Revised Common Lectionary (Semicontinuous)
33 चांगले लोकहो! परमेश्वरापाशी आंनद व्यक्त करा.
न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा.
2 वीणा वाजवून परमेश्वराचे स्तवन करा.
दहा तारांच्या वीणेवर परमेश्वराचे गुणगान गा.
3 त्याच्यासाठी नवे गाणे गा.
आनंदी होउन चांगल्या रीतीने वाजवा.
4 देवाचा शब्द खरा असतो तो जे काही करतो
त्यावर तुम्ही विसंबून राहू शकता.
5 देवाला चांगलुपणा आणि न्यायी वृत्ती आवडते.
परमेश्वराने पृथ्वी त्याच्या प्रेमाने भरुन टाकली.
6 परमेश्वराने आज्ञा केली आणि जगाची निर्मिती झाली
देवाच्या तोंडातल्या श्वासाने पृथ्वीवरील सर्व गोष्टी निर्माण झाल्या.
7 देवाने समुद्रातील पाणी एका ठिकाणी आणले.
तो समुद्राला त्याच्या जागेवर ठेवतो.
8 पृथ्वीवरील प्रत्येकाने परमेश्वराची भीती बाळगली पाहिजे
आणि त्याला मान दिला पाहिजे या जगात राहणाऱ्या प्रत्येकाने त्याला भ्यायला पाहिजे.
9 का? देव फक्त आज्ञा करतो आणि त्याप्रमाणे गोष्टी घडतात.
आणि त्याने जर “थांब” म्हटले तर ती गोष्ट थांबते.
10 राष्ट्रांचा उपदेश कवडी मोलाचा आहे
तो त्यांच्या सगळ्या योजनांचा नाश करु शकतो.
11 परंतु परमेश्वराचा उपदेश सदैव चांगला असतो
त्याच्या योजना पिढ्यानपिढ्या चांगल्या असतात.
12 ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते लोक सुखी आहेत.
देवाने त्यांची विशेष माणसं म्हणून निवड केली.
17 मग कदार्लागोमर व त्याच्याबरोबरचे राजे यांचा पराभव केल्यावर अब्राम आपल्या घरी गेला; तेव्हा सदोमाचा राजा शावेच्या खोऱ्यात त्याला भेटावयास गेला. (त्या खोऱ्याला आता राजाचे खोरे असे म्हणतात.)
मलकीसदेक
18 आणि परात्पर देवाचा याजक असलेला शालेमाचा राजा मलकीसदेकही भाकर व द्राक्षारस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला. 19 मलकीसदेकाने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले,
“अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता
परात्पर देव तुला आशीर्वाद देवो.
20 त्या परात्पर देवाने तुझ्या शत्रूंचा पराभव करण्यास तुला मदत केली
त्या परात्पर देवाचा आम्ही धन्यवाद करतो.”
तेव्हा अब्रामाने लढाईच्या काळात त्याच्याजवळून जे जे घेतले होते त्याचा दहावा भाग मलकीसदेकाला दिला. 21 मग सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला, “मला फक्त कैद करुन नेलेले माझे लोक द्या आणि त्यांची मालमत्ता तुम्ही तुमच्यासाठी ठेवा.”
22 परंतु अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “आकाश व पृथ्वीचा निर्माणकर्ता परमेश्वर, परात्पर देव याला मी वचन देतो की, 23 मी तुझे असलेले काहीही ठेवणार नाहीं, एखादे सूत वा जोड्याचा बंधही ठेवणार नाही ‘मी अब्रामाला श्रीमंत केले’ असे तू म्हणावे असे मला वाटत नाही. 24 माझ्या या तरुण माणसांनी जे अन्न खाल्ले आहे तेवढ्याचाच मी स्वीकार करतो; परंतु इतर लोकांना लढाईतून मिळालेल्यापैकी त्यांचा वाटा घेऊ दे, आणि त्यातून काही आनेर, अष्कोल व मम्रे यांस दे, कारण त्यांनी लढाईत मला खूप मदत केली.”
माल्ता बेटावर पौल
28 जेव्हा आमचे पाय सुखरुपपणे तेथील जमीनीला लागले. तेव्हा आम्हांना कळले की, त्या बेटाचे नाव माल्ता असे आहे. 2 तेथील रहिवाश्यांनी आम्हांला अतिशय ममतेने वागविले. त्यांनी एक शेकोटी पेटविली आणि आमचे स्वागत केले. कारण पाऊस पडू लागाला होता. व थंडीही होती. 3 पौलाने काटक्या गोळा केल्या आणि ते त्या शेकोटीत टाकू लागला. उष्णतेमुळे तेथून एक साप निघाला. आणि त्याने पौलाच्या हाताला विळखा घातला. 4 ते पाहून तेथील रहिवासी एकमेकांना म्हणू लागले, “हा मनुष्य खुनी असला पाहिजे. समुद्रातून जरी हा वाचला असला तरी देवाच्या न्यायामुळे याचे आयुष्य संपुष्टातच आले आहे!”
5 परंतु पौलाने तो प्राणी शेकोटीत झटकून टाकला. आणि पौलाला काही अपाय झाला नाही. 6 त्या बेटावरील लोकांना पौलाचे अंग सुजून येईल किंवा पौल एकाएकी मरुन पडेल असे वाटत होते. बराच वेळ वाट पाहूनही पौलाला काहीही विकार झाल्याचे दिसेना, तेव्हा त्या लोकांचे विचार पालटले, आणि पौल देवच आहे असे ते म्हणू लागले.
7 तेथून जवळच पुब्ल्य नावाच्या मनुष्याची शेती होती. पुब्ल्य हा त्या बेटाचा मुख्य अधिकारी होता. त्याने आम्हा सर्वांचे त्याच्या घरी स्वागत केले आणि तीन दिवस आमचा चांगला पाहुणचार केला. 8 पुब्ल्याचे वडील तापाने व हगवणीने आजारी होते. त्यामुळे अंथरुणाला खिळून होते. पौल त्या आजारी व्याक्तिला भेटायला गेला प्रार्थना करुन पौलाने आपला हात त्याच्यावर ठेवला आणि त्या मनुष्याला बरे केले. 9 हे घडलेले पाहिल्यावर त्या बेटावरील इतर आजारी लोक पौलाकडे आले आणि बरे झाले.
10 त्यांनी आम्हांला सन्मानपूर्वक पुष्कळ वस्तू भेटीदाखल दिल्या. आणि जेव्हा आम्ही परत प्रवासाला निघालो तेव्हा आम्हांला लागणाऱ्या अनेक गोष्टी पुरविल्या.
2006 by World Bible Translation Center