Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे स्तोत्र.
23 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला ज्याची गरज आहे
ते मला नेहमी मिळत राहील.
2 तो मला हिरव्या कुरणात झोपू देतो.
तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
3 तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो.
तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला, चांगुलपणाच्या मार्गाने नेतो.
4 मी जरी थडग्यासारख्या [a] भयाण अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो
तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, का?
कारण परमेश्वरा, तू माझ्याबरोबर आहेस.
तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात.
5 परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शंत्रूसमोर तयार केलेस
तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस माझा प्याला आता भरुन वाहू लागला आहे.
6 माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील.
आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंतकाळापर्यंत बसेन. [b]
16 आणखी परमेश्वर म्हणाला, “तू जाऊन इस्राएल लोकांच्या वडीलधाऱ्यांना (पुढाऱ्यांना) एकत्र बोलव आणि त्यांना सांग की तुमच्या पूर्वजांचा देव म्हणजे अब्राहाम, इसाहाक व याकोब यांचा देव ‘याव्हे’ मला दर्शन देऊन माझ्याशी बोलला आहे. परमेश्वर म्हणतो मी तुमच्याविषयी विचार केला आहे. 17 आणि मी असे ठरवले आहे की मी तुम्हाला मिसरमध्ये भोगाव्या लागत असलेल्या त्रासापासून सोडवीन व आता कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबुसी अशा वेगवेगव्व्या लोकांच्या ताब्यात असलेल्या देशात घेऊन जाईन. मी तुम्हाला दूधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात नेईन.
18 “ते वडीलधारे (पुढारी) तुझे ऐकतील मग तू व ते वडीलधारे (पुढारी) मिळून तुम्ही मिसरच्या राजाकडे जा व त्याला सांगा, ‘इब्री लोकांचा देव याव्हे आम्हाकडे आला. व त्याने आम्हास वाळवंटात तीन दिवसांचा प्रवास करून जाण्यास व तेथे आमचा देव “याव्हे” यासाठी बळी अर्पण करण्यास सांगितले आहे.’
19 “परंतु मला माहीत आहे कि मिसरचा राजा तुम्हाला जाऊ देणार नाही. केवळ महान सामर्थ्यच तुम्हाला जाऊ देण्यास त्याला भाग पाडील; 20 तेव्हा मग मीच माझे महान सामर्थ्य मिसराविरुद्ध वापरीन; मी त्या देशात महान चमत्कार करीन. मग ते केल्यावर तो तुम्हाला जाऊ देईल; 21 आणि मिसरचे लोक तुम्हा इस्राएल लोकांवर दया करतील असे मी करीन. तेव्हा तुम्ही निघताना मिसरचे लोक तुम्हाला पुष्कळ बक्षिसे व भेट वस्तु देतील.
22 “प्रत्येक इब्री स्त्री म्हणजे इस्राएली स्त्री आपल्या मिसरमधील शेजारणीकडून व आपल्या घरात राहाणाऱ्या मिसरच्या स्त्रीकडून भेट वस्तू मागून घेईल व ते लोक तिला भेट वस्तू देतील; तुम्हा लोकांना सोन्याचांदीचे दागिने व उंची कपडे भेट म्हणून मिळतील. मिसरमधून निघताना त्या वस्तू तुम्ही आपल्या मुलांमुलीच्या अंगावर घालाल. अशा प्रकारे तुम्ही मिसरच्या लोकांची संपत्ती घ्याल.”
मोशे मिसरला परत जातो
18 मग मोशे आपला सासरा इथ्रो याच्याकडे परत गेला. तो इथ्रोला म्हणाला, “मला मिसरला माझ्या भाऊबंदाकडे जाऊ द्या. ते अद्याप जिवंत आहेत की नाहीत ते मला पाहू द्या.”
इथ्रो म्हणाला, “तू शांततेने जा.”
19 तेव्हा मोशे अद्याप मिद्यानात असताना देव त्याला म्हणाला, “आता मिसरला परत जाणे तुझ्यासाठी सुरक्षिततेचे आहे. जे लोक तुला ठार मारु पाहात होते ते आता मरण पावले आहेत.”
20 तेव्हा मोशेने आपली बायको व आपल्या मुलांना गाढवांवर बसवले व त्यांना घेऊन तो मिसरला माघारी गेला. त्यांने देवाच्या सामर्थ्याने भरलेली आपली काठी बरोबर नेली.
प्रत्येक मानवी अधिकाऱ्याची आज्ञा पाळा
13 प्रभुकरिता प्रत्येक मानवी अधिकाऱ्याच्या अधीन असा. 14 राजाच्या अधीन असा, जो सर्वोच्च अधिकारी आहे आणि राज्यपालांच्या अधीन असा. कारण अयोग्य करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आणि चांगली कामे करणाऱ्यांना शाबासकी देण्यासाठी प्रान्ताधिपतीने त्यांना पाठविले आहे. 15 म्हणून जेव्हा तुम्ही चांगले काम करता तेव्हा मूर्ख लोकांचे अविचारी बोलणे तुम्ही बंद करता आणि हीच देवाची इच्छा आहे. 16 मुक्त लोकांसारखे जगा. पण तुमच्या मुक्तपणे जगण्याच्या नावाखाली वाईट गोष्टींना वाव देऊ नका. उलट देवाचे सेवक असल्याप्रमाणे जगा. 17 सर्व लोकांचा आदर करा. ख्रिस्तातील तुमच्या बंधूवर्गावर प्रीति करा. देवाप्रती भीतीयुक्त आदर असू द्या. राजाला मान द्या.
2006 by World Bible Translation Center