Revised Common Lectionary (Semicontinuous)
55 परंतु स्तेफन पवित्र आत्म्याने भरलेला होता. त्याने आपली नजर वर स्वर्गाकडे लावली. देवाचा गौरव त्याने पाहिला. त्याने येशूला देवाच्या उजवीकडे उभे असलेले पाहिले. 56 तो म्हणाला, “पहा! स्वर्ग उघडलेला मला दिसत आहे. व मी मनुष्याच्या पुत्राला देवाच्या उजवीकडे उभा असलेला पाहत आहे!”
57 स्तेफनाचे हे शब्द ऐकून यहूदी मोठ्याने ओरडले. त्यांनी आपले कान स्वतःच्या हातांनी झाकून घेतले. नंतर ते सर्व मिळून स्तेफनावर धावून गेले. 58 त्यानी स्तेफनाला धरुन ओढीत शहराच्या बाहेर नेले व त्याला दगडमार करु लागले. जे साक्षी होते, त्यांनी आपले कपडे शौल नावाच्या एका तरुण मनुष्यापाशी ठेवले होते. 59 ते स्तेफनावर दगडमार करीत असताना तो मोठ्याने प्रार्थना करीत म्हणाला, “हे प्रभु येशू, माइया आत्म्याचा स्वीकार कर!” 60 नंतर स्तेफनाने आपले गुडघे टेकले व मोठ्याने ओरडून म्हणाला, “प्रभु, यांचे हे करणे त्यांच्या माथी पाप असे मानू नको!” असे बोलून त्याने प्राण सोडला.
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
31 परमेश्वरा, मी तुझ्यावर अवलंबून आहे,
माझी निराशा करु नकोस
मला वाचव व माझ्यावर दया कर.
2 देवा, माझे ऐक त्वरीत येऊन
मला वाचव माझा खडक हो.
माझे सुरक्षित स्थळ हो.
माझा किल्ला हो, माझे रक्षण कर.
3 देवा, तू माझा खडक आहेस
तेव्हा तुझ्या नावाखातर पुढे हो व मला मार्गदर्शन कर.
4 माझ्या शत्रूंनी माझ्यासमोर सापळा रचला आहे.
त्यांच्या सापळ्यापासून मला वाचव तूच माझी सुरक्षित जागा आहेस.
5 परमेश्वरा आम्ही विश्वास ठेवू शकू असा देव तूच आहेस.
मी माझे आयुष्य तुझ्या हाती सोपवले.
मला तार!
15 माझे जीवन तुझ्या हाती आहे.
मला माझ्या शत्रूंपासून वाचव.
काही लोक माझा पाठलाग करीत आहेत
त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
16 कृपा करुन तुझ्या सेवकाचे स्वागत कर आणि त्याचा स्वीकार कर.
माझ्यावर दया कर आणि माझे रक्षण कर.
2 नुकत्याच जन्मलेल्या लहान बाळासारखे तुम्ही शुद्ध आध्यात्मिक दूधाची इच्छा धरा. यासाठी की त्यापासून तुमची वाढ होईल व तुमचे तारण होईल. 3 आता “प्रभु चांगला आहे याचा अनुभव तुम्ही घेतला आहे.” [a]
4 जिवंत धोंडा जो प्रभु येशू त्याच्याकडे या. जो जगातील लोकांकडून नाकारला गेला. पण जो देवाला बहुमोल असा आहे आणि ज्याला देवानेच निवडले आहे. 5 तुम्हीसुद्धा, जिवंत धोंड्याप्रमाणे आध्यात्मिक मंदिर बांधण्यासाठी रचिले जात आहा. पवित्र याजकगणांप्रमाणे सेवा करण्यासाठी, ज्यांचे काम म्हणजे आध्यात्मिक अर्पणाचा देवासमोर यज्ञ करणे असे आहे. जे देवाला, येशू ख्रिस्ताद्वारे मान्य आहे. 6 म्हणून खालील उतारा पवित्र शास्त्रात नमूद केला आहे:
“पहा सियोनात मी कोनशिला बसवितो,
जो मौल्यवान व निवडलेला आहे
आणि जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो तो कधीही लज्जित होणार नाही.” (A)
7 तुम्ही जे या धोंड्यावर विश्वास ठेवता, त्या तुम्हांला तो मौल्यवान आहे, पण जे विश्वास धरीत नाहीत त्यांना,
“बांधणाऱ्यांनी नापंसत केलेला धोंडा
तोच कोनशिला झाला आहे.” (B)
8 तो असा झाला,
“एक धोंडा जो लोकांना अडखळवितो
आणि एक खडक जो लोकांना पाडतो.” (C)
ते लोक अडखळतात कारण ते देवाची आज्ञा पाळत नाहीत. त्यांना त्याच्यासाठी नेमलेले आहे.
9 पण तुम्ही निवडलेले लोक आहात. तुम्ही राज्याचे याजक आहात, तुम्ही पवित्र राष्ट्र आहात, तुम्ही देवाचे असलेले लोक आहात, यासाठी की, ज्या देवाने तुम्हाला अंधारातून काढून त्याच्या अदभुत प्रकाशात आणले त्याची सामर्थ्यशाली कृत्ये तुम्ही प्रकट करावी.
10 एकवेळ तुम्ही लोक नव्हता
पण आता तुम्ही देवाचे लोक आहात.
एके काळी तुम्हाला करुणा दाखविण्यात आली नव्हती
पण आता तुम्हाला देवाची करुणा दाखविण्यात आली.
येशू शिष्यांचे समाधान करतो
14 “तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. 2 माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत, जागा नसत्या तर मी तुम्हांला सांगितले असते. कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. 3 मी गेल्यावर तुमच्यासाठी जागा तयार करीन आणि पुन्हा येईन, आणि तुम्हांला माझ्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. 4 आणि मी कोठे जातो तिकडे जाण्याचा मार्गही तुम्हांला ठाऊक आहे.”
5 थोमा येशूला म्हणाला, “प्रभु, तुम्ही कोठे जात आहात हे आम्हांला ठाऊक नाही. मग आम्हांला मार्ग कसा ठाऊक असणार?”
6 येशूने उत्तर दिले, “मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते. 7 जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते, आणि आतापासून तुम्ही त्याला ओळखता व त्याला पाहिले आहे.”
8 फिलिप्प येशूला म्हणाला, “प्रभु, आम्हांला पिता दाखवा, एकढेच आमचे मागणे आहे.”
9 येशूने त्याला म्हटले, “फिलिप्पा, मी इतका वेळ तुमच्याजवळ असताना तू मला ओळखले नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्याला पाहिले आहे, तर मग ‘आम्हांला पिता दाखव’ असे तू कसे म्हणतोस? 10 मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे, असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगतो त्या माझ्या स्वतःच्या नाहीत तर माझ्यामध्ये जो पिता आहे तो स्वतः कामे करतो. 11 मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे असा विश्वास धरा. नाहीतर मी केलेल्या कामावरून तरी माझ्यावर विश्वास ठेवा.
12 “मी तुम्हांला खरे सांगतो मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील. आणि त्यापेक्षाही मोठी कामे करील. कारण मी पित्याकडे जातो. 13 आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने माझ्याजवळ मागाल ते मी करीन यासाठी की, पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे. 14 जर तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करीन.
2006 by World Bible Translation Center