Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
13 परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरुन जाणार आहेस?
तू मला कायमचाच विसरणार आहेस का?
किती काळापर्यंत तू माझा स्वीकार करायला नकार देणार आहेस? [a]
2 तू मला विसरला आहेस की नाही याबद्दल मी किती काळ संभ्रमात राहू!
माझ्या ह्रदयातले हे दुख: मी किती काळ सोसू?
माझे शत्रू माझ्यावर आणखी किती काळापर्यंत विजय मिळवणार आहेत?
3 परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ.
माझ्या प्रश्नांचे उत्तर दे.
मला उत्तर कळू दे.
नाही तर मी मरुन जाईन.
4 जर तसे घडले तर माझा शत्रू म्हणेले, “मी त्याच्यावर विजय मिळवला”
माझ्या शत्रूने जर माझा पराभव केला तर तो खूष होईल.
5 परमेश्वरा, मी तुझ्या प्रेमाखातर तुझ्या मदतीची अपेक्षा केली.
तू मला वाचवलेस आणि मला सुखी केलेस.
6 मी परमेश्वरासाठी आनंदाचे गाणे गातो
कारण त्याने माझ्यासाठी कितीतरी चांगल्या गोष्टी केल्या आहेत.
5 यहोशाफाट परमेश्वराच्या मंदिरात नवीन अंगणासमोर होता. यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांमध्ये तो उभा राहिला. 6 तो म्हणाला,
“आमच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवा, स्वर्गातील परमेश्वर तूच आहेस. सर्व राष्ट्रांमधल्या सर्व राज्यांचा तूच शास्ता आहेस. सगळे सामर्थ्य आणि सत्ता तुझ्या ठायी आहे. कोणीही तुझ्याविरुध्द जाऊ शकत नाही. 7 तूच आमचा परमेश्वर आहेस या प्रदेशातील रहिवाश्यांना तू हाकलून लावलेस. तुझ्या या इस्राएलांदेखतच तू हे केलेस. तुझा मित्र अब्राहाम याच्या वंशजांना तू ही भूमी कायमची बहाल केलीस. 8 अब्राहामाचे वंशज या प्रदेशात राहिले आणि तुझ्या नावाखातर त्यांनी मंदिर बांधले. 9 ते म्हणाले, ‘तलवार, शासन, रोगराई किंवा दुष्काळ यांच्यारुपाने आमच्यावर अरिष्ट कोसळले असता आम्ही या मंदिरासमोर, आणि तुझ्यापुढे उभे राहू. या मंदिराला तुझे नाव दिले आहे. संकटाच्या वेळी आम्ही तुझा मोठ्याने धावा करु. आमची हाक ऐकून तू आम्हाला सोडव.’
10 “पण यावेळी अम्मोन, मवाब आणि सेइर पर्वत या भागातले हे लोक आहेत. इस्राएल लोक मिसरहून आले तेव्हा इस्राएल लोकांना तू त्यांच्या प्रदेशात प्रवेश करु दिला नाहीस. त्यामुळे इस्राएल लोकांनी तिकडे पाठ फिरवली आणि त्यांचे उच्चाटन केले नाही. 11 पण तेव्हाच त्यांचा नायनाट न केल्याचे हे काय फळ मिळाले पाहा, ते आम्हाला आमच्या प्रदेशातून हुसकावून लावायला निघाले आहेत. हा प्रदेश तू आम्हाला बहाल केला आहेस. 12 देवा, या लोकांना चांगले शासन कर. आमच्यावर चाल करुन येणाऱ्या या भल्या थोरल्या सेनेला तोंड द्यायचे सामर्थ्य आमच्यात नाही. आम्हाला काही सुचेनासे झाले आहे. म्हणून आम्ही मदतीसाठी तुझ्याकडे आलो आहोत.”
7 तुम्ही इतकी चांगली ख्रिस्ती शर्यत धावत होता तर तुम्हाला सत्याचे पालन करण्यास कोणी अडथळा केला? 8 सत्यापासून मन वळवणारे तुमचे कठोर वर्तन ज्याने तुम्हांला बोलाविले त्या देवापासून येत नाही. 9 “थोडेसे खमीर कणकेचा गोळा फुगवून टाकते.” 10 प्रभूमध्ये मला तुमच्याविषयी खात्री आहे की, जे मी तुम्हांला शिकविले त्याच्याशिवाय इतर विचार तुम्ही करणार नाही. परंतु जो तुम्हांला त्रास देत आहे, तो कोणी का असेना, दंड भोगील.
11 बंधूजनहो, काही जण असा आरोप करतात की, अजूनही सुंतेची गरज आहे असा उपदेश मी करतो. जर तसे आहे तर अजूनही माझा छळ का होत आहे? आणि जर मी सुंतेच्या आवश्यकतेविषयी उपदेश करीत असतो तर वधस्तंभाविषयीची तत्वे राहिली नसती. 12 माझी इच्छा आहे की, जे तुम्हामध्ये अस्थिरता उत्पन्र करतात त्यांनी सुंतेबरोबर स्वतःला नामर्द करुन घ्यावे.
2006 by World Bible Translation Center