Revised Common Lectionary (Semicontinuous)
93 परमेश्वर राजा आहे.
त्याने ऐश्वर्य आणि सामर्थ्य वस्त्राप्रमाणे पांघरले आहे.
तो सज्ज आहे त्यामुळे सर्व जग सुरक्षित आहे.
ते कंपित होणार नाही.
2 देवा, तुझे राज्य कायमचे अस्तित्वात राहिले आहे.
देवा, तू सदैव जीवंत आहेस.
3 परमेश्वरा, नद्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे.
आदळणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे.
4 समुद्राच्या आदळणाऱ्या लाटा फार ताकदवान आहेत आणि
त्यांचा आवाज खूप मोठा आहे.
परंतु वरचा परमेश्वर अधिक ताकदवान आहे.
5 परमेश्वरा, तुझे नियम सदैव राहातील. [a]
तुझे पवित्र मंदिर खूप काळ उभे राहील.
एलीयाला घेऊन जाण्याची परमेश्वराची योजना
2 एका वावटळीद्वारे एलीयाला स्वर्गास परमेश्वराने घेऊन जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपली होती. एलीया अलीशाबरोबर गिलगालला गेला.
2 एलीया अलीशाला म्हणाला, “तू येथेच थांब कारण परमेश्वराने मला बेथेलला जायला सांगितले आहे.”
पण अलीशा म्हणाला, “परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो की मी तुम्हाला अंतर देणार नाही.” तेव्हा ते दोघेही जण बेथेल येथे गेले.
3 तेव्हा संदेष्ट्यांचा बेथेलमधला एक गट अलीशाला येऊन भेटला. आणि म्हणाला, “आज तुझ्या स्वामीला परमेश्वर घेऊन जाणार आहे हे तुला माहीत आहे ना?”
अलीशा म्हणाला, “होय, मला माहीत आहे, पण ह्या विषयासबंधी बोलू नका”
4 एलीया अलीशाला म्हणाला, “तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यरीहो येथे जायला सांगितले आहे.”
पण अलीशा म्हणाला, “परमेश्वराची शपथ, मी तुम्हाला सोडून राहणार नाही.” तेव्हा ते दोघे यरीहोला गेले.
5 तेव्हा यरीहोचे संदेष्टे अलीशाकडे आले आणि म्हणाले, “परमेश्वर तुझ्या स्वामीला आज घेऊन जाणार आहे हे तुला माहीत आहे का?”
अलीशा म्हणाला, “हो, मला कल्पना आहे, पण त्याबद्दल आता बोलू नका.”
6 एलीया अलीशाला म्हणाला, “तू तेथेच थांब कारण परमेश्वराने मला यार्देन नदीवर जायला सांगितले आहे.”
अलीशा म्हणाला, “परमेश्वराची आणि तुमच्या आयुष्याची शपथ, मी तुम्हाला अंतर देणार नाही.” तेव्हा ते दोघे तसेच पुढे निघाले.
7 संदेष्ट्यांपैकी पन्नास जण त्यांच्या मागोमाग निघाले. एलीया आणि अलीशा यार्देन नदीजवळ थांबले. ते पन्नास जण मात्र बरेच लांब उभे राहिले. 8 एलीयाने आपला अंगरखा अंगातून काढला त्याची घडी घातली आणि पाण्यावर आपटली. त्याबरोबर पाणी मधोमध उजवीकडे आणि डावीकडे दुभंगले. अलीशा आणि एलीया मधल्या कोरडया वाटेने नदी पार करुन गेले.
9 नदी ओलांडल्यावर एलीया अलीशाला म्हणाला, “परमेश्वराने मला येथून घेऊन जायच्या अगोदर तुला माझ्याकडून काही हवे असल्यास सांग.”
अलीशा म्हणाला, “तुमच्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.”
10 एलीया म्हणाला, “ही तर फारच कठीण गोष्ट तू मागितलीस. मला तुझ्या जवळून घेऊन जातील तेव्हा तुला मी दिसलो तर हे शक्य आहे. नाहीतर नाही.”
परमेश्वर एलीयाला स्वर्गात नेतो
11 एलीया आणि अलीशा बोलत बोलत पुढे चालले होते. तेवढयात अचानक काही घोडे आणि एक रथ तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी एलीया आणि अलीशाला एकमेकांपासून दूर केले. तो रथ आणि घोडे अग्नीप्रमाणे होते नंतर एका वावटळीमधून एलीया स्वर्गात गेला.
12 अलीशाने ते पाहिले आणि तो ओरडू लागला, “माझ्या बापा! माझ्या बापा! काय हा इस्राएलचा रथ आणि हे स्वर्गीय घोडे स्वार!”
अलीशाला एलीयाचे पुन्हा कधीच दर्शन झाले नाही. अलीशाने दु:खाच्या भरात आपले कपडे फाडले.
मरणाकडून जीवनाकडे
2 पूर्वी तुम्ही आपले अपराध आणि पातके यांमुळे आध्यात्मिक रीतीने मेला होता. 2 ज्यामध्ये तुम्ही पूर्वी जगत होता, जगातील दुष्ट मार्गाचे अनुकरण करीत होता, आणि आपल्याला न दिसणारे आध्यात्मिक सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्या सताधीशाचे अनुकरण करीत होता. जे देवाच्या आज्ञा पाळीत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये हाच आत्मा कार्य करीत आहे. 3 एके काळी आम्हीसुद्धा त्यांच्यामध्ये आमच्या मानवी देहाच्या दुष्ट इच्छांचे समाधान करीत होतो आणि आमच्या मानवी मनाच्या दुष्ट वासनांची पूर्तंता करीत होतो. तसेच जगातील इतरांप्रमाणेच आम्ही त्याच्या क्रोधाची मुले झालो होतो.
4 पण देव खूप दयाळू आहे. त्याच्या महान प्रीतिने त्याने आमच्यावर प्रेम केले. 5 आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या आमच्या पापांमध्ये मेलेले असतानाच त्याने आम्हांला ख्रिस्ताबरोबर जीवन दिले. (तुमचे तारण देवाच्या कृपने झाले आहे.) 6 देवाने आम्हांला ख्रिस्ताबरोबर नविन जीवनात उठविले आणि स्वर्गाच्या राज्यात त्याच्याबरोबर त्याच्या आसनावर बसविले, कारण आम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहोत. 7 देवाने हे केले यासाठी की, येणाऱ्या युगात त्याच्या अतुलनीय कृपेची संपत्ती दाखविता यावी आणि ख्रिस्त येशूमध्ये आम्हांविषयीची ममता व्यक्त करावी.
2006 by World Bible Translation Center