Revised Common Lectionary (Semicontinuous)
116 परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो
ते मला खूप आवडते.
2 मी त्याला मदतीसाठी हाक मारतो
आणि ती तो ऐकतो ते मला खूप आवडते.
3 मी जवळ जवळ मेलो होतो.
मृत्यूचे दोर माझ्या भोवती आवळले गेले होते.
माझ्या भोवती थडगे आवळले जात होते.
मी खूप घाबरलो होतो आणि चिंतित झालो होतो.
4 नंतर मी परमेश्वराचे नाव घेतले.
मी म्हणालो, “परमेश्वरा, मला वाचव.”
12 मी परमेश्वराला काय देऊ शकतो?
माझ्या जवळ जे आहे ते मला परमेश्वरानेच दिले आहे.
13 त्याने मला वाचवले म्हणून मी त्याला पेय अर्पण करीन
आणि मी परमेश्वराला त्याच्या नावाने हाक मारीन.
14 मी परमेश्वराला कबूल केलेल्या गोष्टी देईन.
आता मी त्याच्या लोकांसमोर जाईन.
15 परमेश्वराच्या एखाद्या भक्ताचा मृत्यू परमेश्वराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असतो.
परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे.
16 मी तुझा सेवक आहे.
मी तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे.
परमेश्वरा, तू माझा पहिला गुरु आहेस.
17 मी तुला धन्यवाद म्हणून स्तुति अर्पण करीन.
मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.
18 मी कबूल केलेल्या गोष्टी परमेश्वराला देईन.
आता मी त्याच्या सर्व लोकांसमोर जाईन.
19 मी यरुशलेम मध्या मंदिरात जाईन.
परमेश्वराचा जयजयकार करा.
देवाची त्याच्या भक्तांना मेजवानी
6 त्या वेळेस, सर्वशक्तिमान परमेश्वर, डोंगरावरील सर्व लोकांना मेजवानी देईल. मेजवानीत उत्कृष्ट अन्नपदार्थ व उंची मद्य असेल. मांस कोवळे व चांगल्या प्रतीचे असेल. 7 सध्या बुरख्याने सर्व राष्ट्रे आणि लोक झाकून गेले आहेत. हा बुरखा म्हणजेच “मृत्यू” होय. 8 पण मृत्यूवर पूर्णपणे मात करता येईल आणि परमेश्वर माझा प्रभू, प्रत्येक चेहऱ्यावरचा, प्रत्येक अश्रू पुसून टाकील. पूर्वी त्याच्या लोकांनी दुख: भोगले पण देव पृथ्वीवरचे दुख: दूर करील. परमेश्वराने सांगितले असल्यामुळेच हे सर्व घडून येईल.
9 तेव्हा लोक म्हणतील,
“हा आपला देव आहे.
आपण ज्याची वाट पाहत आहोत तोच हा.
तो आपले रक्षण करायला आला आहे.
आपण त्या आपल्या परमेश्वराची वाट पाहत आहोत,
म्हणून जेव्हा परमेश्वर आपले रक्षण करील तेव्हा आनंद साजरा करू आणि सुखी होऊ.”
तुम्हांला बक्षीस दिले जाईल
12 मग ज्याने आमंत्रण दिले होते त्याला तो म्हणाला, “तू जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी भोजनास बोलावशील तेव्हा तुझ्या मित्रांना, भावांना, किंवा तुझ्या नातेवाईकांना वा श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नको, कारण तेही तुला परत आमंत्रण देतील व अशा रीतीने तुझ्या आमंत्रणाची परतफेड केली जाईल. 13 पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे. 14 आणि तुला आशीर्वाद मिळतील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही असणार नाही. कारण नीतीमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.”
2006 by World Bible Translation Center