Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे मिक्ताम [a] नावाचे स्तोत्र
16 देवा, माझे रक्षण कर कारण मी तुझ्यावर अवलंबून आहे.
2 मी परमेश्वराला म्हणालो,
“परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस
माझ्याकडे असलेली प्रत्येक चांगली गोष्ट मला तुझ्याकडून मिळाली आहे”
3 परमेश्वर त्याच्या पृथ्वीवरील भक्तांसाठी अनेक अद्भुत गोष्टी करतो.
परमेश्वर त्या लोकांवर खरोखरच प्रेम करतो हे तो दाखवतो.
4 परंतु जे लोक उपासनेसाठी दुसऱ्या देवाकडे वळतात त्यांना दु:ख भोगावे लागते.
ते त्या मूर्तींना रक्ताची भेट देतात.
मी त्यात सहभागी होणार नाही.
मी त्या मूर्तींची नावेसुध्दा घेणार नाही.
5 माझा वाटा आणि प्याला परमेश्वराकडूनच येतो.
परमेश्वरा, तू माझा सांभाळ करतोस तुच मला माझा वाटा देतोस.
6 माझा वाटा फारच अद्भूत आहे
माझे वतन सुंदर आहे.
7 मी परमेश्वराची स्तुती करतो कारण त्याने मला चांगले शिकवले रात्रीच्या वेळी मला
अगदी आतल्या गाभ्यातून आज्ञा मिळाल्या.
8 मी परमेश्वराला नेहमी माझ्या पुढे ठेवतो
आणि मी त्याची उजवी बाजू कधीही सोडणार नाही.
9 त्यामुळे माझे ह्रदय आणि माझा आत्मा आनंदीत राहील
माझे शरीरही सुरक्षित असेल.
10 का? कारण परमेश्वरा, तू माझ्या आत्म्याला मृत्युलोकात राहू देणार नाहीस.
तुझ्याशी इमानदार असणाऱ्याला तू थडग्यात सडू देणार नाहीस. [b]
11 तू मला नीट कसे जगावे ते शिकवशील परमेश्वरा,
केवळ तुझ्या सान्निध्यात असणेही संपूर्ण समाधान देणारे असेल.
तुझ्या उजव्या बाजूला राहण्याने कायमचे समाधान लाभेल.
ती पुन्हा बोलते
8 मी माझ्या सख्याचा आवाज ऐकते.
तो येत आहे डोंगरावरुन उड्या मारत,
टेकड्यांवरुन बागडत येत आहे.
9 माझा प्रियकर मृगासारखा,
हरिणाच्या पाडसासारखा आहे.
आमच्या भिंतीच्या पलिकडे उभ्या असलेल्या,
खिडकीतून डोकावणाऱ्या,
झरोक्यातून [a] पहाणाऱ्या माझ्या प्रियकराला बघा.
10 माझा प्रियकर माझ्याशी बोलतो,
“प्रिये, हे सुंदरी ऊठ
आपण दूर जाऊ या!
11 बघ आता हिवाळा संपला आहे.
पाऊस आला आणि गेला.
12 शेतात फुले उमलली आहेत,
आता गाण्याचे दिवस आले आहेत.
ऐक कबूतरे परतली आहेत.
13 अंजिराच्या झाडावर अंजिर लागले आहेत व वाढत आहेत.
बहरलेल्या द्राक्षवेलींचा गंध येत आहे.
प्रिये, सुंदरी, ऊठ
आपण आता दूर जाऊ या.”
14 माझ्या कबुतरा, उंच कड्यावरच्या गुहेत लपलेल्या,
पर्वतात लपलेल्या माझ्या कबुतरा,
मला तुला बघू दे.
तुझा आवाज ऐकू दे.
तुझा आवाज अतिशय गोड आहे
आणि तू खूप सुंदर आहेस.
ती स्त्रियांशी बोलते
15 आमच्यासाठी कोल्ह्यांना पकडा.
लहान कोल्ह्यांनी द्राक्षाच्या
मळ्यांचा नाश केला आहे.
आता आमचे द्राक्षाचे मळे फुलले आहेत.
पौल ख्रिस्ती लोकांना काही गोष्टी करावयास सांगतो
2 नेहमी प्रार्थना करीत राहा. उपकारस्तुति करीत त्यामध्ये दक्ष राहा. 3 त्याचवेळी आमच्यासाठीसुद्धा प्रार्थना करा, यासाठी की, ख्रिस्ताविषयीचे जे रहस्य देवाने आम्हांला कळविले, त्याविषयी बोलण्यासाठी, त्याचा संदेश ऐकण्यासाठी, देवाने आमच्यासाठी दार उघडावे. कारण त्या उपदेश करण्याने मी बंधनात आहे. 4 ते रहस्य ज्या रीतीने मी सांगावयास पाहिजे, त्याप्रकारे सांगण्यासाठी माझ्यासाठी प्रार्थना करा.
5 बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा आणि प्रत्येक संधीचा चांगला फायदा करुन घ्या.
2006 by World Bible Translation Center