Revised Common Lectionary (Semicontinuous)
पेत्राचे लोकांपुढे भाषण
14 मग पेत्र अकरा प्रेषितांसह उठून उभा राहिला. आणि तेथे असलेल्या लोकांना ऐकू जावे म्हणून मोठ्याने बोलला. तो म्हणाला, “माझ्या यहूदी बंधूंनो, आणि तुम्ही सर्व यरुशलेमचे रहिवासी, माझे ऐका, मी जे सांगतो, ते तुम्हांला समजणे जरुरीचे आहे, काळजीपूर्वक ऐका.
36 “म्हणून, सर्व यहूदी लोकांना खरोखर हे समजले पाहिजे की देवाने येशूला प्रभु व रिव्रस्त [a] असे केलेले आहे. तुम्ही वधस्तंभावर खिळून मारलेला हाच तो मनुष्य!”
37 जेव्हा लोकांनी हे ऐकले, तेव्हा त्यांना फार फार दु:ख झाले. त्यांनी पेत्राला व इतर प्रेषितांना विचारले, “आम्ही काय करावे?”
38 पेत्र त्यांना म्हणाला, “तुमची ह्रदये व जीविते बदला आणि येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्ही प्रत्येकाने बाप्तिस्मा घ्यावा. मग देव तुमच्या पापांची क्षमा करील आणि तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. 39 हे अभिवचन तुम्हांसाठी आहे, हे तुमच्या मुलांना आणि जे लोक खूप दूर आहेत त्यांनासुद्धा आहे. प्रभु आपला देव, ज्यांना स्वतःकडे बोलावितो अशा प्रत्येक व्यक्तीला ते दिलेले आहे.”
40 पेत्राने दुसऱ्या पुष्कळ शब्दांत त्यांना सावधान केले; त्याने त्यांना विनवणी केली, “ह्या युगाच्या दुष्टाई पासून स्वतःचा बचाव करा!” 41 मग ज्यांनी पेत्राने सांगितलेल्या गोष्टींचा स्वीकार केला, त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला. त्या दिवशी विश्वासणाऱ्यांच्या बंधुवर्गामध्ये तीन हजार लोकांची भर पडली.
116 परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो
ते मला खूप आवडते.
2 मी त्याला मदतीसाठी हाक मारतो
आणि ती तो ऐकतो ते मला खूप आवडते.
3 मी जवळ जवळ मेलो होतो.
मृत्यूचे दोर माझ्या भोवती आवळले गेले होते.
माझ्या भोवती थडगे आवळले जात होते.
मी खूप घाबरलो होतो आणि चिंतित झालो होतो.
4 नंतर मी परमेश्वराचे नाव घेतले.
मी म्हणालो, “परमेश्वरा, मला वाचव.”
12 मी परमेश्वराला काय देऊ शकतो?
माझ्या जवळ जे आहे ते मला परमेश्वरानेच दिले आहे.
13 त्याने मला वाचवले म्हणून मी त्याला पेय अर्पण करीन
आणि मी परमेश्वराला त्याच्या नावाने हाक मारीन.
14 मी परमेश्वराला कबूल केलेल्या गोष्टी देईन.
आता मी त्याच्या लोकांसमोर जाईन.
15 परमेश्वराच्या एखाद्या भक्ताचा मृत्यू परमेश्वराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असतो.
परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे.
16 मी तुझा सेवक आहे.
मी तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे.
परमेश्वरा, तू माझा पहिला गुरु आहेस.
17 मी तुला धन्यवाद म्हणून स्तुति अर्पण करीन.
मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.
18 मी कबूल केलेल्या गोष्टी परमेश्वराला देईन.
आता मी त्याच्या सर्व लोकांसमोर जाईन.
19 मी यरुशलेम मध्या मंदिरात जाईन.
परमेश्वराचा जयजयकार करा.
17 आणि ज्याप्रमाणे, देवाला तुम्ही पिता म्हणून हाक मारता, जो लोकांचा नि:पक्षपातीपणे, प्रत्येकाच्या कृत्यांप्रमाणे न्याय करतो, म्हणून या परक्या भूमीवर तुम्ही वास्तव्य करीत असताना, या काळात देवाबद्दलच्या आदरयुक्त भितीमध्ये आपले जीवन जगा. 18 तुम्हांला माहीत आहे की, सोने किंवा चांदी अशा कोणत्याही नाश पावणाऱ्या वस्तूंनी निरर्थक जीवनापासून तुमची सुटका करण्यात आली नाही. जी तुम्हांला तुमच्या पूर्वजापासून मिळाली आहे. 19 तर कसलाही डाग किंवा दोष नसलेल्या कोकऱ्यासारख्या ख्रिस्ताच्या बहुमोल रक्ताने तुमची सुटका केली आहे. 20 जगाच्या निर्मितिच्या अगोदर ख्रिस्ताची निवड करण्यात आली होती. पण तुमच्याकरिता या शेवटच्या दिवसात त्याला प्रकट करण्यात आले. 21 ज्या देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले व त्याला गौरव दिले त्या देवावर तुम्ही विश्वास ठेवणारे झाला आहात. म्हणून तुमचा विश्वास आणि आशा देवामध्ये आहे.
22 आता तुम्ही स्वतःला शुद्ध केले आहे. सत्याची आज्ञा पाळून शेवटपर्यंत प्रामाणिक बंधुप्रीति करा. एकमेकांवर शुद्ध ह्रदयाने प्रीति करण्याकडे लक्षा द्या. 23 जे बीज नाशवंत आहे त्यापासून तुमचा नवा जन्म झाला नाही तर जे बीज अविनाशी त्यामुळे झाला आहे, तुमचा नवा जन्म देवाच्या वचनाद्वारे जे जिवंत आहे व टिकते त्यापासून झाला आहे.
अम्माऊसच्या वाटेवर(A)
13 त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे शिष्य यरुशलेमापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. 14 ते एकमेकांशी या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी बोलत होते. 15 ते बोलत असताना आणि या गोष्टींची चर्चा करीत असताना येशू स्वतः आला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला. 16 पण त्यांचे डोळे त्याला ओळखण्यापासून बंद करण्यात आले होते. 17 येशू त्यांना म्हणाला, “चालत असताना तुम्ही एकमेकांबरोबर बोलत आहात त्या गोष्टी कोणत्या आहेत?”
चालता चालता ते थांबले. ते अतिशय दु:खी दिसले. 18 त्यांच्यातील एकजण ज्याचे नाव क्लयपा होते, तो त्याला म्हणाला, “ह्या दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नसलेले असे यरुशलेमात राहणारे तुम्ही एकटेच आहात काय?”
19 येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या मते कोणत्या गोष्टी?”
ते त्याला म्हणाले, “नासरेथकर येशूविषयीच्या सर्व गोष्टी. हाच तो मनुष्य जो आपल्या कृत्यांनी आणि शब्दांनी देवासमोर आणि मनुष्यांसमोर एक महान संदेष्टा झाला. 20 आणि आम्ही चर्चा करीत होतो की, कसे आमच्या प्रमुख याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्याला मरणदंड भोगण्यासाठी स्वाधीन केले. आणि त्यांनी त्याला वधस्तंभी खिळले. 21 आम्ही अशी आशा केली होती की, तोच एक आहे जो इस्राएलाची मुक्तता करील.
“आणि या सगळ्याशिवाय हे सर्व घडून गेलेल्या गोष्टीला आज तीन दिवस झालेत. 22 आणि आमच्या परिवारातील काही स्त्रियांनी आम्हांला थक्क केले आहे: आज अगदी पहाटे त्या कबरेकडे गेल्या, परंतु त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. 23 त्यांनी येऊन आम्हांला सांगितले की, त्यांना देवदूतांचा दृष्टांत घडला आणि देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे. 24 तेव्हा आमच्यातील काही कबरेकडे गेले, आणि स्त्रियांनी जसे सांगितले होते, तसेच त्यांना आढळले, पण त्यांनी त्याला पाहिले नाही.”
25 मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात. 26 ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?” 27 आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करुन आणि सर्व संदेष्ट्यापर्यंत सांगून, पवित्र शास्त्रात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करुन सांगितले.
28 ज्या खेड्याकडे ते जात होते, त्याच्याजवळ ते आले आणि येशूने असा बहाणा केला की, जणू काय तो पुढे जाणार आहे. 29 परंतु जास्त आग्रह करुन ते म्हणाले, “आमच्या बरोबर राहा. कारण जवळजवळ संध्याकाळ झालीच आहे. आणि दिवसही जवळजवळ मावळला आहे.” मग तो त्यांच्याबरोबर राहावयास आत गेला.
30 जेव्हा तो त्यांच्याबोरबर जेवायला मेजासभोवती बसला, त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. नंतर त्याने ती मोडली व ती त्यांना तो देऊ लागला. 31 तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्याला ओळखले. पण तो त्यांच्यातून अदृश्य झाला. 32 मग ते एकमेकांना म्हणू लागले, “तो वाटेवर आपणाशी बोलत असताना व पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्ट करुन सांगत असताना आपली अंतःकरणे आतल्या आत उकळत नव्हती काय?”
33 मग ते लगेच उठले, व यरुशलेमेस परत गेले. तेव्हा त्यांना अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर असलेले इतर एकत्र जमलेले आढळले. 34 प्रेषित आणि इतरजण म्हणाले, “खरोखर प्रभु उठला आहे! आणि शिमोनाला दिसला आहे.”
35 नंतर त्या दोन शिष्यांनी वाटेत काय घडले ते त्याला सांगितले आणि तो भाकर मोडत असताना त्यांनी त्याला कसे ओळखले ते सांगितले.
2006 by World Bible Translation Center