Revised Common Lectionary (Semicontinuous)
22 मग पौल अरीयपगाच्या सभेपुढे उभा राहिला, पौल म्हणाला, “अर्थनैच्या लोकांनो, मी पाहत आहे की, सर्व गोष्टींमध्ये तुम्ही फार धर्मिक आहात. 23 मी तुमच्या शहरातून जात होतो आणि ज्यांची तुम्ही उपासना करता ते मी पाहिले. मी एक वेदी पाहिली. त्यावर असे लिहिले होते: ‘अज्ञात देवाला’. तुम्ही अशा देवाची उपासना करता जो तुम्हांला माहीत नाही. याच देवाविषयी मी तुम्हांला सांगत आहे!
24 “ज्याने हे सर्व जग व त्यातील सर्व काही निर्माण केले तोच हा देव आहे. तो जमीन व आकाश यांचा प्रभु आहे. मनुष्यांनी बांधलेल्या मंदिरात तो राहत नाही! 25 हा देव जीवन देतो, श्वास देतो व सगळे काही देतो. त्याला जे पाहिजे ते सगळे त्याच्याकडे आहे. 26 देवाने एका माणसाला (आदाम) निर्माण करुन सुरुवात केली. त्याच्यापासून त्याने वेगवेगळे लोक निर्माण केले. देवाने त्यांना सगळीकडे राहण्यास मुभा दिली. देवाने त्यांना काळ व सीमा ठरवून दिल्या.
27 “त्यांनी देवाचा शोध करावा अशी त्याची इच्छा होती. कदाचित तो त्यांचा शोध करील व त्यांना तो सापडेल. पण तो आमच्या कोणापासूनही दूर नाही. 28 आम्ही त्याच्यासह राहतो आम्ही त्याच्यासह चालतो आम्ही त्याच्यासह आहोत. तुमच्यातीलच काही लोकांनी असे लिहिले आहे: ‘आम्ही त्याची मुले आहोत’
29 “आपण देवाची मुले आहोत. म्हणून इतर लोक ज्या प्रकारे समजतात त्या प्रकारचा देव आहे असे आपण मुळीच समजू नये. तो सोने, चांदी, किंवा दगडासारखा नाही. 30 भूतकाळात लोक देवाला समजू शकले नाहीत पण देवाने त्याकडे दुर्लक्ष केले. पण आता, जगातील प्रत्येक व्यक्तीला देव सांगतो की, त्याने आपले ह्रदय व जीवन बदलावे. 31 देवाने एक दिवस ठरविलेला आहे, ज्या दिवशी तो जगातील प्रत्येक व्यक्तीचा न्याय करील. तो नि:पक्षपाती असेल, हे करण्यासाठी तो एका माणासाचा (येशूचा) वापर करील. देवाने त्याला फार पूर्वीच निवडले आहे. व प्रत्येक माणसाला देवाने हे दाखवून दिले आहे; त्या माणसाला मरणातून पुन्हा उठवून दाखवून दिले आहे!”
8 लोकहो! आमच्या देवाची स्तुती करा.
त्याची स्तुती करणारी गीते मोठ्याने गा.
9 देवाने आम्हाला जीवन दिले.
देव आम्हाला संरक्षण देतो.
10 लोक चांदीची अग्नी परीक्षा करतात तशी देवाने आमची परीक्षा पाहिली.
11 देवा, तू आम्हाला सापळ्यात अडकू दिलेस.
तू आमच्यावर जड ओझी लादलीस.
12 तू आमच्या शत्रूंना आमच्यावरुन चालू दिलेस.
तू आम्हाला पाण्यातून आणि आगीतून फरफटत नेलेस.
परंतु तू आम्हाला सुरक्षित ठिकाणी आणलेस.
13-14 म्हणून मी तुझ्या मंदिरात तुला होमबली अर्पण करण्यासाठी बळी घेऊन येईन.
मी संकटात होतो तेव्हा तुझ्याकडे मदत मागितली.
मी तुला अनेक वचने दिली,
आता मी वचन दिल्याप्रमाणे तुला त्या गोष्टी देत आहे.
15 मी तुला पापार्पण करीत आहे.
मी तुला धुपासहित मेंढ्या अर्पण करीत आहे.
मी तुला बैल आणि बोकड अर्पण करीत आहे.
16 देवाची उपासना करणाऱ्या सर्वांनो, इकडे या.
देवाने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हाला सांगतो.
17-18 मी त्याची प्रार्थना केली,
मी त्याची स्तुती केली.
माझे मन शुध्द होते म्हणून
माझ्या प्रभुने माझे ऐकले.
19 देवाने माझे ऐकले.
त्याने माझी प्रार्थना ऐकली.
20 देवाची स्तुती करा देव माझ्यापासून दूर गेला नाही.
त्याने माझी प्रार्थना ऐकली.
देवाने मला त्याचे प्रेम दाखवले.
13 जे चांगले ते करण्यास तुम्ही उत्सुक असाल तर अशी कोण व्यक्ती आहे जी तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न करील? पण, 14 जे योग्य ते करुनसुद्धा जर तुम्हांला दु:ख सहन करावे लागते, तर तुम्ही धन्य आहात. म्हणून “त्या लोकांची भीति बाळगू नका किंवा गर्भगळित होऊ नका” [a] 15 पण आपल्या अंतःकरणात ख्रिस्त हा प्रभु आहे असा आदर बाळगा तुमच्यामध्ये जी आशा आहे, तिच्याविषयी तुम्हांला कोणी विचारले तर त्याचे समर्थन करण्यास सदैव तयार राहा. 16 पण हे सौम्यतेने व आदराने करा. ख्रिस्तामध्ये जगत असताना तुमच्या चांगल्या वागणुकीवर जे आरोप करतात त्यांना लाज वाटेल, अशा रीतीने तुम्ही आपली विवेकबुद्धी शुद्ध राखा.
17 कारण चांगले काम करुनदेखील आपण दु:ख सोसावे अशी जर देवाची इच्छा असेल तर वाईट करुन दु:ख भोगण्यापेक्षा ते अधिक चांगले.
18 ख्रिस्तदेखील आपल्या पापांसाठी
एकदाच मरण पावला.
एक नीतिमान दुसऱ्या
अनीतिमानांसाठी मरण पावला.
यासाठी की, तुम्हाला देवाकडे जाता यावे.
त्याच्या आत्म्यासंबंधी म्हटले
तर त्याला पुन्हा जीवन दिले गेले.
19 आत्मिक रुपाने देखील ख्रिस्त बंदिवासात असलेल्या आत्म्यांकडे गेला व सुवार्ता सांगितली. 20 फार पूर्वी नोहाच्या काळात जेव्हा जहाज बांधले जात होते आणि देव धीराने वाट पाहत होता, त्यावेळी ज्यांनी देवाची आज्ञा पाळली नाही, तेच हे आत्मे होत. फक्त थोडकेच म्हणजे आठ लोकच जहाजात गेले व त्यांचा पाण्यापासून बचाव झाला. 21 ते पाणी आत्मा चिन्हात्मकरीत्या बाप्तिस्म्याचे ज्यामुळे आता तुमचे तारण होते त्याचे प्रतीक आहे. बाप्तिस्मा म्हणजे शरीरावरील धूळ काढणे नव्हे, तर तो देवाकडे शुद्ध विवेक मिळावा म्हणून केलेला करार आहे. हे सर्व येशू ख्रिस्ताच्या मरणातून पुन्हा उठण्यामुळे घडू शकले. 22 तो स्वर्गात गेलेला आहे आणि देवाच्या उजव्या हाताशी बसला आहे. देवदूत, अधिकार आणि सामर्थ्य हे सर्व त्याच्या अधीन आहेत.
पवित्र आत्म्याचे अभिवचन
15 “जर तुम्ही माझ्यावर प्रीति करित असाल, तर ज्या आज्ञा मी करतो त्या तुम्ही पाळाल. 16 आणि मी पित्याला सांगेन आणि तो तुम्हांला दुसरा साहाय्यकर्ता देईल, यासाठी की त्याने तुम्हांबरोबर सर्वकाळ राहावे. 17 साहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे. जग त्याचा स्वीकार करू शकत नाहीत. कारण ते त्याला पाहत किंवा ओळखत नाही. पण तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो, तो तुमच्यामध्ये वास करील.
18 “मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही. मी तुमच्याकडे येईन. 19 आणखी काही वेळाने जग मला पाहणार नाही. परंतु तुम्ही मला पाहाल. मी जगतो आहे म्हणून तुम्हीही जगाल. 20 त्या दिवशी तुम्हांला जाणीव होईल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये आहात मी तुमच्यामध्ये आहे. 21 ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो, तो असा आहे की जो माझ्यावर प्रीति करतो, त्याच्यावर पिता प्रीति करील. मीसुद्धा त्याच्यावर प्रीति करीन आणि स्वतःला त्याच्यासाठी प्रगट करीन.”
2006 by World Bible Translation Center