Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे मिक्ताम [a] नावाचे स्तोत्र
16 देवा, माझे रक्षण कर कारण मी तुझ्यावर अवलंबून आहे.
2 मी परमेश्वराला म्हणालो,
“परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस
माझ्याकडे असलेली प्रत्येक चांगली गोष्ट मला तुझ्याकडून मिळाली आहे”
3 परमेश्वर त्याच्या पृथ्वीवरील भक्तांसाठी अनेक अद्भुत गोष्टी करतो.
परमेश्वर त्या लोकांवर खरोखरच प्रेम करतो हे तो दाखवतो.
4 परंतु जे लोक उपासनेसाठी दुसऱ्या देवाकडे वळतात त्यांना दु:ख भोगावे लागते.
ते त्या मूर्तींना रक्ताची भेट देतात.
मी त्यात सहभागी होणार नाही.
मी त्या मूर्तींची नावेसुध्दा घेणार नाही.
5 माझा वाटा आणि प्याला परमेश्वराकडूनच येतो.
परमेश्वरा, तू माझा सांभाळ करतोस तुच मला माझा वाटा देतोस.
6 माझा वाटा फारच अद्भूत आहे
माझे वतन सुंदर आहे.
7 मी परमेश्वराची स्तुती करतो कारण त्याने मला चांगले शिकवले रात्रीच्या वेळी मला
अगदी आतल्या गाभ्यातून आज्ञा मिळाल्या.
8 मी परमेश्वराला नेहमी माझ्या पुढे ठेवतो
आणि मी त्याची उजवी बाजू कधीही सोडणार नाही.
9 त्यामुळे माझे ह्रदय आणि माझा आत्मा आनंदीत राहील
माझे शरीरही सुरक्षित असेल.
10 का? कारण परमेश्वरा, तू माझ्या आत्म्याला मृत्युलोकात राहू देणार नाहीस.
तुझ्याशी इमानदार असणाऱ्याला तू थडग्यात सडू देणार नाहीस. [b]
11 तू मला नीट कसे जगावे ते शिकवशील परमेश्वरा,
केवळ तुझ्या सान्निध्यात असणेही संपूर्ण समाधान देणारे असेल.
तुझ्या उजव्या बाजूला राहण्याने कायमचे समाधान लाभेल.
यरुशलेमच्या स्त्रिया तिला उत्तर देतात
9 सुंदर स्त्रिये!
तुझा प्रियकर इतर प्रियकरांहून वेगळा कसा?
तो इतर प्रियकरांपेक्षा चांगला आहे का?
म्हणूनच तू आम्हाला वचन द्यायला सांगत आहेस का?
ती यरुशलेमच्या स्त्रियांना उत्तर देते
10 माझा प्रियकर उन्हाने काळवंडला आहे व तेजस्वी दिसतो.
तो दहा हजार माणसात उठून दिसेल.
11 त्याचे मस्तक शुध्द् सोन्याप्रमाणे आहे.
त्याचे केस कुरळे आहेत आणि डोंबकावळ्यासारखे काळे आहेत.
12 त्याचे डोळे झऱ्याजवळच्या कबुतरासारखे आहेत,
दुधाच्या थारोळ्यातील कबुतरासारखे आहेत कोदंणातल्या हिऱ्यासारखे आहेत.
13 त्याचे गाल मसाल्याच्या पदार्थांच्या बागेप्रमाणे आहेत,
अत्तरासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलांसारखे आहेत.
त्याचे ओठ सुंगध गळणाऱ्या
कमलपुष्पाप्रमाणे आहेत.
14 त्याचे बाहू रत्नांनी जडवलेल्या
सोन्याच्या कांबीप्रमाणे आहेत.
त्याचे शरीर नीलमणी जडवलेल्या
मऊ हस्तिदंतासारखे आहे.
15 त्याचे पाय सोन्याचा पाया
असलेल्या संगमरवरी खांबासारखे आहेत.
तो लबानोनमधल्या गंधसरुच्या
झाडासारखा उंच उभा राहतो.
16 होय, यरुशलेमच्या स्त्रियांनो, माझा प्रियकर खूप हवाहवासा वाटणारा आहे.
त्याचे तोंड सर्वांत गोड आहे.
तोच माझा प्रियकर,
तोच माझा सखा आहे.
यरुशलेमच्या स्त्रिया तिच्याशी बोलतात
6 सुंदर स्त्रिये!
तुझा प्रियकर कुठे गेला आहे?
आम्हाला सांग म्हणजे आम्ही
त्याला शोधण्यात तुला मदत करु शकू.
ती यरुशलेमच्या स्त्रियांना उत्तर देते
2 माझा प्रियकर त्याच्या बागेत गेला.
मसाल्याच्या फुलांच्या ताटव्यात गेला.
तो बागेत खाऊ घालायला
आणि कमलपुष्पे गोळा करायला गेला.
3 मी माझ्या प्रियकराची आहे.
तो माझा आहे.
कमलपुष्पात खाऊ घालणारा तोच माझा प्रियकर आहे.
ख्रिस्ताविषयीची सुवार्ता
15 आता बंधूंनो, मला तुम्हाला आठवण करुन द्यावीशी वाटते, की ज्या सुवार्तेविषयी मी तुम्हाला उपदेश केला व जी तुम्हीसुद्धा स्वीकारलीत व जिच्यात तुम्ही बळकट आहात. 2 आणि जिच्यामुळे तुमचे तारण झाले आहे. ज्या वचनाने मी तुम्हांस सुवार्ता सांगितली ते तुम्ही दृढ धरता तर तुम्ही विश्वास धरल्याशिवाय काही उपयोग नाही, नाहीतर तुमची स्वीकृती व्यर्थ आहे.
3 कारण मलासुद्धा पहिल्यांदा जे मिळाले ते मी तुमच्या स्वाधीन केले: ते हे की ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला, हे जे वचनात लिहिले आहे. 4 व त्याला पुरण्यात आले. व तिसऱ्या दिवशी त्याला उठविण्यात आले. 5 व तो पेत्राला दिसला, नंतर बारा प्रेषितांना, 6 नंतर तो एकाच वेळी पाचशे हून अधिक बांधवांना दिसला. त्यांच्यापैकी बहुसंख्य अजूनही जिवंत आहेत, तर काही मेले आहेत. 7 नंतर तो याकोबाला दिसला, मग पुन्हा तो सर्व प्रेषितांना दिसला. 8 आणि शेवटी मी जो अवेळी जन्मलो, त्या मलासुद्धा तो दिसला.
9 कारण प्रेषितांमध्ये मी कनिष्ठ आहे, मी प्रेषित म्हणून घेण्याच्यासुद्धा योग्यतेचा नाही, कारण देवाच्या मंडळीचा मी छळ केला. 10 पण देवाच्या दयेने मी जो आहे तो मी (प्रेषित) आहे. आणि त्याची माझ्यावरची कृपा व्यर्थ गेली नाही, उलट त्या सर्वांपेक्षा अधिक काम मी केले आहे, करणारा मी नव्हतो, तर देवाची दया जी माझ्याबरोबर होती, ती करीत होती. 11 म्हणून, जरी मी तुम्हांला उपदेश केला किंवा त्यांनी उपदेश केला, तरी आम्ही सर्व हाच उपदेश करु, आणि तुम्ही यावरच विश्वास ठेवला.
2006 by World Bible Translation Center