Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उत्पत्ति 22:1-14

अब्राहामा, तुझ्या पुत्राचे माझ्यासाठी होमार्पण कर

22 या गोष्टी घडल्यानंतर देवाने अब्राहामाच्या विश्वासाची कसोटी घेण्याचे ठरवले. देवाने अब्राहामाला हाक मारली, “अब्राहाम”,

आणि अब्राहाम म्हणाला, “मी येथे आहे”

देव म्हणाला, “तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसहाक याला घेऊन तू मोरिया देशात जा आणि तेथे, मी सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमार्पण कर.”

तेव्हा अब्राहाम पहाटेस उठला, त्याने खोगीर घालून आपले गाढव तयार केले; इसहाकाला व दोन सेवकांना आपल्या बरोबर घेतले तसेच होमार्पणाकरिता लाकडे घेतली आणि मग ते सर्व देवाने सांगितलेल्या ठिकाणी गेले. तीन दिवस प्रवास केल्यानंतर अब्राहामाने वर पाहिले तेव्हा काही अंतरावर त्याला जेथे जायचे होते ते ठिकाण दिसले. मग अब्राहाम आपल्या सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवा जवळ थांबा; मी माझ्या मुलाला घेऊन त्या समोरच्या जागी जातो, व देवाची उपासना करुन आम्ही माघारी येतो.”

अब्राहामाने लाकडे घेऊन मुल्याच्या खांद्यावर ठेवली; एक खास सुरा (बळी देण्याकरिता) आणि विस्तव घेतला. मग तो व त्याचा मुलगा असे दोघे जण देवाची उपासना करण्यासाठी होमार्पणाच्या जागेकडे संगती निघाले.

इसहाकाने आपल्या बापास हाक मारली, “बाबा!”

अब्राहामाने उत्तर दिले, “काय माझ्या प्रिय मुला?”

इसहाक म्हणाला, “मला लाकडे व विस्तव दिसतात, परंतु होमार्पणासाठी कोंकरु? ते कोठे आहे?”

अब्राहामाने उत्तर दिले, “माझ्या लाडक्या बाळा, होमार्पणासाठी लागणारे कोंकरु देव आपल्याला योग्यवेळी देईल.”

इसहाक वाचतो

तेव्हा अब्राहाम व त्याचा मुलगा संगती निघाले व देवाने सांगिलेल्या ठिकाणी ते जाऊन पोहोंचले, तेथे अब्राहामाने एक वेदी बांधली, त्याने वेदीवर लाकडे रचली; नंतर त्याने आपला पुत्र इसहाक याला बांधून वेदीवरील लाकडावर ठेवले; 10 मग अब्राहामाने आपल्या मुलाचा बळी देण्यासाठी हातातील सुरा उंचावला.

11 परंतु तेवढ्यात, त्याच क्षणाला परमेश्वराच्या दूताने त्याला थांबवले; तो स्वर्गातून ओरडून त्याला म्हणाला, “अब्राहामा! अब्राहामा!”

अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.”

12 देवदूत म्हणाला, “तू आपल्या मुलाला मारु नकोस, किंवा त्याला कोणत्याही प्रकारची इजा करु नकोस; कारण आता मला खात्रीने समजले की तू देवाला घाबरतोस आणि त्याचा आदर करतोस; कारण तू माझ्यासाठी आपल्या एकुलत्या एका लाडक्या पुत्रालाही, अर्पण करावयास मागेपुढे न पाहता तयार झालास.”

13 आणि मग अब्राहामाने वर दृष्टि करुन सभोंवार पाहिले तेव्हा त्याला एका झुडपात शिंगे अडकलेला एक एडका दिसला; मग त्याने जाऊन तो घेतला व परमेश्वराला होमार्पणासाठी त्याचा बळी दिला. अशा रीतीने अब्राहामाचा मुलगा इसहाक वांचला. 14 तेव्हा अब्राहामाने त्या जागेला, “याव्हे यिरे” असे नाव दिले; आणि आजवर देखील, “या डोंगरावर परमेश्वर दिसू शकतो असे लोक बोलतात.”

स्तोत्रसंहिता 13

प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.

13 परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरुन जाणार आहेस?
    तू मला कायमचाच विसरणार आहेस का?
किती काळापर्यंत तू माझा स्वीकार करायला नकार देणार आहेस? [a]
तू मला विसरला आहेस की नाही याबद्दल मी किती काळ संभ्रमात राहू!
    माझ्या ह्रदयातले हे दुख: मी किती काळ सोसू?
माझे शत्रू माझ्यावर आणखी किती काळापर्यंत विजय मिळवणार आहेत?

परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ.
    माझ्या प्रश्नांचे उत्तर दे.
मला उत्तर कळू दे.
    नाही तर मी मरुन जाईन.
जर तसे घडले तर माझा शत्रू म्हणेले, “मी त्याच्यावर विजय मिळवला”
    माझ्या शत्रूने जर माझा पराभव केला तर तो खूष होईल.

परमेश्वरा, मी तुझ्या प्रेमाखातर तुझ्या मदतीची अपेक्षा केली.
    तू मला वाचवलेस आणि मला सुखी केलेस.
मी परमेश्वरासाठी आनंदाचे गाणे गातो
    कारण त्याने माझ्यासाठी कितीतरी चांगल्या गोष्टी केल्या आहेत.

रोमकरांस 6:12-23

12 यासाठी की तुम्ही पापाच्या वाईट वासना पाळाव्यात म्हणून पापाने तुमच्यावर राज्य करु नये. 13 आणि अनीतिची साधने व्हावीत म्हणून तुम्ही आपल्या शरीराचे अवयव पापाच्या स्वाधीन करु नका. त्याऐवाजी तुम्ही जे मरणातून उठविलेले लोक व जे आता जिवंत आहात ते आपणांला देवाच्या स्वाधीन करा. आपल्या शरीराचे अवयव नीतीची साधने व्हावीत म्हणून देवाच्या स्वाधीन करा. 14 पाप तुम्हांवर राज्य करणार नाही. कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर देवाच्या कृपेच्या अधीन आहात.

नीतिमतेचे दास

15 तर मग आपण काय करावे? आपण नियमशास्त्राधीन नसून देवाच्या कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? 16 खात्रीने नाही. तुम्हांला माहीत नाही काय की जेव्हा तुम्ही स्वतःला आज्ञापालना करता एखाद्याच्या स्वाधीन करता तर ज्याची आज्ञा तुम्ही पाळता त्याचे गुलाम आहात. तुम्ही पापांत चालू शकता किंवा देवाची आज्ञा पाळू शकता. पापांमुळे आध्यात्मिक मरण येते. पण देवाची आज्ञा पाळल्याने तुम्हांला नीतिमत्व मिळते. 17 पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम होता. पाप तुम्हांला काबूत ठेवीत होते. पण देवाचे उपकार मानू या की, ज्या गोष्टी तुम्हांला शिकविल्या गेल्या त्या तुम्ही पूर्णपणे पाळल्या. 18 तुम्हांला पापांपासून मुक्त केले गेले. आणि नीतिमत्वाचे गुलाम करण्यात आले. 19 तुमच्या शरीराच्या दुर्बलतेमुळे व लोकांना समजावे म्हणून मी उदाहरणाचा उपयोग करीत आहे. कारण जसे तुम्ही आपले अवयव अशुद्धतेच्या आणि परिणाम म्हणून गुलाम होण्यासाठी स्वैरतेच्या अधीन केले त्याच रीतीने आता आपल्या शरीराचे अवयव देवाच्या सेवेला नीतिमत्वाचे गुलाम व्हावे म्हणून अर्पण करा.

20 कारण जेव्हा तुम्ही पापाचे गुलाम होता, तेव्हा नीतिमत्वासंबंधाने मोकळे होता. 21 आणि त्यावेळेला तुम्हांला काय फळ मिळाले, त्या गोष्टीची तुम्हांला आता लाज वाटते, ज्याचा शेवट मरण आहे. 22 परंतु आता तुम्हांला पापापासून मुक्त करुन देवाचे गुलाम केले आहे. देवाच्या सेवेसाठी तुमचे फळ तुम्हांला मिळाले आहे व त्याचा शेवटचा परिणाम म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे. 23 कारण पापाची मजुरी मरण आहे. परंतु देवाची ख्रिस्त येशूमध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे.

मत्तय 10:40-42

जे तुमचा आदर-सतकार करतात त्याना देव आशीर्वाद देतो(A)

40 “जी व्यक्ति तुम्हांला स्वीकारते ती व्यक्ति मला स्वीकारते आणि ज्या पित्याने मला पाठविले त्यालाही स्वीकारते. 41 जो कोणी संदेष्ट्यांचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतो, त्याला संदेष्ट्याचे प्रतिफल मिळेल, आणि जो धार्मिकाचा स्वीकार त्याच्या धार्मिकतेसाठी करतो, त्याला धार्मिकाचे प्रतिफळ. 42 मी तुम्हांला खरे सांगतो की, जो कोणी शिष्यांच्या नावाने या लहानातील एकाला केवळ प्यालाभर थंड पाणी प्यायला देईल तो आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center