Revised Common Lectionary (Semicontinuous)
धन्यवाद स्तोत्र.
100 हे पृथ्वी, परमेश्वरासाठी गा.
2 परमेश्वराची सेवा करताना आनंदी राहा.
परमेश्वरासमोर आनंदी गाणी घेऊन या.
3 परमेश्वरच देव आहे हे लक्षात घ्या.
त्यानेच आपल्याला निर्माण केले.
आपण त्याची माणसे आहोत.
आपण त्याची मेंढरे आहोत.
4 त्याच्या शहरात धन्यवादाची गाणी घेऊन या.
त्याच्या मंदिरात स्तुतिगीते घेऊन या.
त्याला मान द्या.
त्याच्या नावाचा जयजयकार करा.
5 परमेश्वर चांगला आहे.
त्याचे प्रेम चिरंजीव आहे.
आपण त्याच्यावर कायम विश्वास टाकू शकतो.
23 “यहूदातील लोकांच्या मेंढपाळांचे (नेत्यांचे) वाईट होईल, ते मेंढ्यांचा नाश करीत आहेत. ते माझ्या कुरणातून त्यांना चहूबाजूना पळवून लावीत आहेत.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
2 ते मेंढपाळ (नेते) माझ्या लोकांना जबाबदार आहेत, आणि परमेश्वर, इस्राएलचा देव त्या मेंढपाळांना पुढील गोष्टी सागंतो “तुम्ही मेंढपाळांनी (नेत्यांनी) माझ्या मेंढ्यांना चारी दिशांना पळून जाण्यात भाग पाडले आहे. त्यांना तुम्ही जबरदस्तीने लांब जायला लावले. तुम्ही त्यांची काळजी घेतली नाही. पण मी तुमची काळजी घेईन. मी तुम्हाला तुमच्या वाईट कृत्यांबद्दल शिक्षा करीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. 3 “मी माझ्या मेंढ्या (लोक) दुसऱ्या देशांत पाठविल्या पण ज्या मेंढ्या लोक दुसऱ्या देशात गेल्या आहेत, त्यांना मी गोळा करीन. मी त्यांना त्यांच्या कुरणात परत आणीन. त्या मेंढ्या (लोक) त्यांच्या कुरणात (देशात) परत आल्यावर, त्यांना पुष्कळ संतती होऊन त्यांची संख्या वाढेल. 4 मी माझ्या मेंढ्यांसाठी नवीन मेंढपाळ (नेते) नेमीन. ते मेंढपाळ (नेते) माझ्या मेंढ्यांची (लोकांची) काळजी घेतील व माझ्या मेंढ्या (लोक) घाबरणार नाहीत वा भयभीत होणार नाहीत. माझी एकही मेंढी (माणूस) हरवणार नाही.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
सदाचरणी “अंकुर”
5 हा परमेश्वराचा संदेश आहे.
“मी चांगला ‘अंकुर’ निर्माण
करण्याची वेळ येत आहे.
तो चांगला अंकुर सुज्ञपणे राज्य करणारा राजा असेल.
देशात योग्य व न्याय्य गोष्टी तो करेल.
6 त्या चांगल्या ‘अंकुराच्या’ काळात यहूदातील लोक वाचतील
आणि इस्राएल सुरक्षित राहील.
त्याचे नाव असेल
परमेश्वर आमचा चांगुलपणा.
7 “चिरंजीव असणाऱ्या, एकमेव असणाऱ्या परमेश्वराने इस्राएलच्या लोकांना मिसर देशातून बाहेर आणले ‘हे जुने वचन लोक पुन्हा उच्चारणार नाहीत, असे दिवस येत आहेत.’ हा परमेश्वराचा संदेश आहे. 8 पण लोक काही नवीनच बोलतील. ‘परमेश्वर चिरंजीव आहे परमेश्वर एकमेव आहे. त्याने इस्राएलच्या लोकांना उत्तरेकडील देशातून बाहेर आणले. त्याने त्या लोकांना ज्या ज्या देशात पाठविले होते, त्या त्या देशांतून बाहेर आणले.’ मग इस्राएलचे लोक त्यांच्या स्वतःच्या देशात राहतील.”
येशू त्याच्या मरणाविषयी बोलतो(A)
17 येशू यरूशलेमला चालला होता. तो चालत असता त्याने त्याच्या शिष्यांना बाजूला घेतले, आणि त्यांना म्हणाला, 18 “ऐका, आपण यरुशलेमकडे जात आहोत. मनुष्याच्या पुत्राला धरून मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती धरुन देण्यात येईल. त्याने मेलेच पाहिजे असे ते म्हणतील. 19 ते मनुष्याच्या पुत्राला यहूदीतरांच्या हाती देतील. ते लोक त्याची थट्टा करतील, त्याला चाबकाने मारतील नंतर ते त्याला वधस्तंभावर खिळून जिवे मारतील. परंतु मरणानंतर तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविले जाईल.”
एका आईची खास विनंति(B)
20 त्यानंतर जब्दीच्या मुलांची आई, आपल्या मुलांसह त्याच्याकडे आली. ती त्याच्या पाया पडली आणि तिने त्याला एक विनंति केली.
21 त्याने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?”
ती म्हणाली, “माझा एक मुलगा तुमच्या राज्यात तुमच्या उजवीकडे बसेल आणि दुसरा डावीकडे बसेल असे वचन द्या.”
22 येशू तिला म्हणाला, “तू काय मागत आहेस ते तुला माहीत नाही! जे दु:ख मला सोसावे लागणार आहे ते तुमच्याने सोसवेल काय?”
ते म्हणाले, होय, “आम्ही ते सोसू शकू!”
23 येशू त्याना म्हणाला, “तुम्ही खरोखर माझ्या प्याल्यातून प्याल खरे, पण माझ्या उजव्या आणि डाव्या हाताला बसण्याचा मान, देणे हे ठरविणारा मी नाही, तर माझ्या पित्याने तो मान कोणाला द्यायचा हे ठरविले आहे.”
24 जेव्हा इतर दहा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते त्या दोघांवर रागावले. 25 मग येशूने बोलावून त्यांना म्हटले, “यहूदीतर लोकांच्या राजांना लोकांवर आपली सत्ता आहे हे दाखविणे आवडले आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना आपले अधिकार वाटेल तसे वापरणे आवडते. 26 पण तुमचे वागणे तसे नसावे. जर तुमच्यातील कोणाला मोठे व्हायचे असेल तर त्याने तुमचा दासच झाले पाहिजे. 27 आणि ज्याला पहिला व्हावयाचे आहे त्याने कनिष्ट झाले पाहिजे. 28 म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे. जो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”
2006 by World Bible Translation Center