Revised Common Lectionary (Semicontinuous)
8 लोकहो! आमच्या देवाची स्तुती करा.
त्याची स्तुती करणारी गीते मोठ्याने गा.
9 देवाने आम्हाला जीवन दिले.
देव आम्हाला संरक्षण देतो.
10 लोक चांदीची अग्नी परीक्षा करतात तशी देवाने आमची परीक्षा पाहिली.
11 देवा, तू आम्हाला सापळ्यात अडकू दिलेस.
तू आमच्यावर जड ओझी लादलीस.
12 तू आमच्या शत्रूंना आमच्यावरुन चालू दिलेस.
तू आम्हाला पाण्यातून आणि आगीतून फरफटत नेलेस.
परंतु तू आम्हाला सुरक्षित ठिकाणी आणलेस.
13-14 म्हणून मी तुझ्या मंदिरात तुला होमबली अर्पण करण्यासाठी बळी घेऊन येईन.
मी संकटात होतो तेव्हा तुझ्याकडे मदत मागितली.
मी तुला अनेक वचने दिली,
आता मी वचन दिल्याप्रमाणे तुला त्या गोष्टी देत आहे.
15 मी तुला पापार्पण करीत आहे.
मी तुला धुपासहित मेंढ्या अर्पण करीत आहे.
मी तुला बैल आणि बोकड अर्पण करीत आहे.
16 देवाची उपासना करणाऱ्या सर्वांनो, इकडे या.
देवाने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हाला सांगतो.
17-18 मी त्याची प्रार्थना केली,
मी त्याची स्तुती केली.
माझे मन शुध्द होते म्हणून
माझ्या प्रभुने माझे ऐकले.
19 देवाने माझे ऐकले.
त्याने माझी प्रार्थना ऐकली.
20 देवाची स्तुती करा देव माझ्यापासून दूर गेला नाही.
त्याने माझी प्रार्थना ऐकली.
देवाने मला त्याचे प्रेम दाखवले.
5 परमेश्वराने पाहिले की पृथ्वीवरील लोक दुष्ट आहेत; त्यांचे विचार नेहमी वाईट असतात. 6 म्हणून पृथ्वीवर मनुष्य निर्माण केल्याबद्दल परमेश्वरला वाईट वाटले; 7 आणि तो मनात फार दु:खी झाला; तेव्हा तो म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवास पृथ्वीतलावरुन नष्ट करीन; तसेच माणसे, पशू, सरपटणारे प्राणी, व आकाशातील पक्षी या सर्वांचा मी नाश करीन कारण या सर्वांना उत्पन्न केल्याचे मला दु:ख होत आहे.”
8 परंतु परमेश्वराला आनंद देणारा एक माणूस पृथ्वीवर होता तो म्हणजे नोहा.
नोहा आणि जलप्रलय
9 ही नोहाच्या घराण्याची कहाणी आहे. नोहा आयुष्यभर त्या पिढीतला नीतिमान माणूस होता. तो नेहमी देवाच्या आज्ञांप्रमाणे चालला 10 नोहाला शेम, हाम व याफेथ नावाचे तीन मुलगे होते.
11 देवाने पृथ्वीकडे पाहिले तेव्हा माणसांनी ती भ्रष्ट केली आहे असे त्याला आढळले. 12 जिकडे तिकडे हिसांचार चालू होते; लोक वाईट व क्रूर झाले होते; त्यांनी पृथ्वीवर आपल्या जीवनाचा नाश करुन घेतला होता.
13 म्हणून देव नोहाला म्हणाला, “मनुष्यांनी सर्व पृथ्वी संतापांने व हिंसेने भरुन टाकली आहे; म्हणून मी उत्पन्न केलेल्या सर्व प्राण्यांचा नाश करीन; त्यांचा पृथ्वी तलावरुन नायनाट करीन 14 तेव्हा आपणासाठी सायप्रस म्हणजे गोफेर झाडाच्या लाकडाचे एक तारु कर; त्यात खोल्या कर आणि त्याला सर्वत्र म्हणजे आतून व बाहेरुन डांबर लाव.”
15 देव म्हणाला, “तारवाचे मोजमाप मी सांगतो त्याप्रमाणे असावे. ते 300 क्यूबिट लांब, 50 क्यूबिट रुंद, आणि 30 क्यूबिट उंच असावे; 16 तारवाला छतापासून सुमारे 18 इंचावर एक खिडकी कर; तारवाच्या एका बाजूस दार ठेव; तसेच तारवाला वरचा, मधला व खालचा असे तीन मजले कर.
17 “मी सांगतो ते समजून घे. मी पृथ्वीवर जलप्रलय आणीन. मी पृथ्वीवरील सर्वलोक आणि सर्व सजीव प्राण्यांना नष्ट करीन. 18 मी तुझ्याशी एक विशेष करार करतो; तू आपले मुलगे, आपली बायको व आपल्या सुना यांस घेऊन तारवात जा. 19 तसेच पृथ्वीवरील प्रत्येक जातीतील सजीव प्राण्यापैकी एक नरमादीची जोडी तू तारवात ने, त्यांना तुझ्याबरोबर तारवात जिवंत ठेव. 20 पक्षी, पशू आणि भूमीवर रांगणारे प्राणी या पैकी प्रत्येकाच्या जातीतून नरमादी असे दोनदोन तुझ्याबरोबर तरवात ने; त्यांना तुझ्याबरोबर तारवात जिवंत ठेव. 21 तसेच तुला व त्यांना लागणारे पृथ्वीवरील सर्व प्रकारचे अन्न तारवात साठवून ठेव.”
22 देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे नोहाने सर्व काही केले.
पौल समुद्रमार्गे रोमला निघतो
27 जेव्हा आम्ही समुद्रमार्गे इटलीला जाण्याचे ठरविले तेव्हा पौल व इतर काही कैद्यांना युल्य नावाच्या शताधिपतीच्या हाती सोपविण्यात आले. युल्य हा सम्राटाच्या सेनेतील एक अधिकारी होता. 2 अद्रमुतिय येथील एका जहाजातून आम्ही जाणार होतो. हे जहाज आशियाच्या किनाऱ्यावरील बंदरे घेत पुढे जाणार होते. आम्ही या जहाजातून प्रवासाला निघालो. तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीका येथे राहणारा अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता.
3 दुसऱ्या दिवशी आम्ही सिदोन नगराला पोहोंचलो. युल्य पौलाशी फार चांगला वागला. पौलाच्या मित्राना त्याची काळजी घेता यावी म्हणून त्याने मोकळीक दिली. 4 तेथून आम्ही समुद्रमार्गे पुढे निघालो. आणि कुप्रच्या किनाऱ्याकिनाऱ्याने निघालो कारण वारा समोरचा होता. 5 किलकिया व पंफुल्याजवळच्या समुद्राला पार करुन लुक्या प्रांतातील मुर्या बंदरात पोहोंचलो. 6 तेथे शताधिपतीला इटलीला जाणारे आलेक्झांद्रीयाचे एक जहाज आढळले. त्याने आम्हांला त्या जहजात बसविले.
7 आम्ही बरेच दिवस हळूहळू प्रवास करीत होतो. कनिदा येथपर्यंत येण्यासाठी आम्हांला फार कष्ट पडले कारण वारा तोंडचा होता. आम्हांला पुढे जाता येईना. म्हणून आम्ही क्रेताच्या दक्षिणेकडून सलमोनाच्या समोरच्या बाजूस गेलो. 8 यापुढे आमचे जहाज क्रेतच्या किनाऱ्याने मोठ्या अडचणींतून सुरक्षित बंदर येथे पोहोंचले, तेथे जवळच लसया नगर होते.
9 बराच वेळ वाया गेला होता. आणि पुढील प्रवास करणे बरेच अवघड झाले होते. कारण एव्हाना यहूद्यांच्या उपासाचा काळही [a] निघून गेला होता. तेव्हा पौलाने त्यांना सावधानतेचा इशारा दिला. पौल म्हणला, 10 “पुरुषांनो, मला वाटते, आपल्या प्रवासात जहाजातील मालाला आणि जहाजालाच नव्हे तर आपल्या जीवालाही धोका होईल!” 11 परंतु पौलाच्या मताशी जहाजाचा कप्तान व मालक सहमत झाले नाहीत, उलट जहाजाच्या कप्तानाच्या व मालकाच्या बोलण्यावरच शताधिपतीचा जास्त विश्वास होता. 12 परंतु हे बंदर (सुरक्षित म्हटलेले) हिवाळ्यात मुक्काम करायला सोईचे नव्हते. म्हणून बहुमताने पुढे निघावे असे ठरले. आणि फेनिकेला जाण्याचा प्रयत्न करावा आणि शक्य झाले तर तेथेच हिवाळा घालवावा असे ठरले. (फेनिके हे क्रेत बेटावरील शहर होते. त्याचे बंदर नैऋ त्य व वायव्य दिशेला होते.)
2006 by World Bible Translation Center