देण्यासाठी आपल्या अवयवामध्ये कार्य करीत होत्या. 6 ज्या नियमशास्त्रामध्ये आम्ही कैदी झालो होतो त्यात आम्ही मेलेलो असल्याने आता आम्ही नियमशास्त्रापासून मुक्त आहोत तेव्हा आता आम्ही देव, आमचा प्रभु याची पवित्र शास्त्राच्या जुनेपणाप्रमाणे नव्हे तर आत्म्याच्या नवेपणाप्रमाणे सेवा करतो.
2006 by World Bible Translation Center