Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी गित्तीथ चालीवर बसवलेले आसाफये स्तोत्र.
81 आनंदी राहा आणि आमची शक्ती असलेल्या देवासमोर गाणे गा,
इस्राएलाच्या देवासमोर आनंदाने ओरडा.
2 संगीताची सुरुवात करा.
डफ वाजवा.
सतार आणि वीणा वाजवा.
3 अमावस्येला एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
पौर्णिमेला ही एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
याचवेळी आपला सण सुरु होतो.
4 हा इस्राएल देशाचा नियम आहे.
देवाने याकोबाला हीच आज्ञा केली.
5 जेव्हा देवाने त्याला मिसरमधून दूर नेले
तेव्हा त्याने योसेफाबरोबर हा करार केला.
मिसरमध्येच आम्ही आम्हाला न समजणारी भाषा ऐकली.
6 देव म्हणतो, “मी तुमच्या खांद्यावरचे ओझे उचलले.
तुमच्या खांद्यावरची कामगाराची टोपली तुम्हाला टाकायला लावली.
7 तुम्ही लोक संकटात होता.
तुम्ही मदतीसाठी हाका मारल्या आणि मी तुमची मुक्तता केली.
मी वादळी ढगात लपलो होतो आणि मी तुम्हाला उत्तर दिले.
मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.”
8 “लोकहो! माझे ऐका, मी तुम्हाला माझा करार देईन
इस्राएल कृपा करुन माझे ऐक.
9 परदेशी लोक ज्या चुकीच्या देवाची पूजा करतात
त्यापैकी कुठल्याही देवाची पूजा करु नकोस.
10 मी, परमेश्वरच तुमचा देव आहे
मी तुम्हाला मिसरच्या प्रदेशातून बाहेर आणले.
इस्राएल, तुझे तोंड उघड मग मी तुला खायला घालीन.”
11 “परंतु माझ्या लोकांनी माझे ऐकले नाही.
इस्राएलने माझी आज्ञा पाळली नाही.
12 म्हणून मी त्यांना जे करायची इच्छा होती ते करु दिले.
इस्राएलने सुध्दा त्याला हवे ते केले.
13 जर माझ्या लोकांनी माझे ऐकले,
जर इस्राएल माझ्या इच्छे प्रमाणे राहिला,
14 तर मी त्यांच्या शत्रूंचा पराभव करीन.
जे लोक इस्राएलवर संकटे आणतात त्यांना मी शिक्षा करीन.
15 परमेश्वराचे शत्रू भीतीने थरथर कापतील.
त्यांना कायमची शिक्षा होईल.
16 देव त्याच्या माणसांना सगळ्यात चांगला गहू देईल.
देव त्याच्या माणसांना त्यांचे समाधान होईपर्यंत मध देईल.”
4 याकोबाच्या वंशजांनो, इस्राएलमधल्या कुळांनो,
परमेश्वराचा संदेश ऐका.
5 परमेश्वर असे म्हणतो:
“मी तुमच्या पूर्वजांशी न्यायीपणाने वागलो नाही असे तुम्हाला वाटते का?
म्हणून ते माझ्यापासून दूर गेले का?
त्यांनी कवडी मोलाच्या दैवतांना
पूजले व स्वतः कवडीमोल झाले.
6 तुमचे पूर्वज असे म्हणाले नाहीत
‘परमेश्वराने आम्हाला मिसरहून आणले.
परमेश्वराने आम्हाला वाळवंटातून पार नेले.
त्यानेच आम्हाला ओसाड आणि खडकाळ प्रदेशातून बाहेर नेले.
काळोख व धोका असलेल्या, निर्जन, जेथून कोणीही प्रवास करीत नाही
अशा प्रदेशातून देवाने आम्हाला पार केले.
तो परमेश्वर आता कोठे आहे?’”
7 परमेश्वर म्हणतो, “मी तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टींनी
भरलेल्या उत्तम प्रदेशात आणले.
तुम्हाला तेथे पिकणारी फळे व धान्य खायला मिळावे म्हणून मी हे केले.
पण तुम्ही माझी ही भूमी ‘गलिच्छ’ केली.
मी तुम्हाला दिलेली
ही भूमी तुम्ही खराब केली.
8 “याजकांनी ‘परमेश्वर कोठे आहे’
असे विचारले नाही.
कायदा जाणणाऱ्यांनी मला जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.
इस्राएलचे नेते माझ्याविरुद्ध् गेले.
संदेष्ट्यांनी खोटा देव बआल याच्या नावे भविष्य वर्तविले.
त्यांनी निरुपयोगी मूर्तींची पूजा केली.”
9 परमेश्वर म्हणतो, “म्हणून आता मी तुम्हाला पुन्हा दोषी ठरवीन
आणि तुमच्या नातवंडांनासुद्धा् दोषी ठरवीन.
10 समुद्र पार करुन कित्ती बेटावर जा.
कोणाला तरी केदारला पाठवा.
लक्षपूर्वक पाहा.
कोणी असे कधी काही केले आहे का ते बघा!
11 कोणत्या राष्ट्राने, नवीन दैवतांची पूजा करायची म्हणून,
जुन्या, दैवतांना पूजायचे थांबविले आहे का?
नाही. आणि त्यांचे दैवत मुळी देवच नाही.
पण माझ्या लोकांनी त्यांच्या तेजस्वी देवाची पूजा करायचे
सोडून कवडीमोलाच्या मूर्तींची पूजा करणे सुरु केले.
12 “आकाशा, घडलेल्या गोष्टीबद्दल तुला आश्र्चर्याचा धक्का बसू दे.
भीतीने थरथर काप.”
हा परमेश्वराचा संदेश होता.
13 “माझ्या लोकांनी दोन पापे केली.
ते माझ्यापासून दूर गेले.
(मी जिवंत पाण्याचा झरा आहे.)
आणि त्यांनी स्वतःची पाण्याची टाकी खोदली.
(ते दैवंताकडे वळले.)
पण ती टाकी फुटली आहे.
त्यात पाणी राहू शकत नाही.
येशू यरुशलेमात शिक्षण देतो
14 अर्धाअधिक सण पार पडला होता तेव्हा येशू मंदिरात गेला आणि तेथे लोकांना शिक्षण देण्यास त्याने सुरुवात केली. 15 यहूदी लोकांना मोठे आश्चर्य वाटले. ते म्हणाले, “हा माणूस शाळेत कधी शिकला नाही. हे एकढे तो कोठून शिकला?”
16 येशूने उत्तर दिले, “मी ज्या गोष्टी शिकवितो त्या माझ्या स्वतःच्या नाहीत. माझी शिकवण मला पाठविणाऱ्या पित्याकडून आलेली आहे. 17 जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो त्याला माझी शिकवण देवाकडून आहे हे कळेल. त्याला हे कळेल की, माझी शिकवण माझी स्वतःची नाही. 18 जो कोणी स्वतःच्या कल्पना शिकवितो, तो स्वतःला मानसन्मान मिळावा असा प्रयत्न करतो, परंतु ज्याने मला पाठविले त्याचा सन्मान करण्याचा जो प्रयत्न करतो तोच माणूस सत्य सांगतो. त्याचे काहीच खोटे नसते. 19 मोशेने तुम्हांला नियमशास्त्र दिले. खरे ना? परंतु तुमच्यातील कोणी नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही का बरे मला जिवे मारायला पाहता?”
20 लोकांनी उत्तर दिले, “तुम्हांला भूत लागले आहे. आम्ही काही तुम्हांला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत नाही.”
21 येशू त्यांना म्हणाला, “मी एक चमत्कार केला आणि तुम्ही सारे चकित झालात. 22 मोशेने तुम्हांला सुंतेचा नियम दिला. परंतु खरे पाहता सुंता मोशेपासून आलेली नाही. ती मोशेच्या आधीच आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे. म्हणून कधी कधी शब्बाथ दिवशीही तुम्ही मुलांची सुंता करता. 23 याचा अर्थ मोशेच्या नियमांचे पालन करण्यासाठी शब्बाथ दिवशीही बालकाची सुंता करता येते. मग मी शब्बाथ दिवशी एका माणसाचे संपूर्ण शरीर बरे केले तर तुम्ही माझ्यावर का रागावता? 24 वरवर पाहून न्याय करु नका. तर खरोखर काय बरोबर आहे याची कसून शहानिशा करुन योग्य प्रकारे न्याय करा.”
येशू हाच ख्रिस्त आहे काय? लोकांना पडलेला प्रश्न
25 मग यरुशलेमात राहणारे काही लोक म्हणाले, “याच माणसाला लोक जिवे मारण्याच्या प्रयत्नात आहेत. 26 परंतु सर्व लोक आपल्याला पाहू आणि ऐकू शकतील अशा ठिकाणी हा शिक्षण देत आहे. आणि शिक्षण देताना त्याला थांबविण्याचा कोणीही प्रयत्न करीत नाही. कदाचित हा खरोखरच ख्रिस्त आहे असे पुढारी लोकांनी ठरविले असेल. 27 परंतु हा माणूस कोठून आला आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि खरोखरचा ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठून येईल हे कोणालाच कळणार नाही.”
28 अजूनही येशू मंदिरात शिक्षण देत होता. येशू म्हणाला, “होय, तुम्ही मला ओळखता आणि मी कोठला हेही तुम्हांला माहीत आहे. परंतु मी स्वतःच्या अधिकाराने आलो नाही. जो खरा देव आहे त्याने मला पाठविले. तुम्ही त्याला ओळखीत नाही. 29 पण मी त्याला ओळखतो. मी त्याच्याकडून आलो आणि त्यानेच मला पाठविले.”
30 येशू हे बोलला तेव्हा लोकांनी त्याला धरण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही त्याला धरु शकला नाही, कारण त्याला मारले जाण्याची वेळ अजून आली नव्हती. 31 परंतु लोकांपैकी पुष्कळ जणांनी येशूवर विश्वास ठेवला. लोक म्हणाले, “आम्ही ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत आहोत. ख्रिस्त आला तर या मनुष्याने केले त्याहून जास्त चमत्कार तो करुन दाखवील काय? नाही! म्हणून हाच ख्रिस्त असला पाहिजे.”
येशू पवित्र आत्याविषयी सांगतो
37 सणाचा शेवटचा दिवस आला. तो फार महत्वाचा दिवस होता. त्या दिवशी उभे राहून येशू मोठ्याने म्हणाला, “ज्याला तहान लागली असेल त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. 38 जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवील तर त्याच्या अंतःकरणातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” असे पवित्र शास्त्र सांगते. 39 येशू आत्म्याविषयी बोलत होता. लोकांना अजून पवित्र आत्मा देण्यात आला नव्हता. कारण येशू अजून मरण पावला नव्हता आणि गौरवात उठविला गेला नव्हता. परंतु नंतर येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तो मिळणार होता.
2006 by World Bible Translation Center