Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे स्तुतिगीत.
143 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे
आणि नंतर माझ्या प्रार्थनेला उत्तर दे.
तू खरोखरच चांगला आणि निष्ठावान आहेस हे मला दाखव.
2 माझा, तुझ्या सेवकाचा न्यायनिवाडा करु नकोस.
कारण हे देवा, कोणीही जिवंत व्यक्ती तुझ्या दृष्टीने निरपराधी ठरत नाही.
3 पण माझे शत्रू माझा पाठलाग करीत आहेत.
त्यांनी माझे आयुष्य घाणीत बरबाद केले आहे.
ते मला खूप पूर्वी मेलेल्या लोकांसारखे अंधाऱ्याथडग्यात लोटत आहेत.
4 मी आशा सोडण्याच्या तयारीत आहे.
माझा धीर सुटत चालला आहे.
5 पण पूर्वी घडलेल्या घटना मला आठवत आहेत.
तू ज्या गोष्टी केल्यास त्यांचा मी विचार करतो.
तू आपल्या महान शक्तीने ज्या गोष्टी केल्यास त्या बद्दल मी बोलत आहे.
6 परमेश्वरा, मी माझे बाहू उभारुन तुझी प्रार्थना करतो.
तहानेली जमीन जशी पावसाची वाट बघते तशी मी तुझ्या मदतीची वाट बघत आहे.
7 परमेश्वरा, त्वरा करुन मला उत्तर दे.
माझा धीर आता सुटला आहे.
माझ्यापासून दूर जाऊ नकोस.
मला मरु देऊ नकोस आणि थडग्यात पडलेल्या मेलेल्या माणसांप्रमाणे मला होऊ देऊ नकोस.
8 परमेश्वरा, या सकाळी मला तुझे खरे प्रेम दाखव.
माझा तुझ्यावर विश्वास आहे.
मी ज्या गोष्टी करायला हव्या त्या मला दाखव.
मी माझे आयुष्य तुझ्या हाती सोपवले आहे.
9 परमेश्वरा, मी तुझ्याकडे संरक्षणासाठी येतो.
माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर.
10 मी जे करावे असे तुला वाटते ते मला दाखव.
तू माझा देव आहेस तुझे चांगले मन आत्मा मला साध्या देशात घेऊन जाऊ दे.
11 परमेश्वरा, मला जगू दे, म्हणजे लोक तुझ्या नावाची स्तुती करतील.
तू खरोखरच चांगला आहेस हे
मला दाखव आणि माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर.
12 परमेश्वरा, मला तुझे प्रेम दाखव.
जे शत्रू मला ठार मारायचा प्रयत्न करीत आहेत
त्यांचा पराभव कर.
का? कारण मी तुझा सेवक आहे.
यिर्मया शेत विकत घेतो
32 सिद्कीया यहूदाचा राजा होता त्याच्या कारकिर्दीचा दहाव्या वर्षी [a] यिर्मयाला परमेश्वराकडून एक संदेश आला. सिद्कीया राजाच्या कारकिर्दीचे दहावे वर्ष म्हणजेच नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीचे अठरावे वर्ष होय. 2 त्यावेळी बाबेलच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातला होता आणि यिर्मया चौकीदारांच्या पहाऱ्यात असलेल्या यहूदाच्या राजवाड्याच्या चौकात कैद केला गेला होता. 3-4 (यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला यिर्मयाने केलेले भविष्यकथन आवडले नाही. म्हणून त्याने यिर्मयाला कैद केले होते. यिर्मयाने सांगितले होते “परमेश्वर म्हणतो, ‘मी लवकरच यरुशलेम बाबेलच्या राजाच्या ताब्यात देईन. नबुखद्नेस्सर ही नगरी जिंकेल यहूदाचा राजा सिद्कीया खास्द्यांच्या सैन्यापासून पळून जाऊ शकणार नाही. त्याला बाबेलच्या राजाच्या ताब्यात दिले जाईल सिद्कीया बाबेलच्या राजाशी प्रत्यक्ष समोरासमोर बोलेल. 5 बाबेलचा राजा सिद्कीयाला बाबेलला नेईल. मी त्याला शिक्षा करेपर्यत तो तेथेच राहील.’ हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. ‘तुम्ही जर बाबेलच्या सैन्याबरोबर युद्ध केलेत, तरी तुम्ही त्यात विजयी होणार नाही.’”)
6 यिर्मया कैदेत असताना म्हणाला, “मला परमेश्वराचा संदेश मिळाला आहे. तो पुढीलप्रमाणे आहे. 7 ‘यिर्मया, तुझे काका शल्लूम यांचा मुलगा हानामेल लवकरच तुझ्याकडे येईल आणि तुला म्हणेल “अनाथोथजवळचे माझे शेत, यिर्मया, तू विकत घे. तू माझा अगदी निकटचा नातेवाईक असल्याने, तूच ते विकत घे. तो तुझाच हक्क आणि तुझीच जबाबदारी आहे.”’
8 “मग परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच घडले. माझा चुलतभाऊ हानामेल पहारेकऱ्यांच्या चौकात मला भेटला आणि म्हणाला, ‘यिर्मया, अनाथोथ गावाजवळचे माझे शेत तू विकत घे. अनाथोथ हे गाव बन्यामीनच्या कुळाच्या मालकीच्या प्रदेशात होते. तूच ते तुझ्यासाठी विकत घे. कारण ते विकत घेऊन त्याचा मालक होण्याचा तुझा हक्क आणि जबाबदारी आहे.’”
तेव्हा मला कळले की हाच देवाचा संदेश होता. देवाचा संदेश असाच आहे हे मला माहीत होतेच. 9 म्हणून मी माझा चुलतभाऊ हानामेल याच्याकडून ते शेत विकत घेतले. त्याबद्दल मी त्याला 17 चांदीची नाणी [b] दिली.
36 “तुम्ही लोक म्हणत आहात ‘बाबेलचा राजा यरुशलेम जिंकेल ह्या नगरीचा पराभव करण्यासाठी तो युद्ध, उपासमार आणि भयंकर रोगराई ह्यांचा उपयोग करील’ पण परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, 37 ‘मी इस्राएल व यहूदा यामधील लोकांना त्यांचा देश सोडण्यास बळजबरीने भाग पाडले आहे. मी त्यांच्यावर भयंकर रागावलो आहे. पण मी त्यांना या ठिकाणी परत आणीन. मी त्यांना जेथे जेथे जायला भाग पाडले, तेथून तेथून मी त्यांना गोळा करीन. मी त्यांना येथे परत आणीन. मी त्यांना शांततेत व सुखरुप राहू देईन. 38 इस्राएलमधील आणि यहूदातील लोक माझे होतील आणि मी त्यांचा देव होईन. 39 त्यांनी खरोखरच एक व्हावे म्हणून मी त्यांच्या मनात तशी इच्छा उत्पन्न करीन. त्यांच्या आयुष्यभर माझ्या उपासनेची खरोखरीची इच्छा हेच त्यांचे एकमेव ध्येय असेल. माझी उपासना आणि आदर केल्याने त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे खरोखरच भले होईल.
40 “‘यहूदातील आणि इस्राएलमधील लोकांबरोबर मी एक करार करीन. तो करार चिरंतन राहील. ह्या कराराप्रमाणे, मी ह्या लोकांकडे कधी पाठ फिरविणार नाही. मी त्यांच्याशी नेहमी चांगला वागेन. मी त्यांना माझा आदर करायची भावना देईन. मग ते माझ्यापासून कधीही दूर जाणार नाहीत. 41 ते मला प्रसन्न ठेवतील. त्यांचे भले करण्यात मला मौज वाटेल. मी त्यांना ह्या भूमीत रुजवीन आणि वाढवीन. मी माझ्या अंतःकरणापासून हे करीन.’”
काही सदूकी लोक येशूला फसवू पाहतात(A)
23 त्याच दिवशी काही सदूकी लोक त्याच्याकडे आले (हे लोक असे समजतात की पुनरूत्थान नाही) त्यांनी येशूला एक प्रश्न विचारला, 24 ते म्हणाले, “गुरूजी, मोशेने शिकविले की, जर एखादा मनुष्य मेला आणि त्याला मूलबाळ नसेल, तर त्याच्या भावाने किंवा जवळच्या नातेवाईकाने त्याच्या पत्नीशी लग्न करावे, म्हणजे मेलेल्या भावासाठी त्यांना मुले होतील. 25 आता, आमच्यामध्ये सात भाऊ होते. पहिल्याने लग्न केले आणि नंतर तो मेला आणि त्याला मूल नसल्याने त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न केले. 26 असेच दुसऱ्या व तिसऱ्या भावाच्या बाबतीतही घडले व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले आणि मेले. 27 शेवटी ती स्त्री मेली. 28 आता प्रश्न असा आहे की, पुनरूत्थानाच्या वेळेस ती कोणाची पत्नी असेल, कारण सर्व सातही भावांनी तिच्यांशी लग्न केले होते.”
29 उत्तर देताना येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही चुकीची समजूत करून घेत आहात, कारण तुम्हांला देवाचे वचन किंवा सामर्थ्य माहीत नाही. 30 तुम्हांला समजले पाहिजे की, पुनरूत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत. उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील. 31 तरी, मृतांच्या पुनरूत्थानाच्या संदर्भात देव तुमच्या फायद्यासाठी जे बोलला ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले काय? 32 तो म्हणाला, ‘मी अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचा देव आहे.’ [a] हा देव मेलेल्यांचा देव नाही तर जिवंत लोकांचा देव आहे.”
33 जेव्हा जमावाने हे ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले.
2006 by World Bible Translation Center