Revised Common Lectionary (Semicontinuous)
येशू वर स्वर्गात घेतला जातो
6 सर्व प्रेषित एकत्र जमले होते. त्यांनी येशूला विचारले, “प्रभूजी, ह्याच काळात यहूदी लोकांना तुम्ही त्यांचे राज्य पुन्हा देणार काय?”
7 येशू त्यांना म्हणाला, “केवळ पित्यालाच तारीख व वेळ ठरविण्याचा अधिकार आहे. ह्या गोष्टीची माहिती असणे तुम्हा कडे नाही. 8 परंतु पवित्र आत्मा तुम्हांकडे येईल. मग तुम्हांला शक्ति मिळेल. तुम्ही माझे साक्षी व्हाल. तुम्ही लोकांना माइयाविषयी सांगाल. पहिल्यांदा यरुशलेम येथील लोकांना तुम्ही सांगाल. नंतर तुम्ही यहूदीया, शोमरोन व जगाच्या सर्व भागात सांगाल.”
9 नंतर येशूने प्रेषितांना या गोष्टी सांगितल्यावर, तो आकाशात उचलला गेला. प्रेषित हे पाहत असताना येशू ढगाआड गेला. आणि ते त्याला पाहू शकले नाहीत. 10 येशू दूर जात होता, आणि प्रषित आकाशात पाहत असताना पांढरी वस्त्रे परीधान केलेले दोन पुरुष (देवदूत) अचानक त्यांच्याजवळ येऊन उभे राहिले. 11 आणि ते दोघे प्रेषितांना म्हणाले, “गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे पाहत येथे का उभे राहिलात? हा येशू तुमच्यापासून जसा वर स्वर्गात घेतला गेला व त्याला (येशूला) जाताना तुम्ही पाहिलेत त्याच मार्गाने तो परत येईल.”
एक नवा प्रेषित निवडण्यात येतो
12 नंतर प्रेषित जैतुनाच्या डोंगरावरुन यरुशलेमास परत गेले. (हा डोंगर यरुशलेमापासून एक किलोमीटर अंतरावर आहे.) 13 प्रेषित शहरात परत आल्यावर ज्या ठिकाणी मुक्कामाला होते, त्या ठिकाणी गेले. ही माडीवरची खोली होती. त्या ठिकाणी हे प्रेषित होते: पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय, याकोब (अल्फीचा पुत्र), शिमोन (झिलोट [a] म्हणून माहित असलेला) आणि यहूदा (याकोबाचा पुत्र).
14 हे सर्व प्रेषित एकत्र राहत होते. ते एकाच उद्देशाने सतत प्राथेना करीत होते. काही स्त्रिया, मरीया येशूची आई आणि त्याचे भाऊ प्रेषितांबरोबर होते.
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तुतिगीत
68 देवा, ऊठ आणि तुझ्या वैऱ्यांची दाणादाण उडव.
त्याचे सगळे वैरी त्याच्यापासून दूर पळोत.
2 तुझे वैरी वाऱ्यावर दूरवर जाणाऱ्या धुरासारखे दूरवर जावोत.
आगीत वितळणाऱ्या मेणाप्रमाणे तुझ्या वैऱ्यांचा सर्वनाश होवो.
3 परंतु चांगले लोक आनंदात आहेत.
चांगल्या लोकांचा देवाबरोबर आनंदात वेळ जातो.
चांगले लोक आनंदात जगतात आणि सुखी होतात.
4 देवासाठी गाणे म्हणा त्याच्या नावाचे गुणगान करा,
देवासाठी रस्ता तयार करा.
तो त्याच्या रथात बसून वाळवंटातून जातो त्याचे नाव याह आहे.
त्याच्या नावाची स्तुती करा.
5 देव त्याच्या पवित्र मंदिरात अनाथांचा बाप होतो.
तो विधवांची काळजी घेतो.
6 देव एकाकी लोकांना घर देतो,
देव त्याच्यामाणसांना तुंरुगातून बाहेर काढतो, ते फार आनंदी आहेत.
परंतु जे लोक देवाच्या विरुध्द जातात ते त्याच्या आगीसारख्या तुरुंगात राहातील.
7 देवा, तू तुझ्या माणसांना मिसरमधून बाहेर काढलेस.
तू वाळवंटातून चालत गेलास.
8 आणि भूमी थरथरली.
देव, इस्राएलचा देव सिनाय डोंगरावर आला आणि आकाश वितळायला लागले.
9 देवा, थकलेल्या जीर्ण झालेल्या भूमीला पुन्हा
शक्ती येण्यासाठी तू पाऊस पाठवलास.
10 तुझे प्राणी पुन्हा त्या ठिकाणी आले.
देवा, तू तिथल्या गरीब लोकांना बऱ्याच चांगल्या वस्तू दिल्यास.
32 पृथ्वीवरच्या राजांनो, देवासाठी गाणे म्हणा,
त्याच्यासाठी स्तुतिगीते गा.
33 देवासाठी गाणे म्हणा देव पुरातन आकाशातून त्याचा रथ नेतो,
त्याचा जोरदार आवाज ऐका.
34 तुमच्या इतर देवांपेक्षा हा देव अधिक शक्तिमान आहे.
इस्राएलाचा देव त्याच्या लोकांना
अधिक शक्तिमान बनवतो.
35 देव त्याच्या मंदिरात भीतिदायक दिसतो.
इस्राएलचा देव त्याच्या लोकांना शक्ती आणि सामर्थ्य देतो.
देवाचे गुणगान करा.
ख्रिस्ती म्हणून दु:ख सहन करणे
12 प्रिय मित्रांनो, तुमच्यावर मोठे संकट येऊन तुमची कसोटी होते तेव्हा नवल वाटून घेऊ नका. 13 त्याऐवजी, तुम्ही ख्रिस्ताच्या दु:खसहनाचे भागीदार झाल्याबद्दल आनंद करा. यासाठी की, जेव्हा त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हा तुम्ही आनंदाने आरोळी मारावी. 14 जर तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहात म्हणून कोणी तुमचा अपमान केला तर तुम्ही धन्य आहात. कारण देवाचा गौरवी आत्मा तुमच्यावर विसावतो.
6 देवाने योग्य वेळी तुम्हांस उंच करावे यासाठी देवाच्या बलशाली हाताखाली लीनतेने राहा. 7 तुमच्या सर्व चिंता देवावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो,
8 सावध आणि जागरुक असा. तुमचा वैरी जो सैतान तो गर्जना करीत फिरणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून सगळीकडे फिरत असतो. 9 त्याचा विरोध करा आणि तुमच्या विश्वासात खंबीर राहा. कारण तुम्हाला माहीत आहे की, जगभर असलेल्या बंधूभगिनींना अशाच प्रकारचे दु:ख सहन करावे लागले, जसे तुम्ही सध्या अनुभवीत आहात.
10 परंतु काही काळ दु:ख सहन केल्यानंतर सर्व कृपेचा उगम जो देव, ज्याने येशू ख्रिस्ताच्या अनंतकाळच्या गौरवात भागीदार होण्यासाठी तुम्हाला पाचारण केले तो स्वतः तुम्हाला पुन्हा खंबीरपणे उभे करील. तुम्हाला सामर्थ्य देईल. तुम्हाला स्थिरता देईल. 11 त्याचे सामर्थ्य अनंतकाळचे आहे! आमेन.
येशू त्याच्या अनुयायांसाठी प्रार्थना करतो
17 येशूने हे बोलणे संपविल्यावर आपले डोळे आकाशाकडे लावले आणि प्रार्थना केली: “पित्या, वेळ आली आहे, पुत्राचे गौरव कर, यासाठी की, पुत्र तुझे गौरव करील. 2 तू त्याला जे दिले आहे त्या सर्वांना त्याने अनंतकालचे जीवन द्यावे यासाठी सर्व मनुष्यांवर तू त्याला अधिकार दिलास त्याप्रमाणे त्याने तुझे गौरव करावे. 3 आणि अनंतकाळचे जीवन हेच की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. 4 तू मला जे काम करायला दिले ते संपवून मी पृथ्वीवर तुला गौरविले. 5 तर आता हे पित्या, जग होण्यापूर्वी तुझ्याबरोबर जे गौरव मला होते त्याद्वारे तू स्वतःबरोबर माझे गौरव कर.
6 “ज्यांना तू मला या जगातून दिलेस, त्यांना मी तुला प्रगट केले. ते तुझे होते, व तू त्यांना माझ्या स्वाधीन केलेस. आणि त्यांनी तुझे वचन पाळले, 7 आता त्यांना माहीत आहे की, जे काही तू मला दिले आहेस ते तुझ्यापासून येते. 8 कारण जी वचने तू मला दिली आहेस ती मी त्यांना दिली. आणि त्यांनी ती स्वीकारली, त्यांना निश्चितार्थाने माहीत होते की, मी तुझ्यापासून आलो आहे. आणि त्यांनी विश्वास ठेवला की तू मला पाठविले आहेस. 9 मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, मी जगासाठी प्रार्थना करीत नाही. तर ज्यांना तू माझ्या स्वाधीन केलेस, त्यांच्यासाठीच कारण ते तुझे आहेत. 10 माझ्याकडे जे काही आहे ते तुझे आहे आणि जे तुझे आहे ते माझे आहे. आणि त्यांच्याद्वारे गौरव माझ्याकडे आले आहे.
11 “आणि यापुढे मी जगात नाही, ते जगात आहेत, आणि मी तुझ्याकडे येत आहे, हे पवित्र पित्या, जे नाव तू मला दिले आहेस, त्या तुझ्या नावात त्यांना राख, यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे.
2006 by World Bible Translation Center