Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
130 परमेश्वरा, मी खूप मोठ्या संकटात आहे
म्हणून मी तुला मदतीसाठी हाक मारीत आहे.
2 माझ्या प्रभु, माझ्याकडे लक्ष दे.
माझ्या मदतीच्या हाकेला ओ दे.
3 परमेश्वरा, तू जर लोकांना खरोखरच त्यांच्यासगळ्या
पापांबद्दल शिक्षा केलीस तर कुणीही माणूस जिवंत राहाणार नाही.
4 परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर.
म्हणजे मग तुझी उपासना करण्यासाठी लोक असतील.
5 मी मदतीसाठी परमेश्वराची वाट पाहतो आहे.
माझा आत्मा त्याची वाट बघत आहे.
परमेश्वर जे सांगतो त्यावर माझा विश्वास आहे.
6 मी माझ्या प्रभुची वाट बघत आहे.
मी सकाळ होण्याची खूप वाट पाहात असलेल्या रक्षकांसारखा आहे.
7 इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव.
केवळ परमेश्वराजवळच खरे प्रेम मिळते.
परमेश्वर पुन्हा पुन्हा आपला उध्दार करतो आणि
8 परमेश्वर इस्राएलला त्याच्या सर्व पापांबद्दल क्षमा करील.
देवाला लोकांचा नाश करण्याची इच्छा नाही
10 “मानवपुत्रा, माझ्यावतीने इस्राएलच्या लोकांशी बोल. कदाचित्. ते लोक म्हणतील, ‘आम्ही पाप केले. नियम मोडले आमची पापे आम्हाला बोजा झाली आहेत. आमच्या पापांनी आम्ही सडलो आता जगण्यासाठी आम्ही काय करावे?’
11 “मी शपथपूर्वक सांगतो ‘दुष्टांचे मरण मी इच्छिले नव्हते. मला त्यांनी मरावे असे अजिबात वाटत नाही. त्या पापी लोकांनी परत माझ्याकडे यावे असे मला वाटते. त्यांनी आपला मार्ग बदलावा म्हणजे त्यांना खरोखरीचे जीवन जगता येईल. तेव्हा माझ्याकडे परत या. दुष्कृत्ये करायचे सोडा. इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही का मरावे?’ असे परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, असे तू त्या लोकांना सांगितले पाहिजेस.
12 “मानवपुत्रा, तू तुझ्या लोकांना असेही सांग ‘जर एखादा सज्जन कुमार्गाला लागून पाप करु लागला, तर त्याने पूर्वी केलेल्या चांगल्या गोष्टी त्याला वाचवू शकणार नाहीत. तसेच एखादा पापापासून परावृत झाला, तर त्याची भूतकाळातील पापे त्याचा नाश करु शकणार नाहीत. तेव्हा लक्षात ठेवा, पूर्वी केलेली सत्कृत्ये, आता तुम्ही दुष्कत्ये करु लागल्यास तुम्हाला वाचविणार नाहीत.’
13 “कदाचित् मी सज्जन माणसाला ‘तो जगेल’ असे सांगीन. पण त्यामुळे त्याला ‘आपण पूर्वी केलेली सत्कृत्ये आपल्याला वाचवतील असे वाटेल. म्हणून तो पाप करु लागेल, तर त्याची पूर्वीची सत्कृत्ये मी स्मरणार नाही. तो पाप करु लागल्याने तो मरेल.’
14 “किंवा मी दुष्टाला ‘तू मरशील’ असे सांगीन. पण तो कदाचित त्याचा जीवनमार्ग बदलेल. तो पाप करण्याचे सोडून देऊन चांगल्या रीतीने जगू लागेल. तो सज्जन व प्रामाणिक होईल. 15 त्याने कर्ज देताना गहाण म्हणून ठेवून घेतलेल्या वस्तू तो कदाचित परत करेल. त्याने चोरलेल्या वस्तूंची किंमत तो चुकती करील. जीवनातील नियमाप्रमाणे तो चालू लागेल, तो वाईट गोष्टी करण्याचे सोडून देईल, तर तो नक्कीच जगेल. तो मरणार नाही. 16 त्याने पूर्वी केलेली पापे मी स्मरणार नाही. का? कारण आता तो योग्य रीतीने जगत आहे, तो प्रामाणिक झाला आहे. तेव्हा तो जगेल.
सातवा कर्णा
15 सातव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाले. ते आवाज म्हणाले:
“जगाचे राज्य आता आमच्या प्रभुचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे.
आणि तो अनंतकाळपर्यंत राज्य करील.”
16 मग जे चोवीस वडील सिंहासनावर बसले होते, ते आपल्या चेहऱ्यावर पडले व त्यांनी देवाची भक्ति केली. हे वडील देवासमोर त्यांच्या सिंहासनावर बसले. 17 ते म्हणाले:
“आम्ही तुझे आभार मानतो. सर्वसमर्थ प्रभु देवा,
तूच एक आहेस की जो तू आहेस व होतास.
आम्ही तुझे उपकार मानतो कारण तुझे महान सामर्थ्य वापरुन
सत्ता चालविण्यास सुरुवात केलीस
18 जगातील लोक रागावले
पण आता तुझा राग आला आहे,
आता मेलेल्या माणसांचा न्याय करण्याची वेळ आली आहे.
तुझे सेवक, संदेष्टे यांना बक्षीस देण्याची वेळ आली आहे.
आणि तुझ्या पवित्र लोकांना बक्षिस देण्याची वेळ आली आहे.
जे लहानमोठे लोक तुझा आदर करतात,
त्यांना बक्षिस देण्याची वेळ आली आहे.
जे पृथ्वीचा नाश करतात, त्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे!”
19 मग देवाने स्वर्गातील मंदिर उघडले. तेव्हा तेथे कराराचा कोश दिसला आणि विजा चमकू लागल्या. गोंगाट, गडगडाट, भूकंप व गारांचे वादळ झाले.
2006 by World Bible Translation Center