Revised Common Lectionary (Semicontinuous)
दु:खी माणसाची प्रार्थना तो अगदी दुबळा असतो आणि त्याला त्याची कैफियत परमेश्वरासमोर मांडायची असते तेव्हाचे स्तोत्र.
102 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि
माझ्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे लक्ष दे.
2 परमेश्वरा, मी संकटात असताना माझ्याकडे पाठ फिरवू नकोस.
माझ्याकडे लक्ष दे.
मी मदतीसाठी ओरडेन तेव्हा मला लगेच ओ दे.
3 माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे.
हळू हळू विझत चाललेल्या आगीप्रमाणे माझे आयुष्य आहे.
4 माझी शक्ती निघून गेली आहे.
मी वाळलेल्या, मरणाला टेकलेल्या गवताप्रमाणे आहे.
मी जेवण करण्याचे सुध्दा विसरलो.
5 माझ्या दुखामुळे माझे वजन कमी होत आहे.
6 मी वाळवंटात राहणाऱ्या घुबडाप्रमाणे एकाकी आहे.
जुन्या पडझड झालेल्या इमारतीतल्या घुबडाप्रमाणे मी एकाकी आहे.
7 मी झोपू शकत नाही.
मी छपरावर असलेल्या एकाकी पक्ष्याप्रमाणे आहे.
8 माझे शत्रू नेहमी माझा अपमान करतात.
ते माझी चेष्टा करतात आणि मला शाप देतात.
9 माझे अन्न हे माझे सर्वांत मोठे दु:ख आहे.
माझे अश्रू माझ्या पेयात पडतात.
10 का? कारण परमेश्वरा, तू माझ्यावर रागावला आहेस.
तू मला वर उचललेस पण नंतर मला दूर फेकून दिलेस.
11 दिवस अखेरीला पडणाऱ्या लांब सावल्यांप्रमाणे माझे आयुष्य आता जवळ जवळ संपत आले आहे.
मी वाळलेल्या आणि मरायला टेकलेल्या गवतासारखा आहे.
12 पण परमेश्वरा, तू सदैव असशील
तुझे नाव सदा सर्वकाळ राहील.
13 तू उंच जाशील आणि सियोन पर्वताचे सांत्वन करशील.
तू सियोनला दया दाखवण्याची वेळ आता आली आहे.
14 तुझ्या सेवकांना सियोनचे दगड आवडतात.
त्यांना त्या शहराची धूळपण आवडते.
15 लोक परमेश्वराच्या नावाची उपासना करतील.
देवा, पृथ्वीवरील सर्व राजे तुला मान देतील.
16 परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल लोक
पुन्हा त्याचे गौरव बघतील.
17 देवाने जिवंत ठेवलेल्या लोकांच्या प्रार्थनेला तो उत्तर देईल.
देव त्यांची प्रार्थना ऐकेल.
मिसरपासून बाहेर प्रवास
17 फारोने इस्राएल लोकांना मिसर सोडून जाऊ दिले, परंतु परमेश्वराने लोकांना पलिष्टी लोकांच्या देशातून जवळची वाट असताना देखील त्यातून जाऊ दिले नाही; कारण परमेश्वर म्हणाला, “त्यांना त्यातून जाताना लढावे लागेल आणि मग त्यामुळे आपल्या मनातले विचार बदलून ते लोक माघारे वळून मिसर देशाला परत जातील.” 18 म्हणून परमेश्वराने त्यांना दुसऱ्या मार्गाने तांबड्या समुद्राजवळील रानातून नेले. इस्राएल लोक मिसरमधून सशस्त्र होऊन निघाले होते.
योसेफाच्या अस्थी वचन दिलेल्या देशात नेल्या जातात
19 मोशेने योसेफाच्या अस्थी आपल्याबरोबर घेतल्या (कारण मरण्यापूर्वी योसेफाने आपणांकरिता इस्राएली पुत्रांकडून वचन घेतले होते. तो म्हणाला होता, “परमेश्वर जेव्हा तुम्हाला मिसरमधून सोडवील तेव्हा माझ्या अस्थी मिसरमधून घेऊन जाण्याची आठवण ठेवा.”)
परमेश्वर आपल्या लोकांना घेऊन जातो
20 इस्राएल लोकांनी सुक्कोथ हे ठिकाण सोडले व रानाजवळील एथाम या ठिकाणी त्यांनी तळ दिला. 21 दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी उंच ढगाची व रात्री उंच अग्निस्तंभाची योजना करून परमेश्वर त्यांच्या पुढे चालत असे. लोकांना रात्रीही प्रवास करता यावा यासाठी तो ढग त्यांना रात्री प्रकाश देत असे. 22 दिवसा तो उंच ढग व रात्री तो अग्निस्तंभ सतत त्या लोकांबरोबर असत.
17 “देवाने अब्राहामाला दिलेले वचन पुरे होण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली, तसतशी इजिप्त देशातील आपल्या लोकांची संख्या वाढू लागली. 18 शेवटी, ज्या राजाला योसेफाची माहिती नव्हती, असा राजा इजिप्तवर राज्य करु लागला. 19 त्या (नवीन) राजाने फार हुशारीने आपल्या लोकांचा फायदा घेतला. तो आपल्या लोकांशी फार निर्दयतेने वागू लागला, तो त्यांच्या बालकांना घराबाहेर टाकून देण्यास भाग पाडू लागला. ती बालके जिवंत राहू नयेत हा त्याचा हेतु होता.
20 “त्या काळात मोशेचा जन्म झाला. आणि तो (देवाच्या नजरेत) फार सुंदर बालक होता. तीन महिन्यांपर्यंत त्याच्या वडिलांच्या घरात वाढला. 21 आणि जेव्हा त्याला घराबाहेर ठेवण्यात आले तेव्हा फारोच्या कन्येने त्याला घेतले. तिने त्याला आपल्या मुलासारख वाढवल. 22 इजिप्तच्या लोकांनी त्याला सर्व प्रकारच्या ज्ञानात सुशिक्षित केले. तसेच तो बोलण्यात व कृतीत भारदस्त झाला.
23 “जेव्हा तो चाळीस वर्षांचा झाला, त्याने विचार केला की, आपले बांधव, जे यहूदी लोक त्यांना जाऊन भेटावे, 24 आणि जेव्हा त्याने आपल्या इस्राएली बांधवांपैकी एकाला वाईट वागविले जाताना पाहिले, तेव्हा त्याने त्या इजिप्तच्या रहिवाश्याला मारले, व आपल्या बांधवाची सुटका केली; छळ केला जाणाऱ्या यहूदी मनुष्याच्या वतीने त्याने बदला घेतला. 25 देव त्याच्या हातून यहूदी लोकांची सुटका करीत आहे, हे यहूदी लोकांना कळेल असे मोशेला वाटले, परंतु त्यांना ते कळले नाही.
26 “दुसऱ्या दिवशी दोन यहूदी माणसे भांडण करताना मोशेने पाहिली, ते पाहून मोशे त्यांच्यात मध्यस्थी करु लागला. तो त्यांना म्हणाला, ‘पुरुषांनो, तुम्ही एकमेकांचे भाऊ आहात, तुम्ही एकमेकांशी का भांडत आहात?’ 27 परंतु जो मनुष्य आपल्या शेजाऱ्याशी वाईट रीतीने वागत होता, त्याने मोशेला एका बाजूला सारुन म्हटले, ‘आमच्यावर अधिकार गाजवायला आणि आमचा न्यायनिवाडा करायला तुला कोणी नेमिले? 28 काल तू त्या इजिप्तच्या माणसाला ठार मारलेस; तसाच माझाही जीव घेण्याचे तुइया मनात आहे का?’ [a] 29 जेव्हा मोशेने त्याला हे बोलताना ऐकले, तेव्हा तो इजिप्त सोडून पळून गेला. आणि मिद्यान्यांच्या देशात उपरी म्हणून राहू लागला आणि तेथेच त्याला दोन मुलगे झाले.
30 “चाळीस वर्षांनंतर मोशे सीनाय पर्वताजवळच्या वाळवंटात होता. एका जळणाऱ्या झुडपांत मोशेला देवदूताचे दर्शन झाले. 31 जेव्हा मोशेने हे पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. नीट पाहता यावे म्हणून तो त्या जळत्या झुडपाजवळ गेला. मोशेने एक वाणी ऐकली, तो आवाज प्रभूचा होता. 32 प्रभु म्हणाला, ‘मी तुझ्या वाडवडिलांचा देव आहे-अब्राहाम, इसहाक, याकोब यांचा देव आहे.’ मोशे भीतीने थरथर कापू लागला. डोळे वर करुन पाहण्याचे धाडस त्याला होईना.
33 “देव त्याला म्हणाला, ‘तुझ्या पायातील वहाणा काढ! कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे. 34 माझ्या लोकांचा इजिप्त देशात होणारा छळ मी पाहिला आहे. आणि त्यांचे विव्हळ्णे माझ्या कानी आले आहे. म्हणून त्यांची सुटका करण्यास मी खाली आलो आहे. आता ये, मी तुला परत इजिप्त देशाला पाठवीत आहे.’ [b]
35 “मोशे हाच तो मनुष्य होता, ज्याला यहूदी लोकांनी नाकारले. ‘तुला कोणी आमच्यावर अधिकार गाजवायला आणि न्याय करायला निवडले आहे काय?’ असे ते त्याला म्हणाले. मोशे हाच मनुष्य आहे की ज्याला देवाने शासनकर्ता व तारणारा म्हणून पाठविले. देवाने मोशेला देवदूताच्या मदतीने पाठविले. याच देवदूताला मोशेने जळत्या झुडपात पाहिले होते. 36 म्हणून मोशेने लोकांना बाहेर काढले. त्याने सामर्थ्यशाली कृत्ये व चमत्कार केले. मोशेने ह्या गोष्टी इजिप्तमध्ये, तांबड्या समुद्राजवळ, आणि वाळवंटात चाळीस वर्षे केल्या.
37 “हा तोच मोशे आहे, ज्याने यहूदी लोकांना असे म्हटले: ‘देव तुम्हाला एक भविष्यवादी देईल. तो भविष्यवादी तुमच्याच लोकांमधून येईल. तो माइयासारखाच भविष्यवादी असेल’ 38 जो अरण्यात यहूद्दांबरोबर होता, सीनाय पर्वतावर आपणाबरोबर बोलणाऱ्या देवदूताबरोबर व आपल्या वाडवडीलांबरोबर होता ज्याला आम्हास देण्यासठी जीवनदायी वचने मिळाली होती, तोच हा मोशे होय,
39 “परंतु आपले वाडवडील त्याचे ऐकायला तयार नव्हते. त्यांनी त्याचे ऐकले नाही. आणि त्यांनी त्याला नाकारले. त्यांची मने इजिप्त देशाकडे परत ओढ घेऊ लागली. 40 आपले वाडवडील अहरोनाला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी तयार कर. कारण इजिप्त देशातून काढून आम्हांला बाहेर घेऊन येणारा हा मोशे, त्याचे काय झाले हे आम्हांला माहीत नाही’.
2006 by World Bible Translation Center