Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 126

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र

126 परमेश्वर जेव्हा आपली परत सुटका करील
    तेव्हा ते स्वप्नासारखे असेल.
आपण हसत आनंदाचे गाणे गात असू.
    इतर देशांतील लोक म्हणतील,
    “इस्राएलाच्या लोकांसाठी परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली.”
होय, परमेश्वराने जर आपल्यासाठी ती चांगली गोष्ट केली
    तर आपण खूप आनंदी होऊ.

परमेश्वरा, वाळवंटातले झरे पुन्हा पाण्याने भरुन वहायला लागतात.
    तसं आम्हाला पुन्हा मुक्त कर.
एखादा माणूस बी पेरते वेळी दु:खी असू शकेल.
    पण तो जेव्हा पीक गोळा करतो तेव्हा तो आनंदी असतो.
तो जेव्हा बी शेतात नेतो तेव्हा तो दु:खी होईल.
    पण तो जेव्हा धान्य घरी आणतो तेव्हा आनंदी असतो.

नहेम्या 9:1-8

इस्राएलींचा पापाचा कबुलीजबाब

त्याच महिन्याच्या चोविसाव्या दिवशी सर्व इस्राएल लोक उपवासासाठी एकत्र जमले. आपल्याला शोक झाला आहे हे सूचित करणारे कपडे त्यांनी घातले होते. तसेच आपली विमनस्कता दाखवण्यासाठी त्यांनी केसात राख घालून घेतली होती. मूळ इस्राएली लोक परकी लोकांमध्ये न मिसळता वेगळा गट करून उभे होते. इस्राएलींनी मंदिरात उभे राहून आपल्या तसेच आपल्या पूर्वजांच्या पापांची कबुली दिली. तीन तास तिथे उभे राहून त्यांनी परमेश्वर देवाच्या नियमशास्त्राच्या ग्रंथाचे वाचन केले. पुढे आणखी तीन तास त्यांनी आपल्या पातकांचे कबुलीजबाब दिले आणि खाली वाकून परमेश्वराची उपासना केली.

मग लेवी जिन्यावर उभे राहिले. या लेवींची नावे पुढीलप्रमाणे: येशूवा, बानी, कदमीएल, शबन्या, बुन्नी, शेरेब्या बानी, आणि कनानी. त्यांनी खूप मोठयाने परमेश्वर देवाचा धावा केला. मग पुढील हे लेवी पुन्हा बोलले: येशुवा, बानी, कदमीएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदीया, शबन्या आणि पथह्या. ते म्हणाले, “उभे राहा आणि आपला परमेश्वर देव याचे स्तवन करा. देवाचे अस्तित्व पहिल्यापासून आहे आणि परमेश्वर चिरकाल राहील.

“लोक तुझ्या वैभवशाली नावाचे स्तवन करोत.
    तुझे नाम स्तुती आणि आशीर्वाद यांच्या पलीकडे उंचावले जावो.
तू देव आहेस.
    परमेश्वरा, तूच फक्त देव आहेस.
आकाश तू निर्माण केलेस.
    स्वर्ग आणि त्यातील सगळे काही तू केलेस.
ही पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही
    तू निर्माण केलेले आहेस.
सर्व समुद्र आणि त्यांच्यातील सगळ्याचा तूच निर्माता आहेस!
    तू सगळयात जीव ओतलेस.
स्वर्गातील देवदूत तुला वाकून अभिवादन करतात
    व तुझी उपासना करतात.
हे परमेश्वरा, तूच देव आहेस.
    तू अब्रामाची निवड केलीस.
बाबेलमधील (खास्द्यातील) ऊर नगरातून त्याला
    तू बाहेर काढून त्याला अब्राहाम असे नाव दिलेस.
तो तुझ्याशी प्रामाणिक आणि निष्ठावान आहे
    असे पाहून त्याच्याशी तू करार केलास.
कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, यबूसी
    आणि गिर्गाशी यांचा देश त्याला द्यायचे वचन दिलेस.
अब्राहामाच्या वंशजांना हा भूभाग द्यायचे तू वचन दिलेस
    आणि तू ते पाळलेस. कारण, तू भला आहेस.

लूक 6:12-19

येशू त्याच्या बारा शिष्यांना निवडतो(A)

12 त्या दिवसांत असे झाले की, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला. त्याने ती रात्र देवाची प्रार्थना करण्यात घालविली. 13 जेव्हा दिवस उगवला, तेव्हा त्याने शिष्यांना आपणांकडे बोलाविले. त्याने त्यांच्यातील बारा जणांना निवडले व त्यांना “प्रेषित” असे नाव दिले.

14 शिमोनत्याला पेत्र हे सुद्धा नाव दिले,

आंद्रिया (पेत्राचा भाऊ),

याकोब

आणि योहान,

फिलिप्प,

बर्थलमय,

15 मत्तय,

थोमा,

अल्फीचा पुत्र याकोब,

शिमोन ज्याला जिलोट म्हणत,

16 याकोबचा पुत्र यहूदा

व यहूदा इस्कर्योत, जो पुढे विश्वासघात करणारा निघाला.

येशू लोकांना शिकवितो आणि रोग्यांस बरे करतो(B)

17 तो त्यांच्याबरोबर खाली उतरला व सपाट जागेवर उभा राहिला आणि त्याच्या अनुयायांचा मोठा समुदाय तेथे आला होता. व यहूदीया, यरुशलेम, सोर आणि सिदोनच्या समुद्रकिनाऱ्याकडचे असे पुष्कळसे लोक तेथे आले होते. 18 ते तेथे त्याचे ऐकण्यास व त्यांच्या रोगापासून बरे होण्यास आले होते. व ज्यांना अशुद्ध आत्म्यांची बाधा होती त्यांनाही त्यांच्या व्याधींपासून मुक्त करण्यात आले. 19 सगळा लोकसमुदाय त्याला स्पर्श करु पाहत होता. कारण त्याच्यामधून सामर्थ्य येत होते व ते सर्वांना बरे करीत होते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center