Revised Common Lectionary (Semicontinuous)
भेटीस आलेल्या तीन व्यक्ति
18 काही काळानंतर परमेश्वराने अब्राहामाला पुन्हा दर्शन दिले. अब्राहाम तेव्हा मम्रेच्या एलोन झाडांच्या राईत राहात होता. एके दिवशी भर दुपारी कडक उन्हाच्या वेळी अब्राहाम आपल्या तंबूच्या दाराशी बसला होता. 2 अब्राहामाने वर पाहिले तों आपल्या समोर तीन पुरुष उभे असलेले त्याला दिसले; त्यांना पाहून अब्राहाम धावत त्यांना सामोरा गेला आणि त्याने त्यांना लवून नमन केले; 3 अब्राहाम त्यांचे स्वागत करुन म्हणाला, “माझ्या स्वामीनों, मी जो आपला सेवक त्या माझ्या सोबत कृपा करुन काही वेळ राहा; 4 तुमचे पाय धुण्यासाठी मी पाणी घेऊन येतो; तुम्ही झाडा खाली सावलीत अमळ विसावा घ्या; 5 मी तुम्हासाठी थोडी भाकर आणतो; तुम्हाला पाहिजे तेवढे जेवा; मग पुढील प्रवास चालू करा.”
ते तीन पुरुष म्हणाले, “बरं, हे तर ठीक आहे आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो.”
6 अब्राहाम लगेच घाईने पळत तंबूत गेला व साराला म्हणाला, “तिघांना तीन भाकरी पुरतील एवढे पीठ ताबडतोब मळ, त्याच्या भाकरी कर.” 7 नंतर अब्राहाम आपल्या गुरांच्या कळपाकडे पळत गेला, आणि त्यातून त्याने उत्तम कोवळे वासरु घेतले; ते दासाजवळ देऊन त्याने त्याला लवकर कापून जेवणासाठी रांधण्यास सांगितले; 8 अब्राहामाने त्या तीन पुरुषांना वासराचे शिजवलेले मांस, तसेच दूध व लोणी खाण्यासाठी त्यांच्यापुढे वाढले आणि त्यांचे जेवण संपेपर्यंत अब्राहाम राईत झाडाखाली त्यांच्या जवळ त्यांची सेवा करण्याकरीता उभा राहिला.
9 ते पुरुष अब्राहामाला म्हणाले, “तुझी बायको सारा कोठे आहे?”
अब्राहाम म्हणाला, “ती तंबूत आहे.”
10 मग परमेश्वर म्हणाला, “मी पुढल्या वसंत ऋतूत येईन त्या वेळी तुझी बायको सारा हिला मुलगा होईल.”
सारा तंबूच्या तोंडाशी उभी राहून कान देत होती म्हणून या गोष्टी तिने ऐकल्या. 11 अब्राहाम व सारा वयाने फार म्हातारे झाले होते. साराचे मुले होण्याजोगे वय निघून गेले होते. 12 म्हणून साराने जे ऐकले त्यावर विश्वास ठेवला नाहीं. ती स्वतःशीच हसून म्हणाली, “मी म्हातारी झाली आहे, आणि माझा नवराही म्हातारा झाला आहे मी इतकी म्हातारी झाली आहे की आता मला मूल होणे शक्य नाही.”
13 तेव्हा परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, “सारा का हसली? मी आता म्हातारी झाली आहे म्हणून मला मुलगा होईल काय असे ती का म्हणाली? 14 परमेश्वराला काही अशक्य आहे का? येत्या वसंतऋ तूत सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येईन तेव्हा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल.”
15 परंतु सारा म्हणाली, “मी हसलेच नाही!” (ती असे म्हणाली कारण ती फार घाबरली होती.)
परंतु परमेश्वर म्हणाला, “नाही, मला माहीत आहे की हे खरे नाहीं; तू नक्की हसलीसच.”
शेवटी साराला मूल
21 परमेश्वराने साराला दिलेले वचन पाळले व पूर्ण केले. 2 सारा गरोदर राहिली आणि अब्राहामाच्या म्हातारपणी तिने त्याला मुलगा दिला. ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे अगदी जशाच्या तशाच घडून आल्या. 3 अब्राहामापासून साराला मुलगा झाला आणि त्याने त्याचे नाव इसहाक ठेवले. 4 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राहामाने इसहाक आठ दिवसांचा झाल्यावर त्याची सुंता केली.
5 इसहाक जन्मला तेव्हा अब्राहाम शंभर वर्षांचा होता. 6 आणि सारा म्हणाली, “परमेश्वर देवाने मला हास्य म्हणजे आनंदीआनंद दिला आहे. ज्या कोणाला हे समजेल त्या प्रत्येकाला माझ्याबरोबर आनंद होईल. 7 मला आता ह्या वयात अब्राहामापासून मूल होईल असे कोणाला वाटले असते काय? परंतु अब्राहाम म्हातारा झाला असताना देखील मी त्यास मुलगा दिला आहे.”
116 परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो
ते मला खूप आवडते.
2 मी त्याला मदतीसाठी हाक मारतो
आणि ती तो ऐकतो ते मला खूप आवडते.
12 मी परमेश्वराला काय देऊ शकतो?
माझ्या जवळ जे आहे ते मला परमेश्वरानेच दिले आहे.
13 त्याने मला वाचवले म्हणून मी त्याला पेय अर्पण करीन
आणि मी परमेश्वराला त्याच्या नावाने हाक मारीन.
14 मी परमेश्वराला कबूल केलेल्या गोष्टी देईन.
आता मी त्याच्या लोकांसमोर जाईन.
15 परमेश्वराच्या एखाद्या भक्ताचा मृत्यू परमेश्वराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असतो.
परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे.
16 मी तुझा सेवक आहे.
मी तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे.
परमेश्वरा, तू माझा पहिला गुरु आहेस.
17 मी तुला धन्यवाद म्हणून स्तुति अर्पण करीन.
मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.
18 मी कबूल केलेल्या गोष्टी परमेश्वराला देईन.
आता मी त्याच्या सर्व लोकांसमोर जाईन.
19 मी यरुशलेम मध्या मंदिरात जाईन.
परमेश्वराचा जयजयकार करा.
देवाशी नीतिमान
5 ज्याअर्थी विश्वासाने आपल्याला नीतिमान ठरविले आहे त्याअर्थी आपल्या विश्वासाचा परिणाम म्हणून आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे देवाकडून शांति मिळाली आहे. 2 आता आपण ज्या कृपेमध्ये आहोत, त्यात त्याच्याद्धारे विश्वासाने आम्हीसुद्धा प्रवेश मिळविला आहे. आणि आम्ही देवाच्या गौरवाचे भागीदार होण्याच्या आशेने अभिमान बाळगतो. 3 याशिवाय आम्ही संकटांतही अभिमान बाळगतो; कारण आम्हांस ठाऊक आहे की, या संकटांमुळे आम्हांला अधिक धीर येतो. 4 आणि धीराने आम्ही कसोटीस उतरतो आणि कसोटीस उतरल्याने आशा उत्पन्र होते. 5 आणि आशा लाजवित नाही. कारण आपणांस दिलेल्या पवित्र आत्म्याकडून आपल्या अंतःकरणात देवाची प्रीति ओतली आहे.
6 आम्ही जेव्हा आमचे स्वतःचे तारण करण्यासाठी अशक्त होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी आमच्यासाठी मरण पावला. 7 आता नीतिमान मनुष्यासाठी सुध्दा कदाचित कोणी मरणार नाही. एखादा मनुष्य चांगला असेल तर त्याच्यासाठी मरण्याचे धाडस कदाचित कोणीतरी करील. 8 परंतु आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. त्याद्वारे त्याने दाखवून दिले की, तो आमच्यावर फार प्रेम करतो.
येशूला असहाय लोकांविषयी कळवळा वाटतो
35 येशू त्यांच्या सभास्थानांमध्ये शिक्षण देत व राज्याचे शुभवर्तमान गाजवीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे आजार बरे करीत सर्व नगरातून व सर्व खेड्यातून फिरला. 36 आणि जेव्हा त्याने त्रासलेल्या असहाय लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला. कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते कष्टी व पांगलेले होते. 37 तो आपल्या शिष्यांस म्हणाला, “पीक खरोखर फार आहे, पण कामकरी थोडे आहेत. 38 म्हणून तुम्ही पिकाच्या प्रभूची प्रार्थना करा यासाठी की, त्याने आपल्या पिकाची कापणी करायला कामकरी पाठवावेत.”
येशू त्याच्या प्रेषितांना उपदेश करायला पाठवितो(A)
10 येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ बोलाविले, आणि त्याने त्यांना भुते घालविण्याचा अधिकार दिला. तसेच प्रत्येक आजार व दुखणी बरे करण्याचा अधिकार दिला. 2 बारा प्रेषितांची नावे अशी आहेत.
पेत्र (ज्याला शिमोन म्हणत)
आणि त्याचा भाऊ अंद्रिया,
जब्दीचा मुलगा याकोब व
त्याचा भाऊ योहान,
3 फिलीप्प
व बर्थलमय,
थोमा
आणि जकातदार मत्तय,
अल्फीचा मुलगा योकोब
व तद्दय,
4 शिमोन कनानी व पुढे ज्याने
त्याचा विश्वासघात केला तो यहूदा इस्कार्योत.
5 या बाराजणांना पुढील सूचना देऊन पाठविण्यात आले. यहूदीतर लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. 6 तर त्याऐवजी इस्राएलच्या हरवलेल्या मेंढरांकडे जा. 7 तुम्ही जाल तेव्हा हा संदेश जाहीर करा. स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. 8 रोग्यांना बरे करा, मृतांना उठावा. कुष्ठरोग्यांना शुद्ध करा. भुते काढा, तुम्हांला फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या.
9 तुमच्या कमरेला सोने, चांदी किंवा तांबे घेऊ नका. 10 सोबत पिशवी घेऊ नका, तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमचे अंगावरचे कपडे असू द्या व पायातील वहाण असू द्या. अधिकचे वस्त्र किंवा वहाणा घेऊ नका. काठी घेऊ नका, कारण काम करणाऱ्याच्या गरजा भागणे आवश्यक आहे.
11 “ज्या कोणत्याही नगरात किंवा खेड्यात तुम्ही जाल, तेथे कोण योग्य व्यक्ति आहे याचा शोध करा आणि तेथून निघेपर्यंत त्या व्यक्तीच्या घरी राहा. 12 त्या घरात प्रवेश करतेवेळे येथे शांति नांदो असे म्हणा. 13 जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांति तेथे राहील पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांति तुमच्याकडे परत येईल. 14 आणि जो कोणी तुम्हांला स्वीकारणार नाही किंवा तुमचे शब्द ऐकणार नाही तेव्हा त्याच्या घरातून किंवा नगरातून बाहेर पडताना तुम्ही आपल्या पायाची धूळ झटकून टाका. 15 मी तुम्हांला खरे सांगतो. न्यायाच्या दिवशी त्या नगारापेक्षा सदोम आणि गमोराला अधिक सोपे जाईल.
येशू छळाविषयी सावध करतो(A)
16 “लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हांस पाठवीत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे सरळ स्वभावी असा. 17 माणसांविषयी सावध असा. कारण ते तुम्हांला न्यायसभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानांमध्ये ते तुम्हांला फटके मारतील. 18 माझ्यामुळे ते तुम्हांला राज्यपाल व राजे यांच्यासमोर आणतील. तुम्ही त्यांच्यापुढे व यहूदीतर लोकांसमोर माझ्याविषयी सांगाल. 19 जेव्हा तुम्हांला अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी काळजी करू नका. त्यावेळेला तुम्ही काय बोलायचे ते सांगितले जाईल. 20 कारण बोलाणारे तुम्ही नसून तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल.
21 “भाऊ आपल्या भावाविरूद्ध व पिता आपल्या मुलाविरूद्ध उठेल आणि त्याला विश्र्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांविरूद्ध उठून त्यांना जिवे मारण्यास देतील. 22 माझ्यामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. पण शेवटपर्यत जो टिकेल तोच तरेल. 23 एका ठिकाणी जर तुम्हांला त्रास दिला जाईल, तर दुसरीकडे जा. मी तुम्हांला खरे सांगतो मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सर्व गावांमध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही.
2006 by World Bible Translation Center