Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 114

114 इस्राएलने मिसर देश सोडला.
    याकोबाने (इस्राएल) तो परका देश सोडला.
यहुदा त्याचे निवडक राष्ट्र बनले इस्राएल त्याचे राज्य झाले.
लाल समुद्राने हे पाहिले आणि तो पळून गेला.
    यार्देन नदी वळली आणि पळाली.
पर्वत मेंढ्यांसारखा नाचला.
    टेकड्या कोकरासारख्या नाचल्या.

लाल समुद्रा, तू का पळून गेलास?
    यार्देन नदी तू का वळलीस आणि का पळून गेलीस?
पर्वतांनो तुम्ही मेंढ्यांसारखे का नाचलात?
    आणि टेकड्यांनो तुम्ही कोकरासारखे का नाचलात?

पृथ्वी प्रभुसमोर, याकोबाच्या
    देवासमोर थरथर कापली.
देवानेच खडकातून पाणी वहायला लावले.
    देवानेच कठीण खडकातून झरे वाहायला लावले.

योना 1

परमेश्वर बोलवितो आणि योना पळ तो

अमित्तयाचा मुलगा योना ह्याच्याशी परमेश्वर बोलला. आणि म्हणाला, “निनवे मोठी नगरी आहे. तेथे लोक दुष्कृत्ये करीत असल्याचे मी ऐकले आहे. तेव्हा त्या नगरात जा लोकांना त्या वाईट गोष्टी करण्याचे थांबविण्यास सांग.”

योनाला परमेश्वराची आज्ञा पाळायची नव्हती. म्हणून योनाने परमेश्वरापासून दूर पळून जाण्यची प्रयत्न केला. योना याफोला गेला. योनाला तार्शिस या खूप दूरच्या नगराला जाणारे गलबत सापडले. योनाने सफरीचे पैसे भरले व तो गलबतावर चढला. गलबतावरील लोकांबरोबर योनाला तार्शिसला जाण्याची इच्छा होती. त्याला परमेश्वरापासून दूर पळायचे होते.

मोठे तुफान

पण परमेश्वराने समुद्रात मोठे तुफान प्रचंड होते आणि गलबत फूटण्याच्या बेताला आले. गलबत बुडू नये म्हणून गलबतावरचे वजन कमी करावे असे गलबतावरील लोकांना वाटले. म्हणून त्यांनी गलबतावरील माल समुद्रात टाकण्यास सुरवात केली. खलाशी खूपच घाबरले होते. प्रत्येकजण आपापल्या दैवतांची प्रार्थना करु लागले.

योना झोपण्यासाठी गलबताच्या खालच्या तळाच्या भागात गेला होता. तो तेथे झोपला होता. कप्तानाने योनाला पाहिले तो त्याला म्हणाला, “उठ! झोपलास का? तुझ्या दैवताची प्रार्थना कर. कदाचित् तुझ्या प्रार्थनेने तुझे दैवत ऐकेल आणि आपल्याला वाचवेल.”

ह्या तुफानाचे कारण काय?

मग लोक एकमेकांना म्हणाले, “आपल्यावर हे संकट का आले हे आपण चिठ्या टाकून पाहावे.”

म्हणून त्यांनी चिठ्या टाकल्या. त्यावरुन त्यांना कळले की योनामुळे हे संकट आले. मग ते योनाला म्हणाले, “तुझ्यामुळे ही भयंकर गोष्ट आमच्याबाबत घडत आहे. तेव्हा तू काय केले आहेस ते सांग. तू काय करतोस? तू कोठचा? तुझा देश कोणता? तुझी माणसे कोण आहेत?”

योना त्या लोकांना म्हणाला, “मी इब्री (यहूदा) आहे. मी स्वर्गातील परमेश्वर देवाची उपासना करतो. समुद्र आणि भूमीचा निर्माता तोच परमेश्वर आहे.”

10 तो परमेश्वरापासून दूर पळत आहे, हेही योनाने त्या लोकांना सांगितले. हे कळताच ते अतिशय घाबरले. त्यांनी योनाला विचारले, “परमेश्वराविरूध्द तू कोणती भंयकर गोष्ट केलीस?”

11 वादळ जास्तच घोंघावू लागले व लाटाही जास्तच उसळू लगल्या. तेव्हा ते लोक योनाला म्हणाले, “स्वतःला वाचविण्यासाठी आम्ही काय करावे? समुद्र शांत होण्यासाठी तुझे आम्ही काय करावे?”

12 योना त्यांना म्हणाला, “समुद्रातील तुफानाला मी कारणीभूत आहे. तेव्हा मला समुद्रात फेका, म्हणजे समुद्र शांत होईल.”

13 परंतु त्या माणसांना योनाला समुद्रात फेकावे असे वाटत नव्हते. त्यांनी गलबत पुन्हा किनाऱ्याकडे नेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते शक्य झाले नाही. वारा प्रचंड होता समुद्रही खवळलेला होता. आणि वादळाची तीव्रता वाढतच होती.

योनाला शिक्षा

14 म्हणून लोकांनी परमेश्वराची करूणा भाकली, “परमेश्वरा, त्याने केलेल्या वाईट कृत्याबद्दल आम्ही या माणसाला समुद्रात फेकत आहोत. असे कृपया म्हणू नकोस. तू परमेश्वर आहेस आणि तुझ्या इच्छेप्रमाणे तू करशील, हे आम्हाला माहीत आहे. पण कृपा करुन आमच्यावर दया कर.”

15 मग त्यांनी योनाला समुद्रात टाकले आणि तुफान थांबले. समुद्र शांत झाला. 16 हे पाहताच ती माणसे परमेश्वराला घाबरु लागली व मान देऊ लागली. त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला आणि नवस केले.

17 योना समुद्रात पडल्यावर, त्याला गिळण्यासाठी परमेश्वराने एक मोठा मासा निवडला. योना, तीन दिवस आणि तीन रात्र, माशाच्या पोटात होता.

1 करिंथकरांस 15:19-28

19 जर ख्रिस्तावर असलेली आमची आशा ही, फक्त या पृथ्वीवरील जीवनासाठीच असली, तर सर्व मनुष्यात आम्ही दयनीय असे आहोत.

20 परंतु आता प्रत्यक्षात ख्रिस्त मरणातून उठविला गेला आहे. जे मेलेले आहेत त्यांच्यातील तो प्रथम फळ आहे. 21 कारण ज्याअर्थी मनुष्याद्वारे मरण आले त्याप्रमणे मृतांचे पुनरुत्थानसुद्धा मनुष्याद्वारेच आले. 22 कारण जसे आदामाद्वारे सर्व मरण पावतात तसेच सर्वजण ख्रिस्ताद्वारे जिवंत केले जातील. 23 पण प्रत्येक जण त्याच्या क्रमानुसार, ख्रिस्त जो प्रथम फळ आहे, आणि मग ख्रिस्त येण्याच्या वेळी त्याचे असलेले, 24 मग शेवट येईल प्रत्येक अधिपती, प्रत्येक सत्ता, व प्रत्येक सामर्थ्य जेव्हा ख्रिस्त नाहीसे करील, तेव्हा ख्रिस्त देवपित्याला राज्य देईल.

25 कारण देवाने ख्रिस्ताचे शत्रू ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवीपर्यंत ख्रिस्ताने राज्य केले पाहिजे. 26 शेवटचा शत्रू असल्यासारखा मृत्यूचा नाश केला पाहिजे. 27 कारण “देवाने सर्व काही त्याच्या अधिकारात ठेवले आहे.” आता जेव्हा पवित्र शास्त्र म्हणते की, “सर्व गोष्टी” अंकीत केल्या आहेत तेव्हा सर्व स्पष्ट आहे की, ज्याने सर्व गोष्टी त्याच्या अंकीत केल्या आहेत, तो देव सोडून इतर सर्व गोष्टी त्याच्या अधिकार क्षेत्रात आहेत. 28 आणि सर्व गोष्टी जेव्हा स्वाधीन केलेल्या आहेत, तेव्हा पुत्रसुद्धा देवाच्या, ज्याने सर्व गोष्टी स्वाधीन केल्या आहेत, स्वतः स्वाधीन केला जाईल यासाठी की, देव सर्वांवर संपूर्णपणे अधिपती असावा.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center