Revised Common Lectionary (Semicontinuous)
पेत्राचे लोकांपुढे भाषण
14 मग पेत्र अकरा प्रेषितांसह उठून उभा राहिला. आणि तेथे असलेल्या लोकांना ऐकू जावे म्हणून मोठ्याने बोलला. तो म्हणाला, “माझ्या यहूदी बंधूंनो, आणि तुम्ही सर्व यरुशलेमचे रहिवासी, माझे ऐका, मी जे सांगतो, ते तुम्हांला समजणे जरुरीचे आहे, काळजीपूर्वक ऐका.
22 “माझ्या यहूदी बांधवानो, हे शब्द ऐका: नासरेथचा येशू हा एक फार विशेष मनुष्य होता. देवाने तुम्हांला हे स्प्टपणे दाखविले आहे. देवाने येशूच्या हातून मोठ्या सामर्थ्यशाली व अदुभुत गोष्टी तुमच्यामध्ये करुन हे सिद्ध केले. तुम्ही सर्वांनी या गोष्टी पाहिल्या. म्हणून तुम्ही हे जाणता की हे सत्य आहे. 23 तुमच्याकरिता येशूला देण्यात आले आणि तुम्ही त्याला जिवे मारले. वाईट लोकांच्या मदतीने तुम्ही येशूला वधस्तंभावर खिळले. परंतु हे सर्व होणार हे देव जाणून होता, ती देवाचीच याजना होती. फार पूर्वीच देवाने ही योजना तयार केली होती. 24 येशूने मरणाचे दु:ख सहन केले. परंतु देवाने त्याला मुक्त केले, देवाने येशूला मरणातून उठविले, मरण येशूला बांधून ठेवू शकले नाही. 25 येशूविषयी दावीद असे म्हणतो:
‘मी प्रभूला नेहमी माइयासमोर पाहिले आहे;
मला सुरक्षित ठेवण्यासाठी तो माइया उजवीकडे असतो
26 म्हणून माझे हृदय आनंदात आहे
आणि माझे तोंड आनंदात बोलते.
होय, माझे शरीरदेखील आशा धरुन राहील
27 कारण तू माझा जीव मरणाच्या जागेत [a] राहू देणार नाहीस
तू तुइया पवित्र लोकांच्या शरीराला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.
28 तू मला कसे जगायचे ते शिकविलेस.
तू माइयाजवळ येशील.
आणि मला मोठा आनंद देशील.’ (A)
29 “माझ्या बांधवांनो, खरोखर आपला पूर्वज दाविद याच्याविषयी मी तुम्हांला सांगू शकतो. तो मेला आणि पुरला गेला. आणि त्याची कबर आजच्या ह्या दिवसापर्यत आपल्यामध्ये आहे. 30 दावीद हा संदेष्टा [b] होता. आणि देव जे काही बोलला ते त्याला माहीत होते. दावीदाला देवाने अभिवचन दिले की, तो त्याच्याच घराण्यातून एका व्यक्तीला त्याच्या राजासनावर बसवील. 31 ते घडण्यापूर्वीच दावीदाला हे माहीत होते. यासाठीच दावीद त्या व्यक्तीबद्दल असे म्हणतो:
‘त्याला मरणाच्या जागेत राहू दिले नाही.
त्याचा देह कबरेमध्ये कुजला नाही.’
दावीद ख्रिस्ताच्या मरणातून पुन्हा उठविण्याविषयी म्हणत होता. 32 म्हणून येशूला देवाने मरणातून उठविले, दाविदाला नाही! आम्ही सर्व ह्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. आम्ही त्याला पाहिले!
दावीदाचे मिक्ताम [a] नावाचे स्तोत्र
16 देवा, माझे रक्षण कर कारण मी तुझ्यावर अवलंबून आहे.
2 मी परमेश्वराला म्हणालो,
“परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस
माझ्याकडे असलेली प्रत्येक चांगली गोष्ट मला तुझ्याकडून मिळाली आहे”
3 परमेश्वर त्याच्या पृथ्वीवरील भक्तांसाठी अनेक अद्भुत गोष्टी करतो.
परमेश्वर त्या लोकांवर खरोखरच प्रेम करतो हे तो दाखवतो.
4 परंतु जे लोक उपासनेसाठी दुसऱ्या देवाकडे वळतात त्यांना दु:ख भोगावे लागते.
ते त्या मूर्तींना रक्ताची भेट देतात.
मी त्यात सहभागी होणार नाही.
मी त्या मूर्तींची नावेसुध्दा घेणार नाही.
5 माझा वाटा आणि प्याला परमेश्वराकडूनच येतो.
परमेश्वरा, तू माझा सांभाळ करतोस तुच मला माझा वाटा देतोस.
6 माझा वाटा फारच अद्भूत आहे
माझे वतन सुंदर आहे.
7 मी परमेश्वराची स्तुती करतो कारण त्याने मला चांगले शिकवले रात्रीच्या वेळी मला
अगदी आतल्या गाभ्यातून आज्ञा मिळाल्या.
8 मी परमेश्वराला नेहमी माझ्या पुढे ठेवतो
आणि मी त्याची उजवी बाजू कधीही सोडणार नाही.
9 त्यामुळे माझे ह्रदय आणि माझा आत्मा आनंदीत राहील
माझे शरीरही सुरक्षित असेल.
10 का? कारण परमेश्वरा, तू माझ्या आत्म्याला मृत्युलोकात राहू देणार नाहीस.
तुझ्याशी इमानदार असणाऱ्याला तू थडग्यात सडू देणार नाहीस. [b]
11 तू मला नीट कसे जगावे ते शिकवशील परमेश्वरा,
केवळ तुझ्या सान्निध्यात असणेही संपूर्ण समाधान देणारे असेल.
तुझ्या उजव्या बाजूला राहण्याने कायमचे समाधान लाभेल.
जिवंत आशा
3 आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या पित्याची, देवाची स्तुति असो! त्याच्या महान दयेमुळे त्याने आमचा नवा जन्म होऊ दिला, आणि येशूला मेलेल्यातून उठविण्याने जिवंत व नवीन आशा दिली. 4 आणि ज्याचा कधी नाश होत नाही, ज्याच्यावर काही दोष नाही, व जे कधी झिजत नाही असे वतन स्वर्गात आपल्यासाठी राखून ठेवले आहे.
5 आणि शेवटच्या काळात प्रगट करण्यात येणारे तारण तुम्हाला मिळावे म्हणून विश्वासाच्या द्वारे, देवाच्या सामर्थ्याने तुमचे रक्षण केले आहे. 6 वेगवेगळ्या प्रकारच्या पिडांनी काही काळापर्यंत तुम्ही दु:खी होणे जरी जरुरीचे असले, तरी यामुळे आनंद करीत आहा. 7 नाशवंत सोने शुध्द करण्याकरिता अग्नित टाकले जाते. त्याहून अधिक मौल्यवान अशा तुमच्या विश्वासाची कसोटी व्हावी, आणि येशू ख्रिस्ताच्या परत येण्याच्या वेळी तो खरा ठरावा आणि तुम्हाला स्तुति, गौरव व सन्मान मिळावा याची आवश्यकता आहे.
8 जरी तुम्ही येशूला पाहिले नाही, तरी तुम्ही त्याच्यावर प्रीति करता. जरी आता तुम्ही त्याच्याकडे पाहू शकत नसला तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुम्ही व्यक्त करता येणार नाही, अशा गौरवी आनंदाने भरला आहात. 9 तुमच्या विश्वासाचे ध्येय जे तुमच्या आत्म्याचे तारण ते तुम्हाला प्राप्त होत आहे.
येशू त्याच्या शिष्यांना दिसतो(A)
19 आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी शिष्य होते तेथील दार यहूदी लोकांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला व मध्ये उभा राहिला. त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांति असो.” 20 असे बोलल्यावर त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविली, तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला.
21 पुन्हा येशू म्हणाला, “तुम्हांबरोबर शांति असो! जसे पित्याने मला पाठवले आहे, तसे मी तुम्हांला पाठवितो.” 22 आणि असे म्हणून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि म्हणाला, “पवित्र आत्मा स्वीकारा. 23 जर तुम्ही कोणाच्या पापांची क्षमा केली, तर त्याला पापक्षमा मिळेल. जर तुम्ही क्षमा केली नाही तर त्यांची क्षमा होणार नाही.”
येशू थोमाला दिसतो
24 आता थोमा (याला दिदुम म्हणत) बारा शिष्यांपैकी एक होता. येशू आला तेव्हा तो शिष्यांबरोबर नव्हता. 25 तेव्हा इतर शिष्यांनी त्याला सांगितले की, “आम्ही प्रभूला पाहिले आहे!” पण तो त्यांना म्हणाला, “त्याच्या हातांमधील खिळ्यांचे व्रण पाहिल्याशिवाय व खिळ्यांच्या व्रणांत माझे बोट घातल्याशिवाय व त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास धरणार नाही.”
26 एक आठवड्यानंतर येशूचे शिष्य त्या घरामध्ये पुन्हा बसले होते व थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दार बंद होते तरी येशू आत आला व त्यांच्यामध्ये उभा राहिला. आणि म्हणाला, “तुम्हांबरोबर शांति असो.” 27 मग तो थोमाला म्हणाला, “तुझे बोट इकडे कर व माझे हात पाहा आणि तुझा हात इकडे कर व माझ्या कुशीत घाल. संशय सोड आणि विश्वास ठेव.”
28 थोमा त्याला म्हणाला, “माझा प्रभु आणि माझा देव!”
29 मग येशू त्याला म्हणाला, “तू मला पाहिले आहेस म्हणून तू विश्वास ठेवला आहेस, पण ज्यांनी मला पाहिले नाही तरीही त्यांनी विश्वास धरला ते धन्य आहेत.”
योहानाने हे पुस्तक का लिहिले?
30 आणखी या पुस्तकात लिहिली नाहीत अशी पुष्कळ अदभुत चिन्हे येशूने त्याच्या शिष्यांच्या समवेत केली. ती या पुस्तकात लिहिली नाहीत. 31 पण ही लिहिली यासाठी की, तुम्ही विश्वास ठेवावा की, येशू हा ख्रिस्त आहे, देवाचा पुत्र आहे आणि विश्वास ठेवल्याने त्याच्या नावात तुम्हांला जीवन मिळेल.
2006 by World Bible Translation Center