Revised Common Lectionary (Semicontinuous)
146 परमेश्वराची स्तुती करा.
माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर.
2 मी आयुष्यभर परमेश्वराची स्तुती करीन.
मी आयुष्यभर त्याचे गुणगान करीन.
3 तुमच्या नेत्यांवर मदतीसाठी अवलंबून राहू नका.
लोकांवर विश्वास टाकू नका.
का? कारण लोक तुम्हाला वाचवू शकत नाहीत.
4 लोक मरतात आणि त्यांचे दफन केले जाते
आणि नंतर मदतीच्या त्यांच्या सगळ्या योजनाही जातात.
5 पण जे लोक देवाला मदतीबद्दल विचारतात ते सुखी असतात.
ते लोक परमेश्वरावर, त्यांच्या देवावर अवलंबून असतात.
6 परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली.
परमेश्वराने समुद्र आणि त्यातल्या सर्व गोष्टी निर्माण केल्या.
परमेश्वर त्यांचे सदैव रक्षण करील.
7 जे लोक दु:खी कष्टी आहेत.
त्यांच्यासाठी परमेश्वर योग्य गोष्टी करतो.
तो भुकेल्यांना अन्न देतो.
तुरुंगात बंद असलेल्यांना तो सोडवतो.
8 परमेश्वर आंधळ्यांना पुन्हा दिसू लागण्यासाठी मदत करतो.
संकटात असलेल्या लोकांना परमेश्वर मदत करतो.
परमेश्वराला चांगले लोक आवडतात.
9 परमेश्वर आपल्या देशातल्या परक्यांचे रक्षण करतो.
परमेश्वर विधवांची आणि अनांथांची काळजी घेतो.
परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
10 परमेश्वर सदैव राज्य करील
सियोन तुझा देव सदैव राज्य करीत राहील
परमेश्वराची स्तुती करा.
17 “आता तुझ्याजवळ तांबे आहे,
मी तुला सोने आणीन.
आता तुझ्याजवळ लोखंड आहे,
मी तुला चांदी आणून देईन.
मी तुझ्याजवळील लाकडाचे तांबे करीन.
तुझ्या खडकांचे लोखंड करीन.
मी तुझ्या शिक्षेचे रूपांतर शांतीत करीन.
आता लोक तुला दुखावतात,
पण तेच तुझ्यासाठी
चांगल्या गोष्टी करतील.
18 तुझ्या देशात पुन्हा कधीही हिंसेची वार्ता ऐकू येणार नाही.
लोक तुझ्या देशावर पुन्हा कधीही चढाई करणार नाहीत.
आणि तुला लुटणार नाहीत.
तू तुझ्या वेशीला ‘तारण’ आणि तुझ्या दरवाजांना ‘स्तुती’ अशी नावे देशील.
19 “या पुढे तुला रात्रंदिवस चंद्र सूर्य नव्हे
तर परमेश्वर प्रकाश देईल.
परमेश्वर तुझा चिरकालाचा प्रकाश होईल.
तुझा देवच तुझे वैभव असेल.
20 तुझा ‘सूर्य’ कधी मावळणार नाही
आणि ‘चंद्राचा’ क्षय होणार नाही.
कारण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश असेल.
तुझा दु:खाचा काळ संपेल.
21 “तुझे सर्व लोक सज्जन असतील.
त्यांना कायमची भूमी मिळेल.
मी त्या लोकांना निर्माण केले.
मी माझ्या स्वतःच्या हातांनी
तयार केलेली ती सुंदर रोपटी आहेत.
22 सर्वात लहान कुटुंबाचा मोठा समूह होईल.
सर्वांत लहान कुटुंबाचे मोठे बलवान राष्ट्र होईल.
योग्य वेळी मी, परमेश्वर, त्वरेने येईन.
मी ह्या गोष्टी घडवून आणीन.”
येशू आणखी लोकांना बरे करतो
27 तेव्हा येशू तेथून जात असता दोन आंधळे त्याच्यामागे ओरडत चालले. म्हणू लागले, “दाविदाच्या पुत्रा, आम्हांवर दया करा.”
28 येशू आत गेला तेव्हा ते आंधळेही आत गेले. त्याने त्यांना विचारले. “मी तुम्हांला दृष्टि देऊ शकेन असा तुमचा विश्वास आहे का?” “होय, प्रभु,” त्यांनी उत्तर दिले.
29 मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्या बाबतीत घडो.” 30 आणि त्यांना पुन्हा दृष्टि आलि. येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, “पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.” 31 परंतु ते बाहेर गेले आणि त्यांनी त्या प्रदेशात सगळीकडे ही बातमी पसरविलि.
32 मग ते दोघे निघून जात असताना लोकांनी एका भूतबाधा झालेल्या माणसाला येशूकडे आणले. 33 जेव्हा येशूने त्यामधून भूत काढून टाकले तेव्हा पूर्वी मुका असलेला तो मनुष्य बोलू लागला. लोकांना ह्याचे आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “इस्राएलमध्ये याआधी असे कधीही झालेले पाहण्यात आले नाही.”
34 परंतु परूशी म्हणाले, “हा भूतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भुते काढतो.”
2006 by World Bible Translation Center