Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र.
134 परमेश्वराच्या सर्व सेवकांनो, त्याची स्तुती करा.
तुम्ही सेवकांनी मंदिरात रात्रभर सेवा केली.
2 सेवकांनो, तुमचे बाहू उभारा
आणि परमेश्वराचे स्तोत्र गा.
3 आणि परमेश्वर तुम्हाला सियोनवरुन आशीर्वाद देवो.
परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली.
देव आणि इस्राएल लोक यांचा करार
24 देवाने मोशेला सांगितले, “तू, अहरोन, नादाब, अबीहू आणि इस्राएल लोकांमधील सत्तर वडीलधारी माणसे पर्वतावर येऊन दुरुनच माझी उपासना करा; 2 मग मोशे एकटाच परमेश्वरा जवळ येईल; इतरांनी परमेश्वराजवळ येऊ नये, आणि इतर लोकांनी तर पर्वत चढून वरही येऊ नये.”
3 मोशेने लोकांना परमेश्वराचे सर्व नियम व आज्ञा सांगितल्या; मग सर्व लोक एकमुखाने म्हणाले, “परमेश्वराने सांगितलेल्या सर्व आज्ञा आम्ही पाळू.”
4 तेव्हा मोशेने सर्व आज्ञा लिहून काढल्या दुसऱ्या दिवशी सकाळी मोशेने उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली व त्याने इस्राएलच्या बारा वंशासाठी, प्रत्येक वंशास एक याप्रमाणे बारा दगड तेथे रोवून स्तंभ उभे केले. 5 मग मोशेने काही तरुणांना यज्ञार्पणे वाहाण्यासाठी पाठवले व त्यांनी परमेश्वराला बैलांची होमार्पणे व शांत्यार्पणे वाहिली.
6 मोशेने त्या अर्पणातून अर्धे रक्त राखून काही भांड्यात ठेवले आणि दुसरे अर्धे रक्त त्याने वेदीवर ओतले.
7 मग मोशेने गुंडाळी पत्रात लिहिलेला विशेष करार सर्वानी ऐकावा म्हणून वाचून दाखविला आणि मग लोक म्हणाले, “परमेश्वराने दिलेल्या आज्ञा आम्ही ऐकल्या आहेत; त्या आम्ही पाळू असे आम्ही कबूल करतो.”
8 मग मोशेने भांड्यांतील अर्पणाचे रक्त लोकावर शिंपडले, तो म्हणाला, “परमेश्वराने तुमच्याशी विशेष करार केला आहे असे हे रक्त दर्शीविते; त्याचे स्पष्टीकरण देवाने दिलेल्या नियमांमध्ये आहे.”
9 नंतर मोशे, अहरोन, नादाब, अबीहू व इस्राएल लोकांमधील सत्तर वडीलधारी माणसे पर्वतावर चढून गेले. 10 तेथे त्यांनी इस्राएलच्या देवाला पाहिले; नीलमण्यांच्या चौथऱ्यासारखे तेथे काही होते, ते आकाशाप्रमाणे स्वच्छ व निळेभोर होते त्यावर देव उभा होता! 11 इस्राएल मधील सगव्व्या वडिलधाऱ्या माणसांनी देवाला पाहिले परंतु त्याने त्यांचा नाश केला नाही. [a] मग त्यांनी तेथे एकत्र खाणेपिणे केले.
येशू सात शिष्यांना दिसतो
21 नंतर येशू त्याच्या शिष्यांना पुन्हा दिसला. तो तिबीर्या सरोवराजवळ (जे गालीलात होते) त्या ठिकाणी दिसला. हे अशा प्रकारे घडले: 2 काही शिष्य एकत्र होते. ते म्हणजे शिमोन पेत्र, थोमा (दिदुम म्हणत तो), गालीलातील काना येथील नथनीएल, जब्दीचे मुलगे, व त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे दोघे असे ते होते. 3 शिमोन पेत्राने त्यांना म्हटले, “मी मासे धरायला जातो.”
ते त्याला म्हणाले, “आम्हीही तुझ्याबरोबर येतो.” नंतर ते बाहेर गेले व नावेत बसले, पण त्या रात्री त्यांना काहीही मिळाले नाही.
4 दुसऱ्या दिवशी पहाटे येशू किनाऱ्यावर उभा राहिला. पण शिष्यांना समजले नाही की तो येशू आहे. 5 तो त्यांना म्हणाला, “मित्रांनो, तुम्ही काही मासे पकडले का?”
त्यांनी उत्तर दिले, “नाही.”
6 तो म्हणाला, “तुमचे जाळे नावेच्या उजव्या बाजूला टाका व मग तुम्हांला काही मासे मिळतील.” जेव्हा त्यांनी तसे केले, तेव्हा त्यांना पुष्कळ मासे मिळाल्यामुळे जाळे ओढता येईना.
7 तेव्हा येशूची ज्याच्यावर प्रीति होती तो पेत्राला म्हणाला, “तो प्रभु आहे!” असे म्हणता क्षणीच पेत्राने कपडे गुंडाळले. (कारण त्याने कपडे काढले होते) व पाण्यात उडी मारली. 8 दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत होडीतून आले कारण ते काठापासून दूर नव्हते, फक्त शंभर यार्ड होते. 9 जेव्हा ते किनाऱ्याला आले, त्यांनी कोळशांनी पेटविलेला विस्तव पाहिला व मासे आणि भाकर त्यावर ठेवलेली पाहिली. 10 येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आता धरलेल्या माशांतून काही मासे आणा.”
11 शिमोन पेत्राने नावेत जाऊन एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे काठास आणले. इतके मासे असतानाही जाळे फाटले नाही. 12 येशू त्यांना म्हणाला, “या, जेवा.” तेव्हा तो प्रभु आहे असे त्यांना समजले. म्हणून शिष्यांपैकी कोणी त्याला, तू कोण आहेस, हे विचारायला धजला नाही. 13 मग येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली. तसेच मासळीही दिली.
14 येशू मेलेल्यांतून उठल्यावर तो आपल्या शिष्यांस प्रगट होण्याची ही तिसरी वेळ.
2006 by World Bible Translation Center