Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 86:11-17

11 परमेश्वरा, मला तुझे मार्ग शिकव.
    मी जगेन व तुझी सत्ये पाळीन.
तुझ्या नावाचा जप ही माझ्या आयुष्यातली
    सगळ्यात महत्वाची गोष्ट करायला मला मदत कर.
12 देवा, माझ्या प्रभु मी अगदी मनापासून तुझी स्तुती करतो.
    मी तुझ्या नावाला सदैव मान देईन.
13 देवा, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे
    तू माझे मृत्यूलोकापासून रक्षण करतोस.
14 गर्विष्ठ लोक माझ्यावर हल्ला करतात.
    देवा, वाईट लोकांचा समूह मला ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहे
    आणि ते लोक तुला मान देत नाहीत.
15 प्रभु, तू दयाळू आणि कृपाळू देव आहेस.
    तू सहनशील निष्ठावान आणि प्रेमपूर्ण आहेस.
16 देवा, तू माझे ऐकतोस हे मला दाखव.
    तू माझ्यावर दया कर.
मी तुझा दास आहे.
    मला शक्ती दे.
    मी तुझा सेवक आहे मला वाचव.
17 देवा, तू मला वाचवणार आहेस याची प्रचीती मला दाखव.
    माझ्या शत्रूंना ती खूण दिसेल आणि ते निराश होतील.
    तू माझी प्रार्थना ऐकलीस आणि तू मला मदत करणार आहेस हे यावरुन दिसून येईल.

यिर्मया 42:18-22

18 “मग सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव पुढे म्हणतो, ‘मी यरुशलेमवरचा माझा राग व्यक्त करुन दाखविला. यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांना मी शिक्षा केली. त्याचप्रमाणे मिसरमध्ये जाणाऱ्या प्रत्येकावर मी राग प्रकट करीन. दुसऱ्यांना शाप देताना लोक उदाहरण म्हणून तुमचे नाव घेतील. तुम्ही म्हणजे जणू शिवी व्हाल. लोकांना तुमची लाज वाटेल, लोक तुमचा अपमान करतील, तुम्हाला पुन्हा कधीही यहूदा दिसणार नाही.’

19 “यहूदातील वाचलेल्या लोकांनो, ‘मिसरला जाऊ नका.’ असे परमेश्वराने तुम्हाला सांगितले आहे, मी आताच तुम्हाला ताकीद देतो. 20 तुम्ही तुमच्या मृत्यूला कारण होईल, अशी चूक करीत आहात तुम्ही मला परमेश्वराकडे, तुमच्या देवाकडे, पाठविले तुम्ही मला म्हणाला, ‘आमच्यासाठी आपल्या परमेश्वराकडे प्रार्थना कर. परमेश्वराने करायला सांगितलेली प्रत्येक गोष्ट आम्हाला सांग आम्ही परमेश्वराचे ऐकू.’ 21 म्हणून आज मी तुम्हाला परमेश्वराचा संदेश सांगितला आहे. पण तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाची आज्ञा पाळली नाही. परमेश्वराने ज्या गोष्टी तुम्ही कराव्या हे सांगण्यासाठी मला तुमच्याकडे पाठवले होते, त्या गोष्टी तुम्ही केल्या नाहीत. 22 तुम्ही मिसरमध्ये जाऊन राहू इच्छिता. पण मग तुम्ही युद्धात वा उपासमारीने अथवा भयंकर रोगराईने मराल. ह्या गोष्टी तुमच्याबाबत घडतील, ह्याची खात्री बाळगा.”

मत्तय 10:5-23

या बाराजणांना पुढील सूचना देऊन पाठविण्यात आले. यहूदीतर लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. तर त्याऐवजी इस्राएलच्या हरवलेल्या मेंढरांकडे जा. तुम्ही जाल तेव्हा हा संदेश जाहीर करा. स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यांना बरे करा, मृतांना उठावा. कुष्ठरोग्यांना शुद्ध करा. भुते काढा, तुम्हांला फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या. तुमच्या कमरेला सोने, चांदी किंवा तांबे घेऊ नका. 10 सोबत पिशवी घेऊ नका, तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमचे अंगावरचे कपडे असू द्या व पायातील वहाण असू द्या. अधिकचे वस्त्र किंवा वहाणा घेऊ नका. काठी घेऊ नका, कारण काम करणाऱ्याच्या गरजा भागणे आवश्यक आहे.

11 “ज्या कोणत्याही नगरात किंवा खेड्यात तुम्ही जाल, तेथे कोण योग्य व्यक्ति आहे याचा शोध करा आणि तेथून निघेपर्यंत त्या व्यक्तीच्या घरी राहा. 12 त्या घरात प्रवेश करतेवेळे येथे शांति नांदो असे म्हणा. 13 जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांति तेथे राहील पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांति तुमच्याकडे परत येईल. 14 आणि जो कोणी तुम्हांला स्वीकारणार नाही किंवा तुमचे शब्द ऐकणार नाही तेव्हा त्याच्या घरातून किंवा नगरातून बाहेर पडताना तुम्ही आपल्या पायाची धूळ झटकून टाका. 15 मी तुम्हांला खरे सांगतो. न्यायाच्या दिवशी त्या नगारापेक्षा सदोम आणि गमोराला अधिक सोपे जाईल.

येशू छळाविषयी सावध करतो(A)

16 “लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हांस पाठवीत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे सरळ स्वभावी असा. 17 माणसांविषयी सावध असा. कारण ते तुम्हांला न्यायसभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानांमध्ये ते तुम्हांला फटके मारतील. 18 माझ्यामुळे ते तुम्हांला राज्यपाल व राजे यांच्यासमोर आणतील. तुम्ही त्यांच्यापुढे व यहूदीतर लोकांसमोर माझ्याविषयी सांगाल. 19 जेव्हा तुम्हांला अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी काळजी करू नका. त्यावेळेला तुम्ही काय बोलायचे ते सांगितले जाईल. 20 कारण बोलाणारे तुम्ही नसून तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल.

21 “भाऊ आपल्या भावाविरूद्ध व पिता आपल्या मुलाविरूद्ध उठेल आणि त्याला विश्र्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांविरूद्ध उठून त्यांना जिवे मारण्यास देतील. 22 माझ्यामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. पण शेवटपर्यत जो टिकेल तोच तरेल. 23 एका ठिकाणी जर तुम्हांला त्रास दिला जाईल, तर दुसरीकडे जा. मी तुम्हांला खरे सांगतो मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सर्व गावांमध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center