Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 23

दावीदाचे स्तोत्र.

23 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला ज्याची गरज आहे
    ते मला नेहमी मिळत राहील.
तो मला हिरव्या कुरणात झोपू देतो.
    तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो.
    तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला, चांगुलपणाच्या मार्गाने नेतो.
मी जरी थडग्यासारख्या [a] भयाण अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो
    तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, का?
    कारण परमेश्वरा, तू माझ्याबरोबर आहेस.
    तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात.
परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शंत्रूसमोर तयार केलेस
    तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस माझा प्याला आता भरुन वाहू लागला आहे.
माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील.
    आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंतकाळापर्यंत बसेन. [b]

यहेज्केल 34:1-16

इस्राएल मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे आहे

34 मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला, “मानवपुत्रा, माझ्यावतीने इस्राएलच्या मेंढपाळांविषयी (नेत्यांविषयी) बोल. माझ्यासाठी त्यांच्याबरोबर बोल. त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो. ‘तुम्ही इस्राएलचे मेंढपाळ स्वतःच फक्त चरत आहात. त्यामुळे तुमचे वाईट होईल. तुम्ही कळपाला खायला का घालत नाही? तुम्ही धष्टपुष्ट मेंढ्या खाता, त्यांच्या लोकरीचा उपयोग स्वतःला कपडे करण्याकरिता करता. तुम्ही धष्टपुष्ट मेंढ्या मारता. पण कळपाला खायला घालीत नाही. तुम्ही दुर्बळांना सबळ केले नाही. तुम्ही आजारी मेंढ्यांची काळजी घेतली नाही. जखमींना मलमपट्टी केली नाही. काही मेंढ्या भरकटल्या पण तुम्ही जाऊन त्यांना परत आणले नाही. तुम्ही त्यांना शोधायला गेला नाहीत. नाही! तुम्ही फारच दुष्ट आणि निष्ठुर होता. आणि मेंढ्यांनाही तुम्ही दुष्टपणाने व निष्ठुरतेनेच वागविण्याचा प्रयत्न केला.

“‘आणि कोणीच मेंढपाळ नसल्याने मेंढ्या आता विखुरल्या आहेत. त्या हिंस्र पशूंचे भक्ष्य झाल्या आहेत, कारण त्या पसरल्या गेल्या. माझा कळप सर्व डोंगरांतून व सर्व टेकड्यांवरुन भटकला, जगाच्या पाठीवरील प्रत्येक ठिकाणी विखुरला आणि त्याचा शोध घेण्यास कोणीही नव्हते.’”

म्हणून, मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका. परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो. हिंस्र पशूंनी माझ्या मेंढ्या पकडल्या. खरंच! माझ्या मेंढ्या वन्य प्राण्यांचे भक्ष्य झाल्या. का? कारण त्यांना खरा मेंढपाळ नव्हता. माझ्या मेंढपाळांनी माझ्या कळपावर लक्ष ठेवले नाही. नाही! त्यांनी फक्त मेंढ्या मारल्या व स्वतःची पोटे भरली. त्यांनी माझ्या कळपाला खाऊ घातले नाही.”

तेव्हा, मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका. 10 परमेश्वर म्हणतो, “मी त्या मेंढपाळांच्याविरुद्ध आहे. मी माझ्या मेंढ्या त्यांच्याकडून परत मागीन. मी त्यांच्यावर तोंडसुख घेईन. ह्यापुढे ते माझे मेंढपाळ असणार नाही. मग ते स्वतःच्या तुंबड्या भरु शकणार नाहीत. आणि त्यांच्यापासून मी माझ्या कळपाला वाचवीन. मग माझ्या मेंढ्या त्यांचे भक्ष्य होणार नाहीत.”

11 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी स्वतःच त्यांचा मेंढपाळ होईन. मी माझ्या मेंढ्यांचा शोध घेईन. मी त्यांच्यावर लक्ष ठेवीन. 12 मेंढपाळ जर मेंढ्यांबरोबर असेल, तर त्या भरकटू लागताच, तो त्यांचा शोध घेईल, त्याचप्रमाणे, मी करीन. मी माझ्या मेंढ्यांना वाचवीन. त्या अंधाऱ्या व ढगाळ दिवशी, त्या जेथे जेथे विखुरल्या असतील, तेथून तेथून मी त्यांना परत आणीन. 13 त्या त्या राष्ट्रांतून मी त्यांना परत आणीन. निरनिराळ्या देशांतून मी त्यांना एकत्र आणीन. मी त्यांना त्यांच्या भूमीत परत आणीन. मी त्यांना इस्राएलच्या डोंगरांवर, झऱ्यांकाठी आणि लोक राहत असलेल्या सर्व ठिकाणी चरु देईन. 14 मी त्यांना चांगल्या कुरणांत नेईन. इस्राएलच्या डोंगरावरील उंच ठिकाणी त्या जातील. तेथे चांगल्या डोंगरावरील उत्तम हिरवळीवर त्या चरतील. 15 हो! मी माझ्या कळपाला खायला घालीन. आणि त्यांना विश्रांतीच्या जागी घेऊन जाईन.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

16 “हरवलेल्या मेंढ्यांचा मी शोध घेईन. भटकलेल्यांना मी परत आणीन. जखमी झालेल्या मेंढ्यांना मी मलमपट्टी करीन. दुर्बलांना मी सबळ करीन. मी त्या लठ्ठ व मत्त मेंढपाळांचा मात्र नाश करीन. त्यांना योग्य अशीच शिक्षा मी देईन.”

लूक 15:1-7

स्वर्गातील आनंद(A)

15 सर्व पापी लोक त्याचे ऐकायला त्याच्याकडे येत होते. तेव्हा परुशी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करु लागले. ते म्हणू लागले, “हा पाप्यांचे स्वागत करतो आणि त्यांच्याबरोबर जेवतो!”

मग येशूने त्यांना ही गोष्टी सांगितली. “जर तुमच्यापैकी कोणा एकाजवळ शंभर मेंढरे असून त्यातील एक हरवले, तर तो नव्याण्णव रानांत सोडून हरवलेल्या मेंढरामागे ते सापडेपर्यंत जाणार नाही काय? आणि जेव्हा त्याला ते सापडते तेव्हा तो आनंदाने ते खांद्यांवर घेतो. आणि घरी येतो, तेव्हा मित्रांना आणि शेजाऱ्याना एकत्र करुन म्हणतो, ‘माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरु सापडले आहे.’ मी तुम्हांस सांगतो, त्याचप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांपेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center