Revised Common Lectionary (Semicontinuous)
देव अब्रामाला बोलावतो
12 परमेश्वर अब्रामाला म्हणाला,
“तू आपला देश, आपले गणगोत
व आपल्या बापाचे घर सोड;
आणि मी दाखवीन त्या देशात जा.
2 मी तुला आशीर्वाद देईन;
तूझ्या पासून मोठे राष्ट्र निर्माण करीन;
मी तुझे नाव मोठे करीन,
लोक तुझ्या नावाने
इतरांना आशीर्वाद देतील,
3 जे लोक तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन,
आणि जे लोक तुला शाप देतील
त्यानां मी शाप देईन.
तुझ्यामुळे पृथ्वीवरील सर्वलोक आशीर्वादित होतील.”
अब्राम कनान देशात जातो
4 तेव्हा अब्रामाने परमेश्वराची आज्ञा मानली. त्याने हारान सोडले लोट त्याच्या बरोबर गेला. या वेळी अब्राम पंच्याहत्तर वर्षांचा होता. 5 हारान सोडताना तो एकटा नव्हता तर त्याने आपली बायको साराय, पुतण्या लोट आणि हारानमध्ये त्यांनी मिळवलेली मालमत्ता तसेच गुलाम या सर्वांना बरोबर घेऊन त्याने हारान सोडले व तो कनान देशाच्या प्रवासास निघाला आणि कनान देशात आला. 6 अब्राम कनान देशातून प्रवास करीत शखेम गावाते आला आणि मोरेच्या मोठ्या वृक्षांपर्यंत गेला. याकाळी त्या देशात कनानी लोक राहात होते.
7 परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या वंशजांना देईन.”
ज्या जागेवर परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिले त्या जागी त्याने परमेश्वराची उपासना करण्यासाठी एक वेदी बांधली. 8 मग अब्राम तेथून निघाला आणि प्रवास करीत तो बेथेलच्या पूर्वेस डोंगराळ भागात पोहोंचला व त्याने तेथे तळ दिला; तेथून बेथेल पश्चिमेस होते आणि आय शहर पूर्वेस होते; तेथे त्याने परमेश्वरासाठी दुसरी वेदी बांधली आणि देवाची उपासना केली. 9 त्यानंतर अब्राम पुन्हा पुढच्या प्रवासास निघाला व नेगेबकडे गेला.
33 चांगले लोकहो! परमेश्वरापाशी आंनद व्यक्त करा.
न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा.
2 वीणा वाजवून परमेश्वराचे स्तवन करा.
दहा तारांच्या वीणेवर परमेश्वराचे गुणगान गा.
3 त्याच्यासाठी नवे गाणे गा.
आनंदी होउन चांगल्या रीतीने वाजवा.
4 देवाचा शब्द खरा असतो तो जे काही करतो
त्यावर तुम्ही विसंबून राहू शकता.
5 देवाला चांगलुपणा आणि न्यायी वृत्ती आवडते.
परमेश्वराने पृथ्वी त्याच्या प्रेमाने भरुन टाकली.
6 परमेश्वराने आज्ञा केली आणि जगाची निर्मिती झाली
देवाच्या तोंडातल्या श्वासाने पृथ्वीवरील सर्व गोष्टी निर्माण झाल्या.
7 देवाने समुद्रातील पाणी एका ठिकाणी आणले.
तो समुद्राला त्याच्या जागेवर ठेवतो.
8 पृथ्वीवरील प्रत्येकाने परमेश्वराची भीती बाळगली पाहिजे
आणि त्याला मान दिला पाहिजे या जगात राहणाऱ्या प्रत्येकाने त्याला भ्यायला पाहिजे.
9 का? देव फक्त आज्ञा करतो आणि त्याप्रमाणे गोष्टी घडतात.
आणि त्याने जर “थांब” म्हटले तर ती गोष्ट थांबते.
10 राष्ट्रांचा उपदेश कवडी मोलाचा आहे
तो त्यांच्या सगळ्या योजनांचा नाश करु शकतो.
11 परंतु परमेश्वराचा उपदेश सदैव चांगला असतो
त्याच्या योजना पिढ्यानपिढ्या चांगल्या असतात.
12 ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते लोक सुखी आहेत.
देवाने त्यांची विशेष माणसं म्हणून निवड केली.
विश्वासाद्वारे मिळालेले देवाचे अभिवचन
13 अब्राहाम आणि त्याच्या वंशजांना जे अभिवचन मिळाले की, ते जगाचे वारस होतील, ते अभिवचन नियमशास्त्रामुळे आले नाही, तर विश्वासाचा परिणाम असलेल्या नीतिमत्वामुळे आले. 14 लोकांना देवाने दिलेले अभिवचन जर नियमशास्त्र पाळण्याने मिळत असेल तर विश्वास व्यर्थ आहे. आणि देवाने अब्राहामाला दिलेले अभिवचन व्यर्थ आहे. 15 कारण नियमशास्त्र मनुष्यांच्या आज्ञाभंगामुळे देवाचा क्रोध निर्माण करते आणि जेथे नियमशास्त्र नाही, तेथे आज्ञा मोडणेही नाही.
16 म्हणून देवाचे वचन हे विश्वासाचा परिणाम आहे यासाठी की ते कृपेद्वारे मिळावे. अशा रीतीने ते अभिवचन अब्राहामाच्या सर्व संततीला आहे, फक्त नियमशास्त्रावर अवलंबून राहतात अशांसाठीच नव्हे तर अब्राहामाप्रमाणे विश्वासाने जगणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. 17 पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे: “मी तुला पुष्कळ राष्टांचा पिता केले आहे.” [a] अब्राहामाचा देव जो मेलेल्यांना जीवन देतो, जे अस्तित्वात नाही त्यांना अस्तित्वात आणतो त्या देवासमोर हे खरे आहे.
18 आपल्या अंतःकरणात आशा धरुन सर्व मानवाच्या अपेक्षेपेक्षा विरुद्ध असा विश्वास धरला म्हणून, “तुझी संतती ताऱ्यांसारखी अगणित होईल आणि तुझे असंख्य वंशज होतील,” असे जे म्हटले आहे त्याप्रमाणे तो “अनेक राष्टांचा पिता” झाला. 19 अब्राहाम जवळ जवळ शंभर वर्षांचा झाला होता, त्यामुळे त्याचे शरीर मृतवतच झाल्यासारखे होते. तसेच सारेलासुद्धा मूल होणे शक्य नव्हते. अब्राहामाने याविषयी विचार केला होता, तरीपण त्याने त्याचा विश्वास कमकुवत होऊ दिला नाही. 20 देवाने जे अभिवचन दिले आहे त्याविषयी त्याने कधीच संशय बाळगला नाही. त्याने विश्वास ठेवण्याचे कधीच थांबविले नाही. तो विश्वासात बळकट होत गेला आणि त्याने देवाला गौरव दिले. 21 त्याची पूर्ण खात्री होती की, देवाने जे अभिवचन दिले ते पूर्ण करण्यास तो समर्थ आहे. 22 “म्हणूनच त्याला नीतिमान असे गणण्यात आले.” [b] 23 ते अभिवचन केवळ अब्राहामासाठीच होते असे नव्हे, 24 तर आपल्यासाठीसुद्धा होते, ज्याने आपल्या प्रभु येशुला मेलेल्यांतून उठविले आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, 25 येशूला आमच्या पापांकरिता मरण्यासाठी दिले गेले. आणि त्याला मरणातून उठविण्यात आले यासाठी की, देवासमोर आम्ही नीतिमान ठरविले जावे.
येशू मत्तयाची निवड करतो(A)
9 मग येशू तेथून पुढे निघाला, तेव्हा त्याने मत्तय नावाच्या माणसाला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले. तेव्हा येशू त्याला म्हणाला, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठून त्याच्यामागे गेला.
10 येशू मत्तयाच्या घरी जेवत असता, पुष्कळ जकातदार व पापी आले आणि येशू व त्याचे शिष्य यांच्याबरोबर जेवायला बसले. 11 परूशांनी ते पाहिले त्यांनी येशूच्या शिष्यांस विचारले, “तुमचा गुरू जकातदार व पापी यांच्याबरोबर का जेवतो?”
12 येशूने त्यांना हे बोलताना ऐकले, तो त्यांना म्हणाला, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही तर जे आजारी आहेत त्यांना आहे. 13 मी तुम्हांला सांगतो, जा आणि याचा अर्थ काय ते शिका: ‘मला यज्ञपशूंची अर्पणे नकोत, तर दया हवी.’ मी नीतिमान लोकांना नव्हे, तर पापी लोकांना बोलावण्यास आलो आहे.” [a]
येशू मृत मुलीला जीवंत करतो आणि आजारी स्त्रीला बरे करतो(A)
18 येशू या बोधकथा सांगत असता यहुद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी त्याच्याकडे आला व येशूच्या पाया पडून म्हणाला, “माझी मुलगी आताच मेली आहे. परंतु आपण येऊन आपल्या हाताचा स्पर्श केला तर ती पुन्हा जिवंत होईल.”
19 तेव्हा येशू व त्याचे शिष्य त्या सेनाधिकाऱ्याबरोबर निघाले.
20 वाटेत बारा वर्षापासून रक्तस्राव असलेली एक स्त्री मागून येऊन येशूच्या जवळ पोहोंचली व त्याच्या वस्त्राला शिवली. 21 कारण तिने आपल्या मनात म्हटले, “मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईन.”
22 तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, “बाई काळजी करू नकोस! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच क्षणी बरी झाली.
23 मग येशू त्या यहूदी सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरात आला. तेव्हा त्याने बासरी वाजविणाऱ्या व गोंधळ करणाऱ्या जमावाला पाहिले. 24 येशू म्हणाला, “जा, मुलगी मेलेली नाही, ती झोपेत आहे.” तेव्हा लोक येशूला हसले. 25 मग त्या जमावाला बाहेर पाठविल्यावर त्याने आत जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ती मुलगी उठली. 26 आणि ही बातमी त्या प्रांतात पसरली.
2006 by World Bible Translation Center