Revised Common Lectionary (Semicontinuous)
12 ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते लोक सुखी आहेत.
देवाने त्यांची विशेष माणसं म्हणून निवड केली.
13 परमेश्वराने स्वर्गातून खाली पाहिले.
त्याला सर्व लोक दिसले.
14 त्याने त्याच्या सिंहासनावरुन
पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांकडे पाहिले.
15 देवाने प्रत्येकाचे मन निर्माण केले.
प्रत्येक जण काय विचार करतो ते देवाला माहीत असते.
16 राजा त्याच्या स्वःतच्या सामर्थ्याने सुरक्षित राहू शकत नाही.
शूर सैनिक त्याच्या स्वःतच्या शक्तीमुळे सुरक्षित राहू शकत नाही.
17 घोडे युध्दात विजय मिळवू शकत नाहीत.
त्यांची शक्ती तुम्हाला पळून जायला मदत करु शकत नाही.
18 परमेश्वर त्याच्या भक्तांवर नजर ठेवतो आणि त्यांची काळजी घेतो.
जे लोक त्याची भक्ती करतात त्यांचे तो रक्षण करतो.
19 देव त्यांना मरणापासून वाचवतो ते भुकेले असतील
तेव्हा त्यांना तो शक्ती देतो.
20 म्हणून आपण परमेश्वरासाठी थांबू.
तो आपली मदत आणि ढाल आहे.
21 देव आपल्याला आनंदी करतो.
आम्ही त्याच्या पवित्र नावावर खरोखरच विश्वास ठेवतो.
22 परमेश्वरा, आम्ही मनापासून तुझी उपासना करतो
म्हणून तू तुझे महान प्रेम आम्हाला दाखव.
इस्राएलशी देवाचा पवित्र करार
19 मिसरमधून प्रवासास निघाल्यानंतर तिसऱ्या महिन्यात इस्राएल लोक सीनायाच्या रानात पोहोंचले. 2 ते लोक रफीदीम सोडून सीनायच्या रानात आले होते; त्यांनी होरेब म्हणजे सीनाय पर्वताजवळ आपला तळ दिला. 3 मग मोशे पर्वतावर देवाला भेटावयास गेला तो पर्वतावर असताना देव त्याला म्हणाला, “तू या इस्राएल लोकांना म्हणजे याकोबाच्या वंशजांना सांग, 4 ‘मी माझ्या शत्रुंचे काय करतो ते तुम्ही पाहिले आहे. मिसरच्या लोकांचे मी काय केले आहे आणि गरुड पक्षी आपल्या पिल्लांना सुरक्षित जागी जसा नेतो तसेच मिसरच्या लोकांच्या तावडीतून सुरक्षितपणे तुम्हाला येथे आणले तेही तुम्ही पाहिले आहे. 5 म्हणून मी आता तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्या आज्ञांचे व माझ्या कराराचे पालन करावे; असे तुम्ही कराल तर तुम्ही खास माझे लोक व्हाल हे सर्व जग माझे आहे परंतु त्यातील सर्व लोकांतून मी तुम्हाला निवडून घेईन आणि तुम्ही खास माझे लोक व्हाल. 6 तुम्ही एक पवित्र राष्ट्र-याजक लोकांचे राज्य व्हाल’ या सर्व गोष्टी, मोशे, तू इस्राएल लोकांस सांग.”
7 तेव्हा मोशे पर्वतावरून खाली आला, व त्याने इस्राएल मधील वडिलधाऱ्या माणसांना म्हणजे पुढाऱ्यांना एकत्र बोलावले; परमेश्वराने त्याला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व गोष्टी त्याने त्यांना सांगितल्या; 8 आणि सर्व लोकांनी एकमुखाने उत्तर दिले; ते म्हणाले, “परमेश्वराने सांगितलेल्या सर्व आज्ञा आम्ही पाळू.”
मग मोशे पुन्हा पर्वतावर देवाला भेटावयास गेला आणि लोक त्याच्या आज्ञा पाळतील असे त्याने देवाला सांगितले. 9 आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी दाट ढगात येऊन तुझ्याशी बोलेन आणि माझे तुझ्याबरोबरचे बोलणे सर्व इस्राएल लोकांना ऐकू जाईल; मी हे ह्यासाठी करीन की त्यामुळे तू सांगितलेल्या सर्व गोष्टीवर ते नेहमी विश्वास ठेवतील.”
मग मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले.
पवित्र आत्म्याचे आगमन
2 पन्रासावाचा [a] दिवस आला, तेव्हा सर्व प्रेषित एका ठिकाणी एकत्र होते. 2 अचानक आकाशातून आवाज ऐकू आला. तो आवाज सोसाट्याने वाहणाऱ्या वाऱ्यासारखा होता. ज्या ठिकाणी ते बसले होते ते घर त्या आवाजाने भरुन गेले. 3 त्यांनी अग्नीच्या ज्वालांसारखे काहीतरी पाहिले. त्या ज्वाला विभक्त होत्या. आणि तेथील प्रत्येक मनुष्यावर एक एक अशा उभ्या राहिल्या. 4 ते सर्व पवित्र आत्म्याने भरुन गेले आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. हे करण्यासाठी पवित्र आत्मा त्यांना सामर्थ्य देत होता.
5 त्यावेळी यरुशलेमामध्ये काही फार धार्मिक यहूदी लोक होते. हे लोक जगातील प्रत्येक देशाचे होते. 6 या लोकांपैकी मोठा गट हा आवाज ऐकल्यामुळे तेथे आला.ते आश्चर्यचकित झाले कारण प्रेषित बोलत होते आणि प्रत्येक मनुष्याला त्याची स्वतःची भाषा ऐकायला मिळाली.
7 यामुळे यहूदी लोक अचंबित झाले. त्यांना हे समजत नव्हते की, प्रेषित हे कसे करु शकले. ते म्हणाले, “पाहा! ही माणसे (प्रेषित) ज्यांना आपण बोलताना ऐकत आहोत ती सर्व गालीली [b] आहेत! 8 पण आपण त्यांचे बोलणे आपल्या स्वतःच्या भाषेत ऐकत आहोत. हे कसे शक्य आहे? आपण भिन्र देशाचे आहोतः 9 पार्थी, मेदी, एलाम, मेसोपोटेमिया, यहूदा, कपदुकीया, पंत, आशिया [c] 10 फ्रुगिया, पंफिलीया, इजिप्त, कुरेने शहराजवळचा लिबीयाचा भाग, रोमचे प्रवासी, 11 क्लेत व अरब प्रदेश असे आपण सर्व निरनिराळ्या देशांचे आहोत. आपल्यापैकी काही जन्मानेच यहूदी आहेत. काही जण धर्मांतरीत आहेत. आपण या निरनिराळ्या देशांचे आहोत. परंतु आपण ह्या लोकांचे बोलणे आपापल्या भाषेत ऐकत आहोत! आपण सर्व ते देवाविषयीच्या ज्या महान गोष्टी बोलत आहेत त्या समजू शकतो.”
2006 by World Bible Translation Center