Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे स्तोत्र.
23 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला ज्याची गरज आहे
ते मला नेहमी मिळत राहील.
2 तो मला हिरव्या कुरणात झोपू देतो.
तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
3 तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो.
तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला, चांगुलपणाच्या मार्गाने नेतो.
4 मी जरी थडग्यासारख्या [a] भयाण अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो
तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, का?
कारण परमेश्वरा, तू माझ्याबरोबर आहेस.
तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात.
5 परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शंत्रूसमोर तयार केलेस
तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस माझा प्याला आता भरुन वाहू लागला आहे.
6 माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील.
आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंतकाळापर्यंत बसेन. [b]
15 मोशेन काय केले हे फारोला समजले तेव्हा त्याने त्याला जिवे मारावयाचे ठरवले. परंतु मोशे फारोपासून दूर पळून गेला. तो मिद्यान देशात गेला आणि तेथे एका विहिरीजवळ थांबला.
मिद्यान देशात मोशे
16 मिद्यानात एक याजक होता. त्याला सात मुली होत्या; आपल्या बापाच्या शेरडामेंढरास पाणी पाजण्यासाठी त्या विहिरीवर आल्या. त्या डोणीत पाणी भरण्याचा प्रयत्न करीत होत्या; 17 परंतु काही मेंढपाळांनी त्यांना पाणी भरू न देता हुसकून लावले. तेव्हा मोशेन त्या मुलींना त्यांच्या शेरडामेंढरांस पाणी पाजण्यास मदत केली.
18 मग त्या मुली आपला बाप रगुवेल याच्याकडे गेल्या; तेव्हा त्यांचा बाप त्यांना म्हणाला, “तुम्ही आज एवढ्या लवकर घरी कशा आला?”
19 मुलींनी उत्तर दिले, “तेथील मेंढपाळांनी आम्हाला हाकलून देण्याचा प्रयत्न केला. परंतु एका मिसरच्या माणसाने आम्हाला मदत केली. त्याने आम्हासाठी पाणी काढून आपल्या शेरडेमेंडरास पाजले.”
20 तेव्हा रगुवेल आपल्या मुलींना म्हणला, “तो माणूस कोठे आहे? तुम्ही त्याला सोडून का आला? त्याला आपल्या घरी जेवावयास बोलावून आणा.”
21 त्या माणसापाशी राहण्यास मोशेला आनंद वाटला. त्या माणसाने आपली मुलगी सिप्पोरा हिच्याबरोबर त्याचे लग्न करून दिले. 22 सिप्पोराला एक मुलगा झाला. मोशेने त्याचे नांव गेर्षोम ठेवले.
देव इस्राएल लोकानां मदत करण्याचे ठरवतो
23 बऱ्याच वर्षानंतर मिसरचा राजा मरण पावला. अजूनही इस्राएल लोकानां अतिशय कष्टाची कामे करावी लागत होती. त्यांनी मदतीकरिता हाका मारल्या व देवाने त्या ऐकल्या; 24 देवाने त्यांच्या प्रार्थना ऐकल्या आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराची त्याला आठवण झाली. 25 देवाने इस्राएल लोकांचे हाल पाहिले आणि त्यांना लगेच मदत करावयाचे ठरवले.
9 पण तुम्ही निवडलेले लोक आहात. तुम्ही राज्याचे याजक आहात, तुम्ही पवित्र राष्ट्र आहात, तुम्ही देवाचे असलेले लोक आहात, यासाठी की, ज्या देवाने तुम्हाला अंधारातून काढून त्याच्या अदभुत प्रकाशात आणले त्याची सामर्थ्यशाली कृत्ये तुम्ही प्रकट करावी.
10 एकवेळ तुम्ही लोक नव्हता
पण आता तुम्ही देवाचे लोक आहात.
एके काळी तुम्हाला करुणा दाखविण्यात आली नव्हती
पण आता तुम्हाला देवाची करुणा दाखविण्यात आली.
देवासाठी जगा
11 प्रियजनहो, मी तुम्हाला तुम्ही जणू काय प्रवासी आणि या जगात परके असल्यासारखा बोध करतो की, तुमच्या आत्म्याच्या विरुद्ध नेहमी लढत राहणाऱ्या शारीरिक वासनांपासून तुम्ही दूर राहा. 12 जरी विदेशी लोक तुमच्यावर टीका करतात आणि अपराध केल्याबद्दल दोष देतात तरी तुम्ही आपले वागणे इतके चांगले ठेवा की, तुमची चांगली कामे पाहून विदेशी लोकांनी देवाच्या परत येण्याच्या दिवशी त्याला गौरव द्यावे.
2006 by World Bible Translation Center