Revised Common Lectionary (Semicontinuous)
सुक्या हाडांचा दृष्टान्त
37 परमेश्वराचे सामर्थ्य माझ्यावर आले. परमेश्वराच्या आत्म्याने मला गावातून उचलून दरीच्या मध्यभागी आणून ठेवले. ती दरी मृतांच्या हाडांनी भरलेली होती. 2 दरीत जमिनीवर पुष्कळ हाडे पडलेली होत. त्यामधून परमेश्वराने मला चालायला लावले. ती हाडे अगदी सुकलेली असल्याचे मी पाहिले.
3 मग, परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही हाडे जिवंत होऊ शकतील का?”
मी उत्तरलो, “परमेश्वर देवा, ह्याचे उत्तर फक्त तुलाच माहीत आहे.”
4 परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “माझ्यावतीने त्या हाडांशी बोल. त्यांना सांग ‘सुक्या हाडांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका. 5 परमेश्वर, माझा प्रभू, तुम्हाला पुढील गोष्टी सांगतो: मी तुमच्यात प्राण निर्माण करीन मग तुम्ही जिवंत व्हाल. 6 मी तुमच्यावर स्नायू आणि मांस चढवीन आणि त्यावर कातडे ओढीन. मग तुमच्यात प्राण ओतीन. म्हणजे तुम्ही पुन्हा जिवंत व्हाल. मग तुम्हाला समजून चुकेल की मीच परमेश्वर व प्रभू आहे.’”
7 मग मी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, त्याच्यावतीने हाडांशी बोललो. माझे बोलणे सुरु असतानाच, मला मोठा आवाज ऐकू आला. हाडांचा खुळखुळाट झाला. ती एकमेकांना जोडली गेली. 8 माझ्या डोळ्यासमोर हाडांवर स्नायू, मांस व कातडे चढले. पण ती शरीरे हालली नाहीत. कारण त्यांत प्राण नव्हता.
9 मग परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “माझ्यावतीने वाऱ्याशी बोल. त्याला पुढील गोष्टी माझ्यावतीने सांग: ‘सर्व बाजूंनी येऊन तू ह्या शरीरात स्पंदन निर्माण कर त्यांच्यात प्राण घाल, म्हणजे ती पुन्हा जिवंत होतील.’”
10 मग मी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे वाऱ्याशी बोललो. मग मृत शरीरांत जीव आला. ती जिवंत होऊन उभी राहिली ते पुष्कळ लोक होते. ते मोठे सैन्यच होते.
11 मग परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही हाडे म्हणजे जणू काही सर्व इस्राएली कुळच आहे. इस्राएलचे लोक म्हणतात, ‘आमची हाडे सुकून गेली आहेत. [a] आम्हाला आशा राहिलेली नाही. आमचा संपूर्ण नाश झाला आहे.’ 12 म्हणून त्यांच्याशी माझ्यावतीने बोल. त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो ‘माझ्या माणसांनो, मी कबरी उघडून तुम्हाला कबरीतून बाहेर काढीन. मग मी तुम्हाला इस्राएलच्या भूमीत आणीन. 13 माझ्या माणसांनो, मी कबरी उघडून तुम्हाला त्यातून बाहेर काढल्यावर त्यांना कळेल की मीच परमेश्वर आहे. 14 मी तुमच्यात माझा आत्मा [b] ओतीन. म्हणजे मग तुम्ही पुन्हा जिवंत व्हाल. मग मी परमेश्वर असल्याचे कळेल. मी सांगितलेल्या गोष्टी मी घडवून आणल्या, हे ही तुमच्या लक्षात येईल.’” परमेश्वरच हे सर्व बोलला.
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
130 परमेश्वरा, मी खूप मोठ्या संकटात आहे
म्हणून मी तुला मदतीसाठी हाक मारीत आहे.
2 माझ्या प्रभु, माझ्याकडे लक्ष दे.
माझ्या मदतीच्या हाकेला ओ दे.
3 परमेश्वरा, तू जर लोकांना खरोखरच त्यांच्यासगळ्या
पापांबद्दल शिक्षा केलीस तर कुणीही माणूस जिवंत राहाणार नाही.
4 परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर.
म्हणजे मग तुझी उपासना करण्यासाठी लोक असतील.
5 मी मदतीसाठी परमेश्वराची वाट पाहतो आहे.
माझा आत्मा त्याची वाट बघत आहे.
परमेश्वर जे सांगतो त्यावर माझा विश्वास आहे.
6 मी माझ्या प्रभुची वाट बघत आहे.
मी सकाळ होण्याची खूप वाट पाहात असलेल्या रक्षकांसारखा आहे.
7 इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव.
केवळ परमेश्वराजवळच खरे प्रेम मिळते.
परमेश्वर पुन्हा पुन्हा आपला उध्दार करतो आणि
8 परमेश्वर इस्राएलला त्याच्या सर्व पापांबद्दल क्षमा करील.
6 देहाचे चिंतन हे मरण आहे. पण आत्म्याचे मनन हे जीवन आणि शांति आहे. 7 मानवी स्वभावाचे अधिकार असलेले पापी मन म्हणजे देवाबरोबर वैर आहे. कारण ते देवाच्या नियमाच्या आधीन होत नाही, व त्याला आधीन होताही येत नाही. 8 कारण जे देहस्वभावाच्या आधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्र करता येत नाही.
9 देवाचा आत्मा तुम्हांमध्ये राहतो, तर तुम्ही देहाचे नसून आत्म्याचे आहात. परंतु जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. 10 उलट जर ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे व तुमचा देह पापामुळे मेला आहे तरी नीतिमत्वामुळे तुमच्या आत्म्याच जीवन आहे. 11 आणि ज्या आत्म्याने येशूला मरणातून उठविले तो त्याचा आत्मा तुम्हांमध्ये राहतो त्या तुमच्या मर्त्य शरीराला जीवन देईल.
लाजराचा मृत्यू
11 लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो बेथानी गावात राहत होता. याच गावात मार्था आणि मरीया राहत होत्या. 2 ज्या मरीयेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे पाय आपल्या केसांनी पुसले तिचा हा भाऊ होता. 3 त्या बहिणींनी येशूला निरोप पाठविला की, हे प्रभु ज्याच्यावर तू प्रीति करतोस तो आजारी आहे.
4 पण येशूने हे ऐकून म्हटले, “हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे. याद्वारे देवाचे गौरव व्हावे यासाठी हा आजार आहे.” 5 येशू मार्था, मरीया व लाजर यांच्यावर प्रीति करीत असे. 6 म्हणून तो आजारी आहे हे ऐकल्यावरही तो होता त्याच ठिकाणी दोन दिवस राहिला. 7 नंतर त्याने शिष्यांना म्हटले, “आपण यहूदीयात परत जाऊ.”
8 शिष्य त्याला म्हणाले, “गुरुजी, यहूदी आपणांस दगडमार करु पाहत होते आणि आपण पुन्हा तेथे जात आहात काय?”
9 येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास असतात की नाहीत? जर एखादा दिवसा चालतो, तर त्याला ठेच लागत नाही. कारण तो या जगाचा प्रकाश पाहतो. 10 पण जर कोणी रात्री चालतो, तर त्याला ठेच लागते कारण त्याच्याकडे प्रकाश नसतो.”
11 या गोष्टी बोलल्यानंतर तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपी गेला आहे. पण मी त्याला झोपेतून जागे करावयास जात आहे.”
12 तेव्हा त्याचे शिष्य म्हणाले, “प्रभु, तो झोपी गेला असेल तर बरा होईल.” 13 पण येशू खरे तर त्याच्या मरणाविषयी बोलला होता. पण तो त्याच्या नेहमीच्या झोपेविषयी बोलत आहे, असे त्यांना वाटले.
14 तेव्हा येशूने त्यांना स्पष्ट सांगितले, “लाजर मेला आहे. 15 आणि मी तेथे नव्हतो म्हणून मला तुमच्यामुळे आनंद वाटतो. यासाठी की तुम्ही विश्वास धरावा. आपण त्याच्याकडे जाऊ या.”
16 तेव्हा दिदुम म्हटलेला थोमा शिष्यांना म्हणाला, “आपणही त्याच्याबरोबर जाऊ या अशासाठी की आपणही त्याच्याबरोबर मरु.”
बेथानीत येशू
17 येशू आल्यावर त्याला समजले की, लाजराला चार दिवसांपूर्वीच कबरेत ठेवण्यात आले आहे. 18 बेथानी यरुशलेमापासून तीन किलोमीटर अंतरापेक्षा कमी होते. 19 आणि पुष्कळसे यहुदी मार्था, मरीयेकडे त्यांचा भाऊ मेला याबद्दल सांत्वन करण्यासठी आले होते.
20 जेव्हा मार्थाने ऐकले की, आपल्या घरी येशू येत आहे तेव्हा ती त्याला भेटायला बाहेर गेली, पण मरीया घरातच राहिली. 21 “प्रभु” मार्था येशूला म्हणाली, “तू जर येथे असतास तर माझा भाऊ मेला नसता, 22 पण मला माहीत आहे की, तू जे मागशील ते देव तुला देईल.”
23 येशू म्हणाला, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.”
24 मार्था म्हणाली. “मला माहीत आहे शेवटच्या दिवशी पुनरुत्थानाच्या वेळेस तो पुन्हा उठेल.”
25 येशू तिला म्हणाला, “मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल. 26 आणि जो कोणी जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो. तो कधीच मरणार नाही. तू यावर विश्वास ठेवतेस काय?”
27 “होय प्रभु.” ती त्याला म्हणाली, “तू ख्रिस्त आहेस असा मी विश्वास धरते. तू या जगात आलेला असा देवाचा पुत्र आहेस.”
येशू रडतो
28 आणि असे म्हटल्यानंतर ती परत गेली आणि आपली बहीण मरीया हिला एका बाजूला बोलाविले आणि म्हणाली, “गुरुजी येथे आहेत. आणि ते तुला विचारीत आहेत.” 29 जेव्हा मरीयेने हे ऐकले तेव्हा ती लगेच उठली आणि त्याच्याकडे गेली. 30 आता तोपर्यंत येशू त्या खेड्याच्या आत आला नव्हता. तर मार्था त्याला भेटली, तेथेच अजूनपर्थंत होता. 31 तेव्हा जे यहूदी तिच्या घरात तिचे सांत्वन करीत होते ते, मरीया लगबगीने उठून बाहेर गेली असे पाहून, ती कबरेकडे शोक करायला गेली असे समजून तिच्यामागे गेले. 32 मग जेथे येशू होता तेथे मरीया आल्यावर ती त्याला पाहून त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, “प्रभु, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.”
33 मग येशू तिला रडताना पाहून व तिच्याबरोबर असलेल्या यहूद्यांनाही रडताना पाहून आत्म्यात व्याकुळ झाला व हेलावून गेला. 34 तो म्हणाला, “तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?”
ते म्हणाले, “प्रभु, या आणि पाहा.”
35 येशू रडला.
36 तेव्हा यहूदी म्हणाले, “पहा! त्याला तो किती आवडत होता.”
37 पण त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले, त्या या मनुष्याला लाजराला मरणापासून वाचविता येऊ नये काय?”
येशू लाजराला जिवंत करतो
38 मग येशू पुन्हा अंतःकरणात विव्हळ झाला असता कबरेकडे आला. ती गुहा होती, आणि तिच्यावर दगड लोटला होता. 39 येशूने म्हटले, “हा दगड काढा.”
मार्था म्हणाली, “पण प्रभु, लाजर मरुन चार दिवस झाले आहेत, त्याला आता दुर्गंधी येत असेल.” ती मृत लाजराची बहीण होती.
40 येशूने तिला म्हटले, “जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
41 मग त्यांनी दगड बाजूला केला. तेव्हा येशू वर पाहून म्हणाला, “पित्या, तू माझे ऐकले, म्हणून मी तुझे उपकार मानतो. 42 आणि तू नेहमीच माझे ऐकतोस हे मला माहीत आहे, पण जो लोकसमुदाय आजूबाजूला उभा आहे त्यांच्यासाठी मी हे बोललो. यासाठी की तू मला पाठविले आहेस यावर त्यांनी विश्वास ठेवावा.” 43 असे बोलल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, “लजरा, बाहेर ये.” 44 मग जो मेला होता तो लाजर जिवंत होऊन बाहेर आला. त्याचे हात पाय वस्त्रांनी बांधले होते व तोंड रुमालाने झाकले होते.
येशू लोकांना म्हणाला. “त्याला मोकळे करा आणि जाऊ द्या.”
यहूदी पुढारी येशूला ठार मारण्याचा कट करतात(A)
45 जे यहूदी मरीयेकडे आले होते, त्यांनी येशूने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
2006 by World Bible Translation Center