Revised Common Lectionary (Semicontinuous)
93 परमेश्वर राजा आहे.
त्याने ऐश्वर्य आणि सामर्थ्य वस्त्राप्रमाणे पांघरले आहे.
तो सज्ज आहे त्यामुळे सर्व जग सुरक्षित आहे.
ते कंपित होणार नाही.
2 देवा, तुझे राज्य कायमचे अस्तित्वात राहिले आहे.
देवा, तू सदैव जीवंत आहेस.
3 परमेश्वरा, नद्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे.
आदळणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे.
4 समुद्राच्या आदळणाऱ्या लाटा फार ताकदवान आहेत आणि
त्यांचा आवाज खूप मोठा आहे.
परंतु वरचा परमेश्वर अधिक ताकदवान आहे.
5 परमेश्वरा, तुझे नियम सदैव राहातील. [a]
तुझे पवित्र मंदिर खूप काळ उभे राहील.
नवा नेता यहोशवा
31 मग मोशेने सर्व इस्राएलांना ह्या गोष्टी सांगितल्या. 2 तो म्हणाला, “मी आता एकशेवीस वर्षाचा आहे. माझ्याने आता तुमचे नेतृत्व होत नाही. शिवाय ‘यार्देन नदीपलीकडे जायचे नाही असे,’ परमेश्वरानेही मला सांगितले आहे. 3 तुमचा देव परमेश्वर हा तुम्हांला साथ देईल. तुमच्यासाठी तो इतर राष्ट्रांना पराभूत करील. त्यांच्याकडून तुम्ही त्या प्रदेशाचा ताबा घ्याल. पण परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे यहोशवा तुमचे नेतृत्व करील.
4 “अमोऱ्यांचे राजे सीहोन आणि ओग यांचा परमेश्वराने संहार केला. तसेच तो याही वेळी तुमच्यासाठी करील. 5 या राष्ट्रांचा पराभव करण्यात परमेश्वराचे तुम्हाला साहाय्य होईल. पण त्यावेळी, मी सांगितले तसे तुम्ही वागले पाहिजे. 6 शौर्य दाखवा. खंबीर पणाने वागा. त्या लोकांची भीती बाळगू नका! कारण प्रत्यक्ष तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तो तुम्हाला अंतर देणार नाही, तुमची साथ सोडणार नाही”
7 मग मोशेने यहोशवाला बोलावले. सर्वांसमक्ष त्याला सांगितले, “खंबीर राहा आणि शौर्य गाजव. या लोकांच्या पूर्वजांना परमेश्वराने जी भूमी द्यायचे कबूल केले आहे, तेथे तू त्यांना नेणार आहेस. ती काबीज करायला या इस्राएलांना तू मदत कर. 8 परमेश्वर तुमच्या सोबतीला तुमच्यापुढेच चालणार आहे. तो तुम्हाला सोडून जाणार नाही, तुम्हाला अंतर देणार नाही. तेव्हा खचून जाऊ नका आणि निर्भय व्हा.”
मोशे शिकवण लिहून काढतो
9 नंतर मोशेने सर्व नियमशास्त्र लिहून याजकांना दिले. हे याजक लेवी वंशातील होते. परमेश्वराच्या कराराचा पवित्र कोश वाहण्याचे काम त्यांचे होते. इस्राएलच्या वडिलधाऱ्या लोकांनाही मोशेने हे नियमशास्त्र दिले. 10 मग मोशे वडीलधाऱ्या लोकांशी बोलला. तो म्हणाला, “दर सात वर्षांच्या अखेरीला म्हणजेच कर्ज माफीच्या ठराविक वर्षी मंडपाच्या सणाच्या वेळी ही शिकवण तुम्ही सर्वांना वाचून दाखवा. 11 यावेळी सर्व इस्राएलांनी तुमचा देव परमेश्वर ह्याने त्याच्यासाठी निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जमावे. तेव्हा त्यांना ऐकू जाईल अशा पद्धतीने तुम्ही हे नियमशास्त्र वाचून दाखवावे. 12 पुरुष, बायका, लहान मुले, गावातील परकीय अशा सर्वांना यावेळी एकत्र आणावे. त्यांनी ही शिकवण ऐकावी, परमेश्वर देवाचा आदर करावा. शिकवणीचे जीवनात आचरण करावे. 13 ज्या पुढच्या पिढीला ही शिकवण माहीत नव्हती त्यांना ती माहीत होईल. लौकरच तुम्ही जो देश आपलासा करायला चालला आहात तेथे ही मुलेबाळेही तुमचा देव परमेश्वर ह्यच विषयी आदर बाळगतील.”
दु:ख आनंदामध्ये बदलेल
16 “थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही, नंतर थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.”
17 त्याच्या शिष्यांतील काही जण एकमेकांस म्हणाले, “तो असे म्हणतो याचा अर्थ काय? थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही. मग थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. कारण मी पित्याकडे जात आहे!” 18 ते विचारतच राहिले, “‘थोड्या वेळाने याचा अर्थ काय?’ तो काय म्हणत आहे हे आम्हांला समजत नाही.”
19 येशूने पाहिले की, याविषयी त्यांना काही विचारायचे आहे. म्हणून तो त्यांना म्हणाला, “तुम्ही एकमेकांना हे विचारीत आहात काय की, जेव्हा मी म्हणालो, ‘थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही, आणि मग थोडया वेळाने तुम्ही मला पाहाल?’ 20 मी तुम्हांला खरे सांगतो. जग आनंद करीत असताना तुम्ही रडाल आणि शोक कराल, तुम्ही दु:खी व्हाल, पण तुमचे दु:ख आनंदात बदलेल.
21 “जन्म देणाऱ्या स्त्रीला वेदना होतात कारण तिची वेळ आलेली असते. पण जेव्हा बाळ जन्मते तेव्हा ती सर्व वेदना विसरते. कारण एक बाळ या जगात जन्म घेते. 22 त्याप्रमाणे तुम्हाला आता खरोखर दु:ख आहे, पण मी तुम्हांला पुन्हा भेटेन, आणि तुम्ही आनंद कराल आणि कोणीही तुमचा आनंद हिरावून घेणार नाही. 23 त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे काही मागणार नाही, मी खरे सांगतो. माझ्या नावाने जे काही तुम्ही मागाल ते माझा पिता तुम्हांला देईल. 24 आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल आणि तुमचा आनंद परिपूर्ण होईल.
2006 by World Bible Translation Center