Revised Common Lectionary (Semicontinuous)
93 परमेश्वर राजा आहे.
त्याने ऐश्वर्य आणि सामर्थ्य वस्त्राप्रमाणे पांघरले आहे.
तो सज्ज आहे त्यामुळे सर्व जग सुरक्षित आहे.
ते कंपित होणार नाही.
2 देवा, तुझे राज्य कायमचे अस्तित्वात राहिले आहे.
देवा, तू सदैव जीवंत आहेस.
3 परमेश्वरा, नद्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे.
आदळणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे.
4 समुद्राच्या आदळणाऱ्या लाटा फार ताकदवान आहेत आणि
त्यांचा आवाज खूप मोठा आहे.
परंतु वरचा परमेश्वर अधिक ताकदवान आहे.
5 परमेश्वरा, तुझे नियम सदैव राहातील. [a]
तुझे पवित्र मंदिर खूप काळ उभे राहील.
लोकांना देवाची दहशत
22 पुढे मोशे, म्हणाला, “ही वचने परमेश्वराने अग्नी, मेघ आणि घनदाट अंधार यातून तुम्हाला मोठ्या आवाजात सांगितली. तेव्हा तुम्ही त्या पर्वताशी एकत्र जमला होता. एवढे सांगितल्यावर अधिक न बोलता त्याने ती दोन दगडी पाट्यांवर लिहून माझ्याकडे दिली.
23 “पर्वत धगधगून पेटलेला असताना तुम्ही त्याची वाणी काळोखातून ऐकलीत. तेव्हा तुमच्या वंशातील वडीलधारे आणि प्रमुख माझ्याकडे आले. 24 आणि म्हणाले, ‘आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हाला त्याचे तेज आणि महानता दाखवली आहे. त्याला प्रत्यक्ष अग्नीतून बोलताना आम्ही ऐकले. देव माणसाशी बोलला तरी माणूस जगू शकतो हे आम्ही पाहिले आहे. 25 पण पुन्हा परमेश्वर देव आमच्याशी बोलला तर आम्ही नक्की मरु. तो भयंकर अग्नी आम्हाला बेचिराख करील. आणि आम्हाला मरायचे नाही. 26 साक्षात देवाला अग्नीतून बोलताना ऐकूनही नंतर जिवंत राहिला आहे, असा आमच्याखेरीज कोणी ही नाही. 27 तेव्हा मोशे, तूच आपला देव परमेश्वर ह्याच्या जवळ जाऊन त्याचे म्हणणे ऐकून घे. आणि मग ते आम्हाला सांग. आम्ही ते ऐकून त्याप्रमाणे वागू.’
परमेश्वराचा मोशेशी संवाद
28 “हे तुमचे बोलणे परमेश्वराने ऐकले. तो मला म्हणाला, ‘मी सर्व ऐकलेले आहे आणि ते ठीकच आहे. 29 ते माझ्याशी आदराने वागले, माझ्या आज्ञा मनापासून पाळल्या तर त्यांचे व त्यांच्या वंशजांचे निरंतर कल्याण होईल. एवढेच मला त्यांच्याकडून हवे आहे.
30 “‘त्यांना म्हणावे तुम्ही परत आपापल्या जागी जा. 31 पण मोशे तू इथेच थांब. त्यांना द्यायच्या सर्व आज्ञा, विधी नियम मी तुला सांगतो. त्यांना मी जो देश वतन म्हणून देत आहे तेथे त्यांनी ते पाळावे.’
32 “तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपले आचरण राहील याची खबरदारी घ्या. त्यालाच अनुसरा. 33 तुमचा देव परमेश्वर ह्याने दाखवलेल्या मार्गानेच चाला. म्हणजे तुम्हाला वतन दिलेल्या प्रदेशात तुम्ही सुखाने व दीर्घकाळ रहाल.
चांगल्या कामासाठी दु:ख सोसणे
8 शेवटी सारांश हा की, तुम्ही सर्वजण एकमेकांशी विचार व भावना यांच्या ऐक्याने, सहानुभूतीने आपल्या भाऊबहिणींशी प्रेमाने, दयाळूपणे आणि नम्रतेने राहा. 9 वाइटाची परतफेड वाइटाने करु नका, किंवा अपमानाची फेड अपमानाने करु नका. उलट, त्या व्यक्तीसाठी देवाकडे आशीर्वाद मागा. कारण देवाने तुम्हाला हे करण्यासाठीच बोलाविले होते. यासाठी की, तुम्हाला देवाचा आशीर्वादाचा वारसा मिळावा. 10 पवित्र शास्त्र म्हणते,
“ज्याला जीवनाचा आनंद उपभोगायचा आहे,
व चांगले दिवस पहावयाचे आहेत,
त्याने आपली जीभ वाईट बोलण्यापासून आवरली पाहिजे,
आणि त्याने आपल्या ओठांनी खोट्या गोष्टी बोलू नयेत.
11 दुष्टतेपासून त्याने दूर व्हावे व चांगले ते करावे.
त्याने शांतीचा शोध करुन ती मिळविली पाहिजे
12 जे नीतिमान लोक आहेत त्यांच्यावर प्रभुची नजर असते
आणि त्यांच्या प्रार्थना तो कान देऊन ऐकतो
पण जे वाईट गोष्टी करतात त्यांच्याकडे प्रभु पाठ फिरवितो.” (A)
2006 by World Bible Translation Center