Revised Common Lectionary (Semicontinuous)
118 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याचा सन्मान करा.
त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.
2 इस्राएल, म्हण
“त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
14 परमेश्वर माझी शक्ती आणि माझे विजयगान आहे.
परमेश्वर मला वाचवतो.
15 चांगल्या लोकांच्या घरात चाललेला विजयोत्सव तुम्ही ऐकू शकता.
परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचे दर्शन घडवले.
16 परमेश्वराचे हात विजयामुळे उंचावले आहेत.
परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचेदर्शन घडवले.
17 मी जगेन आणि मरणार नाही
आणि परमेश्वराने काय काय केले ते मी सांगेन.
18 परमेश्वराने मला शिक्षा केली
परंतु त्याने मला मरु दिले नाही.
19 चांगल्या दरवाजांनो, माझ्यासाठी उघडा.
मी आत येईन आणि परमेश्वराची उपासना करीन.
20 ते परमेश्वराचे दरवाजे आहेत आणि
केवळ चांगले लोकच त्यातून आत जाऊ शकतात.
21 परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो.
तू माझा उध्दार केलास म्हणून मी तुला धन्यवाद देतो.
22 इमारत बांधणाऱ्यांना जो दगड नको होता
तो कोनाशिला झाला.
23 हे परमेश्वराने घडवून आणले आहे
आणि ते अतिशय अद्भुत आहे असे आम्हाला वाटते.
24 आजचा दिवस परमेश्वरानेच घडवला आहे.
आपण आज मौज करु आणि सुखी होऊ.
मोशेचे गीत
15 नंतर मोशे व इस्राएल लोक परमेश्वराला हे गीत गाऊ लागले:
“मी परमेश्वराला गीत गाईन
कारण त्याने महान कृत्ये केली आहेत;
घोडा व स्वार यांना
त्याने समुद्रात फेकून दिले आहे.
2 परमेश्वर माझे सामर्थ्य आहे.
तो माझे रक्षण करितो.
मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन; [a]
परमेश्वर माझा देव आहे;
तो माझ्या पूर्वजाचा देव आहे;
मी त्याचे गौरव करीन.
3 परमेश्वर महान योद्धा आहे;
त्याचे नांव याव्हे आहे.
4 त्याने फारोचे रथ व स्वार यांना
समुद्रात फेकून दिले;
त्याने फारोचे उत्तम लष्करी
अधिकारी तांबड्या समुद्रात बुडविले.
5 खोल पाण्याने त्यांना बुडविले;
ते खोल पाण्यात दगडाप्रमाणे तळापर्यंत बुडाले.
6 “हे परमेश्वर तुझा उजवा हात आश्चर्यकारकरीत्या बलशाली आहे;
त्या हाताने तू शत्रूंचा चुराडा करून टाकलास.
7 तुझ्या वैभवशाली सामर्थ्याने तू तुझ्याविरुद्ध बंड करून
उठणाऱ्यांचा नाश करतोस;
अग्नीने वाळलेल्या गवताच्या काड्या जाळाव्या तसे
तू त्यांना तुझ्या रागाने जाळून भस्म करतोस.
8 तू वाहविलेल्या जोराच्या वाऱ्याने
पाणी राशी सारखे उंच उभे राहिले
व जोराने वाहणाऱ्या पाण्याची टणक भिंत झाली;
समुद्राचे पाणी अगदी खोलवर घट्ट टणक बनले.
9 “शत्रु म्हणाला,
‘मी त्यांचा पाठलाग करीन, त्यांना गाठीन,
मी त्यांची सर्व संपत्ती लुटून घेईन; त्यामुळे माझा जीव तृप्त होईल.
माझ्या तलवारीने त्यांचे सर्व काही हिरावून घेईन;
माझ्या हातांनी त्यांचे सर्वकाही मी स्वतः करिता घेईन.’
10 परंतु तू त्यांच्यावर फुंकर वायु सोडलास
आणि समुद्राच्या पाण्याने त्यांना गडप केले;
ते शिशाप्रमाणे समुद्रात खोल
पाण्यात तळापर्यंत बुडाले.
11 “परमेश्वरासारखा, देवतांमध्ये कोण देव आहे का?
नाही! परमेश्वरा तुझ्या समान कोणी देव नाही;
तू आश्चर्यकारक, अति पवित्र देव आहेस!
तुझे सामर्थ्य आश्चर्यकारक आहे!
तू महान चमत्कार करतोस!
12 तू तुझा उजवा हात उगारला पृथ्वीने
त्यांना गिळून टाकले.
13 तू उद्धारिलेल्या लोकांना
तू तुझ्या दयाळूपणाने चालविले आहेस;
तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना तुझ्या पवित्र
आणि आनंददायी प्रदेशात नेले आहेस.
14 “इतर राष्ट्रे ही गोष्ट
ऐकून भयभीत होतील;
पलिष्टी लोक भीतीने थरथरा कांपतील.
15 मग अदोमाची कुटुंबे व मवाबाचे बलवान लोक
भीतीने थरथरा कांपतील
आणि कनानी लोकांचे धैर्य पावेल.
16 तुझे सामर्थ्य पाहून ते लोक घाबरतील,
आणि परमेश्वराचे लोक म्हणजे तू तारलेले लोक निघून पार जाईपर्यंत
ते तुझ्या लोकांना काहीही न करता,
दगडासारखे एकाच जागी उभे राहतील;
17 तू तुझ्या लोकांना
तुझ्या वतनाच्या पर्वतावर घेऊन जाशील;
हे परमेश्वरा, तू त्यांना तुझ्या सिहांसनासाठी तयार केलेल्या ठिकाणाजवळ राहू देशील,
व तू हे परमेश्वरा तू तुझे मंदिर बांधशील.
18 “परमेश्वर सदासर्वदा राज्य करो!”
12 म्हणून, जसे देवाचे निवडलेले लोक जे पवित्र आहेत, तसे करुणा, दयाळूपणा, नम्रता, सौम्यता, आणि धीर हे परिधान करावे. 13 एकमेकांचे सहन करा. जशी प्रभुने तुम्हांला क्षमा केली तशी एखाद्याविरुद्ध तक्रार असेल तर एकमेकांना क्षमा करा. 14 या सर्वांवर प्रीतिचे वस्त्र परिधान करा. जे त्या सर्वांना एकत्र ठेवते आणि त्यांना परिपूर्ण करते. 15 आणि ख्रिस्ताची शांति जिच्यासाठी तुम्ही जे एका देहातील लोक त्या तुम्हांला बोलाविले होते ती तुमच्या अंतःकरणावर राज्य करो आणि नेहमी उपकार मानणारे व्हा.
16 ख्रिस्ताचा संदेश तुमच्यामध्ये त्याच्या सर्व वैभवाने राहावा. एकमेकांना महान असा शहाणपणाने शिकवा व बोध करा. स्तोत्रे, व गीते गा, आणि आध्यात्मिक गीते गाऊन उपकारस्तुतीसह आपल्या अंतःकरणात देवाला गीते गा. 17 आणि प्रत्येक गोष्ट जी तुम्ही बोलता किंवा करता ते प्रभु येशूच्या नावात करावे. यामुळे तुम्ही देवपित्याचे त्याच्याद्धारे आभार मानता.
2006 by World Bible Translation Center