Revised Common Lectionary (Semicontinuous)
घरात संकट
8 इसहाक वाढत राहिला, तो दुधाऐवजी जेवण घेण्याइतक्या वयाचा झाला तेव्हा त्याचे दूध तोडण्याच्या प्रसंगी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली. 9 ह्याच्या आधी साराची मिसर देशाची दासी हागार हिने अब्राहामापासून एका मुलाला जन्म दिला होता; अब्राहाम त्याचाही बाप होता. परंतु आता साराने पाहिले की तो आधीचा मुलगा इसहाकाला चिडवत होता. 10 तेव्हा सारा अब्राहामाला म्हणाली, “त्या दासीला व तिच्या मुलाला येथून बाहेर घालवून द्या; आपल्या मरणानंतर आपल्या मालमत्तेचा वारस इसहाक होईल; या दासीचा मुलगा इसहाकाबरोबर आपल्या मालमत्तेचा वाटेकरी व तुमचा वारस होणार नाही.”
11 ह्या गोष्टीमुळे अब्राहामाला वाईट वाटले व त्याला इश्माएलाची चिंता वाटू लागली; 12 परंतु देव अब्राहामाला म्हणाला, “त्या मुलाबद्दल बिलकूल चिंता करु नकोस, तसेच त्या दासीचीही चिंता करु नकोस. साराच्या इच्छेप्रमाणे कर. इसहाकच तुझा एकटाच वारस होईल. 13 परंतु मी त्या दासीच्या मुलालाही आशीर्वाद देईन; तो तुझा मुलगा आहे म्हणून त्याच्या कुटुंबांपासूनही मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन.”
14 दुसऱ्या दिवशी सकाळी अब्राहामाने भाकरी व पाण्याची पिशवी आणून हागारेला दिली; ती शिदोरी व आपला मुलगा घेऊन हागार तेथून निघाली आणि अब्राहामाने तिची रवानगी केली; हागार तेथून निघून बैर-शेबाच्या वाळवंटात भटकत राहिली.
15 काही वेळाने पिशवीतील सर्व पाणी संपले, एक थेंबही पिण्यासाठी राहिला नाही; तेव्हा हागारेने आपल्या मुलाला एका झुडपाखाली ठेवले; 16 आणि तेथून काही अंतर ती चालून गेली व थांबून तेथे बसली. आपला मुलगा पाण्यावाचून मरेल असे तिला वाटले; त्याचा मृत्यू आपल्याला पाहवणार नाही असे समजून ती तेथे दूर अंतरावर बसली, व हंबरडा फोडून रडू लागली.
17 देवाने मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला; आणि देवाचा दूत स्वर्गातून हागारेला हाक मारुन म्हणाला, “हागारे, तुला काय झाले? भिऊ नकोस; तुझ्या मुलाचे रडणे परमेश्वराने ऐकले आहे 18 ऊठ मुलाला उचलून घे; त्याचा हात धर व त्याला घेऊन पुढे चल; मी त्याच्या पासून एक मोठे राष्ट्र निर्माण करीन.”
19 मग देवाने हागारेला पाण्याची विहीर दिसू दिली. तेव्हा हागार त्या विहिरीपाशी गेली आणि तिने मसक पाण्याने भरली, नंतर आपल्या तहानलेल्या मुलाला तिने पाणी पाजिले.
20 तो मुलगा वाढत असताना देव सतत त्याच्याबरोबर राहिला; इश्माएल वाळवंटात लहानाचा मोठा होऊन शिकारी झाला; तो धनुष्यबाण मारावयास शिकला व तरबेज तिरंदाज झाला; 21 नंतर त्याच्या आईने त्याला मिसर देशातील मुलगी बायको करुन दिली. ते पारानच्या वाळवंटात राहिले.
दावीदाची प्रार्थना
86 मी गरीब, असहाय्य माणूस आहे.
परमेश्वरा माझे ऐक आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दे.
2 परमेश्वरा मी तुझा भक्त आहे.
कृपा करुन माझे रक्षण कर.
मी तुझा सेवक आहे.
तू माझा देव आहेस.
माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून मला वाचव.
3 माझ्या प्रभु, माझ्यावर दया कर
मी दिवसभर तुझी प्रार्थना करीत आहे.
4 प्रभु, माझे जीवन तुझ्या हाती दिले आहे.
मला सुखी कर, मी तुझा सेवक आहे.
5 प्रभु, तू चांगला आणि दयाळू आहेस.
तुझी माणसे तुला मदतीसाठी हाका मारतात, तू त्या माणसांवर खरोखरच प्रेम करतो.
6 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक.
दयेसाठी माझी प्रार्थना ऐक.
7 परमेश्वरा, मी तुझी संकट काळात प्रार्थना करीत आहे.
तू मला उत्तर देशील हे मला माहीत आहे.
8 देवा, इथे तुझ्यासारखा कुणीही नाही.
तू जे केलेस ते कोणीही करु शकणार नाही.
9 प्रभु तूच प्रत्येकाला निर्माण केलेत.
ते सर्व येतील आणि तुझी उपासना करतील आणि तुझ्या नावाला मान देतील अशी मी आशा करतो.
10 देवा, तू महान आहेस.
तू अद्भुत गोष्टी करतोस.
तू आणि फक्त तूच देव आहेस.
16 देवा, तू माझे ऐकतोस हे मला दाखव.
तू माझ्यावर दया कर.
मी तुझा दास आहे.
मला शक्ती दे.
मी तुझा सेवक आहे मला वाचव.
17 देवा, तू मला वाचवणार आहेस याची प्रचीती मला दाखव.
माझ्या शत्रूंना ती खूण दिसेल आणि ते निराश होतील.
तू माझी प्रार्थना ऐकलीस आणि तू मला मदत करणार आहेस हे यावरुन दिसून येईल.
पापात मेलेले पण ख्रिस्तात जिवंत
6 तर मग आपण काय म्हणावे? देवाची कृपा वाढावी म्हणून आपण पापांत राहावे काय? 2 खात्रीने नाही. आपण जे पापाला मेलो ते अजूनही जिवंत कसे राहू? 3 तुम्हांला माहीत नाही का की ज्या आपण प्रभु येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला होता त्या आपला त्याच्या मरणातही बाप्तिस्मा झाला. 4 म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो यासाठी की, पित्याच्या गौरवाने ख्रिस्त जसा मेलेल्यांतून उठविला गेला तसे आम्हीही जीवनाच्या नवीनपणात चालावे.
5 कारण जर त्याच्या मरणाच्या प्रतिरुपाने आपण त्याच्याशी जोडलो आहोत, तर त्याच्या पुनरुत्थानाच्या प्रतिरुपाने त्याच्याशी जोडले जाऊ. 6 आपणांला हे माहीत आहे की, आपल्यातील जुना मनुष्य ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेला यासाठी की आपल्या पापमय शरीराचा नाश व्हावा व यापुढे आपण पापाचे दास होऊ नये. 7 कारण जो कोणी ख्रिस्ताबरोबर मरतो तो पापापासून मुक्त होऊन नीतिमान होतो.
8 आणि जर आपण ख्रिस्ताबरोबर मेलो तर आम्ही विश्वास धरतो की, त्याच्याबरोबर जिवंतही राहू. 9 कारण आम्हांस माहीत आहे की, ख्रिस्त जो मेलेल्यांतून उठविला गेला तो यापुढे मरणार नाही. मरणाची त्याच्यावर सत्ता चालणार नाही. 10 जे मरण तो मेला ते एकदाच पापासाठी मेला, परंतु जे जीवन तो जगतो ते तो देवासाठी जगतो. 11 त्याच रीतीने तुम्ही स्वतःला पापाला मेलेले पण ख्रिस्त येशूमध्ये व देवासाठी जिवंत असे समजा.
24 “विद्यार्थी त्याच्या शिक्षकापेक्षा वरचढ नाही, किंवा नोकर मालकाच्या वरचढ नाही. 25 विद्यार्थी आपल्या शिक्षकासारखा व नोकर आपल्या मालकासारखा होणे, इतके पुरे. जर घराच्या धन्याला त्यांनी बालजबूल म्हटले तर घरातील इतर माणसांना ते किती वाईट नावे ठेवतील!”
लोकांचे नको तर देवाचे भय बाळगा(A)
26 “म्हणून त्यांना भिऊ नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. 27 जे मी तुम्हांला अंधारात सांगतो ते तुम्ही प्रकाशात बोला, आणि कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते तुम्ही छपरावरून गाजवा.
28 “जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्याला भ्या. 29 दोन चिमण्या एका पैशाला विकत नाहीत का? तरीही तुमच्या पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही. 30 आणि तुमच्या डोक्यावरचे केससुद्धा त्याने मोजलेले आहेत. 31 म्हणून घाबरु नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान आहात.
येशूची लाज बाळगू नका(B)
32 “जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील त्याला मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन. 33 पण जो कोणी मनुष्यांसमोर मला नाकारील त्याला मी सुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.
लोक येशूविषयी सहमत होणार नाहीत(C)
34 “असे समजू नका की मी पृथ्वीवर शांती करायला आलो आहे. मी शांति स्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे. 35 मी फूट पाडायला आलो आहे,
‘म्हणजे मुलाला त्याच्या पित्याविरुद्ध
आणि मुलीला तिच्या आईविरुद्ध
सुनेला तिच्या सासूविरुद्ध उभे करायला आलो आहे.
36 सारांश मनुष्याच्या घरचीच माणसे त्याचे शत्रू होतील.’ (D)
37 “जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीति करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीति करतो, तो मला योग्य नाही. 38 जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही. 39 जो आपला जीव मिळवितो तो त्याला गमावील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्याला मिळवील.
2006 by World Bible Translation Center