Revised Common Lectionary (Semicontinuous)
8 लोकहो! आमच्या देवाची स्तुती करा.
त्याची स्तुती करणारी गीते मोठ्याने गा.
9 देवाने आम्हाला जीवन दिले.
देव आम्हाला संरक्षण देतो.
10 लोक चांदीची अग्नी परीक्षा करतात तशी देवाने आमची परीक्षा पाहिली.
11 देवा, तू आम्हाला सापळ्यात अडकू दिलेस.
तू आमच्यावर जड ओझी लादलीस.
12 तू आमच्या शत्रूंना आमच्यावरुन चालू दिलेस.
तू आम्हाला पाण्यातून आणि आगीतून फरफटत नेलेस.
परंतु तू आम्हाला सुरक्षित ठिकाणी आणलेस.
13-14 म्हणून मी तुझ्या मंदिरात तुला होमबली अर्पण करण्यासाठी बळी घेऊन येईन.
मी संकटात होतो तेव्हा तुझ्याकडे मदत मागितली.
मी तुला अनेक वचने दिली,
आता मी वचन दिल्याप्रमाणे तुला त्या गोष्टी देत आहे.
15 मी तुला पापार्पण करीत आहे.
मी तुला धुपासहित मेंढ्या अर्पण करीत आहे.
मी तुला बैल आणि बोकड अर्पण करीत आहे.
16 देवाची उपासना करणाऱ्या सर्वांनो, इकडे या.
देवाने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हाला सांगतो.
17-18 मी त्याची प्रार्थना केली,
मी त्याची स्तुती केली.
माझे मन शुध्द होते म्हणून
माझ्या प्रभुने माझे ऐकले.
19 देवाने माझे ऐकले.
त्याने माझी प्रार्थना ऐकली.
20 देवाची स्तुती करा देव माझ्यापासून दूर गेला नाही.
त्याने माझी प्रार्थना ऐकली.
देवाने मला त्याचे प्रेम दाखवले.
जलप्रलयाची सुरवात
7 नंतर परमेश्वर नोहाला म्हणाला, “या काळातील दुष्ट लोकात माझ्यासमोर तूच एक नीतिमान माणूस आहेस असे मला आढळले आहे; तेव्हा तुझ्या कुटुंबातील सर्वांना घेऊन तारवात जा. 2 अर्पणासाठी वरील प्रत्येक जातीच्या शुद्ध प्राण्यापैकी नरमाद्यांच्या सात जोड्या, इतर अशुद्ध प्राण्यापैकी नरमादी अशी एकच जोड़ी, 3 आणि पक्षांच्या नरमादी अशा सात जोड्या तुझ्याबरेबर तारवात नें. पृथ्वीवर त्यांचे बीज राहील 4 आतापासून सात दिवसांनी मी पृथ्वीवर चाळीस दिवस व चाळीस रात्र प्रचंड पाऊस पाडीन; त्यामुळे पृथ्वीवर मी निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीचा नाश होईल.” 5 परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे नोहाने सर्वकाही केले.
6 पाऊस आला तेव्हा नोहा सहाशे वर्षांचा होता. 7 जलप्रलयातून तरुन जावे म्हणून नोहा व त्याचे सह त्याचे कुटुंब म्हणजे त्याची बायको, त्याचे मुलगे व सुना हे तारवात गेले. 8 तसेच पृथ्वीतलावरील सर्व शुद्ध व अशुद्ध पशूपक्षी, सरपटणारे व रांगणारे प्राणी 9 हे सर्व देवाने सांगितल्याप्रमाणे नर व मादी अशा जोडी जोडीने नोहाबरोबर तारवात गेले. 10 मग सात दिवसानंतर पृथ्वीवर पाऊस पडण्यास व जलप्रलय येण्यास सुरवात झाली.
11-13 दुसऱ्या महिन्याच्या सतराव्या दिवशी पृथ्वीतील पाण्याचे सर्वझरे फुटले व पाणी उफाळून वर आले व जमिनीवरुन वाहू लागले; त्याच दिवशी मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली; जणू काय आकाशाच्या खिडक्या उघडल्या; चाळीस दिवस व चाळीस रात्र मुसळधार पाऊस पडला. त्याच दिवशी नोहा, त्याची बायको, त्याचे मुलगे शेम, हाम व याफेथ व त्यांच्या बायका ही सर्वमंडळी तारवात गेली. त्यावेळी नोहा सहाशे वर्षांचा होता. 14 नोहाचे कुटुंब आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राणी म्हणजे सर्व जातीची गुरेढोरे इतर पशू जमिनीवर सरपटणारे आणि आकाशात उडणारे पक्षी हे तारवात होते. 15 आणि ज्यांच्या जीवात प्राण आहे असे सर्व प्रकारचे प्राणी दोन दोनच्या गटाने तारवात गेले. 16 देवाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे हे जीवंत प्राणी जोडीने नर व मादी असे तारवात गेले आणि मग परमेश्वराने दार बंद केले पाणी वाढू लागले आणि त्याने जमिनीवरुन तारु उचलले.
17 चाळीस दिवस पृथ्वीवर महापुर पाणी आले; 18 पाणी एक सारखे चढतच गेले आणि त्यामुळे तारु जमिनीपासून उंचावर तरंगू लागले; 19 पाणी इतके वर चढत गेले की उंच उंच पर्वत देखील पाण्यात बुडून गेले; 20 पाणी सर्वात उंच पर्वत शिखरावर वीस फुटा पेक्षा अधिक उंच इतके वर चढले.
21-22 पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राणी, म्हणजे सर्व स्त्री, पुरुष, तसेच सर्व पक्षी, गुरेढोरे, ग्रामपशू, वनपशू सरपटणारे प्राणी हे सर्व जीव जंतू मरुन गेले. 23 अशा रीतीने देवाने पृथ्वीच्या पाठीवरील सर्वकाही म्हणजे मानव, पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशातील पक्षी अशा सर्व जीवधारी प्राण्यांचा नाश केला; जे वाचले ते म्हणजे नोहा, त्याचे कुटुंब आणि तारवात त्याच्या सोबत असलेले प्राणी, फक्त एवढेच. 24 पाण्याने एकशे पन्नास दिवस पृथ्वीला झाकून ठेवले होते.
वादळ
13 जेव्हा दक्षिणेकडून मंद वारे वाहू लागले, तेव्हा ते नांगर उचलून क्रेताच्या किनाऱ्याकिनाऱ्याने तारु हाकारीत जाऊ लागले. जहाजावरच्या लोकांना वाटू लागले की, अशाच प्रकारचे वारे आम्हांला पाहिजे होते. व तसेच ते वाहत आहे. 14 परंतु लवकरच क्रेत बेटावरुन “ईशान्येचे” म्हटलेले वादळी वारे वाहू लागले. 15 आणि जहाज वादळी वाऱ्यात सापडले, व त्याला पुढे जाता येईना. तेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न सोडून आम्ही वाऱ्याने जहाज भरकटू दिले.
16 मग कौदा नावाच्या लहानशा बेटाच्या किनाऱ्याकिनाऱ्याने आम्ही जाऊ लागलो. मग थोड्या खटपटीनंतर जीवनरक्षक होडी वर उचलून घेतली. 17 जीवन रक्षक होडी आत घेतल्यावर लोकांनी जहाज दोरखंडाने आवळून बांधले. जहाज वाळू असलेल्या सूर्ती [a] नावाच्या उथळ जागी आदळेल या भीतीने त्यांनी शीड खाली काढले. तेव्हा वाऱ्याने ते भरकटू लागले.
18 जोरदार वादळी वाऱ्याचे तडाखे खावे लागल्याने लोकांनी दुसऱ्या दिवशी जहाजावरील सामान बाहेर टाकून दिले. 19 तिसऱ्या दिवशी जहाजाची काही सामग्री त्यांनी आपल्या हातांनी बाहेर काढून टाकली. 20 बरेच दिवस आम्हांला सूर्य किंवा तारे दिसले नाहीत. वादळ फारच भयंकर होते. आम्ही आमच्या सर्व आशा सोडून दिल्या. आम्ही मरणार असे आम्हांला वाटू लागले.
21 बराच काळपर्यंत लोकांनी अन्नपाणी घेतले नव्हते. मग पौल त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “गुहस्थांनो, क्रेतावरुन मुक्काम हलवू नका, हा माझा सल्ला तुम्ही ऐकायला पाहिजे होता. म्हणजे हा त्रास व ही हानि तुम्हांला टाळता आली असती. पण आता तुम्ही धीर धरावा अशी माझी विनंति आहे. 22 कारण तुमच्यापैकी एकाच्याही जीवाला धोका पोहोंचणार नाही. आपले जहाज मात्र गमवावे लागेल. 23 मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची भक्ति मी करतो, त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहीला. 24 आणि तो दूत म्हणाला, ‘पौला भिऊ नको! तुला कैसरापुढे उभे राहिलेच पाहिजे. तुझ्याबरोबर प्रवास करणारे जे लोक आहेत, त्यांच्या जीवाचे रक्षण करण्याचे वचन देवाने मला दिले आहे.’ 25 तेव्हा गुहस्थांनो, तुम्ही सर्व धीर धरा! कारण मला जसे दूताने सांगितले, अगदी तसे होणार असा मला विश्वास आहे. 26 परंतु आपणास एखाद्या बेटावर उतरुन थांबावे लागले.”
27 चौदाव्या रात्री आमचे जहाज अद्रिया समुद्रातून चालले होते, तेव्हा खलाशांनी जहाज एखाद्या भूमीजवळ पोहोंचले असावे असा अंदाज केला. 28 त्यांनी पाण्याची खोली मोजली तेव्हा ती वीस वाव भरली. आणखी काही वेळाने त्यांनी परत एकदा समुद्राची खोली मोजली तेव्हा ती पंधरा वाव भरली. 29 ओबडधोबड खडकाळ जागेवर आपले जहाज आदळेल अशी भीति वाटल्याने त्यांनी चार नांगर जहाजाच्या मागील बाजूने टाकले आणि दिवस उजाडण्याची वाट पाहू लागले. 30 खलाशांनी जहाजातून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जहाजाच्या पुढील भागातून नांगर टाकल्याचे भासवून जीवनरक्षक होड्या समुद्रात टाकल्या. 31 परंतु पौल शताधिपतीला व इतर शिपायांना म्हणाला, “जर हे लोक जहाजात राहणार नाहीत, तर तुम्ही वाचणार नाही.” 32 यावर शिपायांनी जीवनरक्षक होड्यांचे दोर कापून टाकले. आणि त्या खाली पाण्यात पडू दिल्या.
33 पहाट होण्याअगोदर पौलाने त्या सर्वांना काहीतरी खाण्याचा आग्रह केला. तो म्हणाला, “आज चौदावा दिवस आहे. तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात पण खाणेपिणे काही केले नाही. अन्नाचा कणही खाल्ला नाही. 34 तुम्ही थोडे तरी खा. कारण तुमचा टिकाव लागण्यासाठी तुम्ही खाणे जरुरीचे आहे. तुम्ही खावे अशी मी तुम्हांला विनंति करतो. तुमच्यापैकी कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही.” 35 असे बोलल्यानंतर पौलाने भाकर घेतली आणि सर्वांच्या समक्ष देवाचे उपकार मानले, ती भाकर मोडून तो खाऊ लागला. 36 ते पाहून त्या सर्वांना धीर आला आणि ते जेवले. 37 आम्ही सर्व मिळून जहाजात दोनशे शाहातर लोक होतो. 38 त्या सर्वांनी पुरेसे खाल्ल्या प्यायलयांनंतर धान्य समुद्रात टाकून दिले आणि जहाजातील भार कमी केला.
2006 by World Bible Translation Center