Revised Common Lectionary (Semicontinuous)
दु:खी माणसाची प्रार्थना तो अगदी दुबळा असतो आणि त्याला त्याची कैफियत परमेश्वरासमोर मांडायची असते तेव्हाचे स्तोत्र.
102 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि
माझ्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे लक्ष दे.
2 परमेश्वरा, मी संकटात असताना माझ्याकडे पाठ फिरवू नकोस.
माझ्याकडे लक्ष दे.
मी मदतीसाठी ओरडेन तेव्हा मला लगेच ओ दे.
3 माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे.
हळू हळू विझत चाललेल्या आगीप्रमाणे माझे आयुष्य आहे.
4 माझी शक्ती निघून गेली आहे.
मी वाळलेल्या, मरणाला टेकलेल्या गवताप्रमाणे आहे.
मी जेवण करण्याचे सुध्दा विसरलो.
5 माझ्या दुखामुळे माझे वजन कमी होत आहे.
6 मी वाळवंटात राहणाऱ्या घुबडाप्रमाणे एकाकी आहे.
जुन्या पडझड झालेल्या इमारतीतल्या घुबडाप्रमाणे मी एकाकी आहे.
7 मी झोपू शकत नाही.
मी छपरावर असलेल्या एकाकी पक्ष्याप्रमाणे आहे.
8 माझे शत्रू नेहमी माझा अपमान करतात.
ते माझी चेष्टा करतात आणि मला शाप देतात.
9 माझे अन्न हे माझे सर्वांत मोठे दु:ख आहे.
माझे अश्रू माझ्या पेयात पडतात.
10 का? कारण परमेश्वरा, तू माझ्यावर रागावला आहेस.
तू मला वर उचललेस पण नंतर मला दूर फेकून दिलेस.
11 दिवस अखेरीला पडणाऱ्या लांब सावल्यांप्रमाणे माझे आयुष्य आता जवळ जवळ संपत आले आहे.
मी वाळलेल्या आणि मरायला टेकलेल्या गवतासारखा आहे.
12 पण परमेश्वरा, तू सदैव असशील
तुझे नाव सदा सर्वकाळ राहील.
13 तू उंच जाशील आणि सियोन पर्वताचे सांत्वन करशील.
तू सियोनला दया दाखवण्याची वेळ आता आली आहे.
14 तुझ्या सेवकांना सियोनचे दगड आवडतात.
त्यांना त्या शहराची धूळपण आवडते.
15 लोक परमेश्वराच्या नावाची उपासना करतील.
देवा, पृथ्वीवरील सर्व राजे तुला मान देतील.
16 परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल लोक
पुन्हा त्याचे गौरव बघतील.
17 देवाने जिवंत ठेवलेल्या लोकांच्या प्रार्थनेला तो उत्तर देईल.
देव त्यांची प्रार्थना ऐकेल.
13 ज्या माणसाला ज्ञान मिळेल तो खूप सुखी होईल. त्याला जेव्हा समजायला लागते तेव्हाच त्याला आशीर्वाद मिळतात. 14 ज्ञानामुळे जे लाभ होतात ते रुप्यापेक्षा चांगले आहेत. ज्ञानापासून मिळणारे लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा चांगले आहेत. 15 ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्यापैकी कोणतीही गोष्ट ज्ञानाइतकी मौल्यवान असणार नाही.
16 ज्ञान तुम्हाला मोठे आयुष्य संपत्ती आणि मानसन्मान देते. 17 ज्ञान असलेले लोक शांतीत आणि समाधानात जगतात. 18 ज्ञान जीवनाच्या वृक्षाप्रमाणे आहे. जे लोक त्याचा स्वीकार करतात त्यांना संपूर्ण आयुष्य लाभते. जे लोक ज्ञान धारण करतात ते खरोखरच सुखी होतात.
पापापासून सुटका याविषयी येशू बोलतो
31 ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला, त्या यहूदी लोकांना तो म्हणाला, “तुम्ही जर नेहमी माझ्या शिकवणुकीचे पालन कराल, तरच तुम्ही माझे खरे शिष्य आहात. 32 मग सत्य काय आहे हे तुम्हांला समजेल. आणि सत्य तुम्हांला मोकळे करील.”
33 यहूदी लोकांनी उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे लोक आहोत आणि आम्ही कधीच गुलाम नव्हतो तर आम्ही मोकळे होऊ असे तुम्ही का म्हणता?”
34 येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे तेच सांगतो, जो प्रत्येक पाप करतो तो गुलाम आहे. पाप त्याचा मालक आहे. 35 गुलाम कुटुंबात कायमचा राहत नाही. परंतु पुत्र कायमचा आपल्या कुटुंबात राहतो. 36 म्हणून जर पुत्र तुमजी सुटका करतो, तर तुम्ही खरोखरच मोकळे व्हाल. 37 तुम्ही अब्राहामाचे लोक आहात हे मला माहीत आहे. परंतु तुम्ही मला जिवे मारावयास टपलेले आहात. कारण तुम्हांला माझे शिक्षण स्वीकारायला नको आहे. 38 माझ्या पित्याने जे काही मला दाखवून दिले, तेच मी तुम्हांला सांगत आहे. परंतु तुमच्या पित्याने तुम्हांला सांगितले तेच तुम्ही करता.”
2006 by World Bible Translation Center