Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी गित्तीथ चालीवर बसवलेले आसाफये स्तोत्र.
81 आनंदी राहा आणि आमची शक्ती असलेल्या देवासमोर गाणे गा,
इस्राएलाच्या देवासमोर आनंदाने ओरडा.
2 संगीताची सुरुवात करा.
डफ वाजवा.
सतार आणि वीणा वाजवा.
3 अमावस्येला एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
पौर्णिमेला ही एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
याचवेळी आपला सण सुरु होतो.
4 हा इस्राएल देशाचा नियम आहे.
देवाने याकोबाला हीच आज्ञा केली.
5 जेव्हा देवाने त्याला मिसरमधून दूर नेले
तेव्हा त्याने योसेफाबरोबर हा करार केला.
मिसरमध्येच आम्ही आम्हाला न समजणारी भाषा ऐकली.
6 देव म्हणतो, “मी तुमच्या खांद्यावरचे ओझे उचलले.
तुमच्या खांद्यावरची कामगाराची टोपली तुम्हाला टाकायला लावली.
7 तुम्ही लोक संकटात होता.
तुम्ही मदतीसाठी हाका मारल्या आणि मी तुमची मुक्तता केली.
मी वादळी ढगात लपलो होतो आणि मी तुम्हाला उत्तर दिले.
मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.”
8 “लोकहो! माझे ऐका, मी तुम्हाला माझा करार देईन
इस्राएल कृपा करुन माझे ऐक.
9 परदेशी लोक ज्या चुकीच्या देवाची पूजा करतात
त्यापैकी कुठल्याही देवाची पूजा करु नकोस.
10 मी, परमेश्वरच तुमचा देव आहे
मी तुम्हाला मिसरच्या प्रदेशातून बाहेर आणले.
इस्राएल, तुझे तोंड उघड मग मी तुला खायला घालीन.”
11 “परंतु माझ्या लोकांनी माझे ऐकले नाही.
इस्राएलने माझी आज्ञा पाळली नाही.
12 म्हणून मी त्यांना जे करायची इच्छा होती ते करु दिले.
इस्राएलने सुध्दा त्याला हवे ते केले.
13 जर माझ्या लोकांनी माझे ऐकले,
जर इस्राएल माझ्या इच्छे प्रमाणे राहिला,
14 तर मी त्यांच्या शत्रूंचा पराभव करीन.
जे लोक इस्राएलवर संकटे आणतात त्यांना मी शिक्षा करीन.
15 परमेश्वराचे शत्रू भीतीने थरथर कापतील.
त्यांना कायमची शिक्षा होईल.
16 देव त्याच्या माणसांना सगळ्यात चांगला गहू देईल.
देव त्याच्या माणसांना त्यांचे समाधान होईपर्यंत मध देईल.”
इसहाकासाठी पत्नी
24 अब्राहाम आता फार म्हातारा झाला होता; परमेश्वराने अब्राहामाला व त्याने जे जे केले त्या सर्व गोष्टीना आशीर्वादित केले होते. 2 अब्राहामाचा सर्वात म्हातारा सेवक होता; तो त्याच्या सर्व मालमत्तेचा व घरदाराचा कारभार पाहणारा मुख्य कारभारी होता. एकदा अब्राहामाने त्याला बोलावून म्हटले, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव 3 आणि आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ता परमेश्वर याजसमोर मला वचन दे की माझा मुलगा इसहाक याला तू कनान देशातील कोणत्याच मुलीबरोबर लग्न करु देणार नाहीस; आपण या कनान देशात राहतो हे खरे परंतु या देशातील कोणत्याच मुलीबरोबर त्याला लग्न करु देणार नाहीस. 4 माझ्या देशाला, माझ्या लोकांकडे जा आणि तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी नवरी शोधून तिला येथे आण.”
5 त्याचा सेवक त्याला म्हणाला, “यदा कदाचित ती स्त्री माझ्याबरोबर या देशात येण्यास तयार होणार नाही, तर मग माझ्याबरोबर तुमच्या मुलास ज्या देशातून तुम्ही आला त्या देशात घेऊन जाऊ काय?”
6 अब्राहाम त्याला बजावून म्हणाला, “नाही, नाही, माझ्या मुलास त्या देशाला घेऊन जाऊ नकोस. 7 स्वर्गाच्या ज्या परमेश्वराने मला माझ्या बापाच्या घरातून व आमच्या वंशजांच्या जन्मभूमीतून काढून वचन देऊन येथे आणले व ही येथील नवीन भूमी मला व माझ्या वंशजास वतन म्हणून दिली तो परमेश्वर तू तेथे जाऊन पोहोंचण्यापूर्वी त्याचा दूत पाठवील आणि तू तेथून माझ्या मुलाकरीता नवरी आणशील. 8 परंतु ती मुलगी तुझ्याबरोबर येथे येण्यास कबूल झाली नाही तर मग तू माझ्या शपथेतून मोकळा होशील; परंतु काहीही झाले तरी माझ्या मुलाला तिकडे बिलकूल घेऊन जाऊ नकोस.”
9 तेव्हा त्याच्या सेवकाने आपल्या धन्याच्या मांडीखाली हात ठेवून तशी शपथ घेतली.
शोध सुरु होतो
10 अब्राहामाचे दहा उंट घेऊन त्याचा सेवक निघाला; त्याने आपल्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर व मोलवान वस्तू देणग्या देण्यासाठी घेतल्या; तो अराम-नहाराईम मेसोपोटेमीयातील (म्हणजे मसोपटेम्या) नाहोर राहात असलेल्या नगरात गेला. 11 तो सेवक नगराबाहेरच्या विहिरीजवळ गेला संध्याकाळी पाणी नेण्यासाठी बायका तेथे येत असत. त्याने उटांना विसावा घेण्यासाठी तेथे बसवले.
12 सेवक म्हणाला, “हे परमेश्वर देवा, तू माझा स्वामी अब्राहाम याचा परमेश्वर आहेस; आजच त्याच्या मुलासाठी मला मुलगी सापडावी असे कर; कृपया, माझा मालक अब्राहाम ह्याच्यावर एवढी दया कर. 13 मी येथे या विहिरीजवळ उभा राहात आहे. 14 मी तर इसहाकासाठी योग्य मुलगी निवडण्याकरिता काही विशेष खुणेचा शोध करीत आहे; तर असे घडू दे, की मी ज्या मुलीस म्हणेन, ‘मुली तुझी पाण्याची घागर उतरुन मला प्यायला पाणी दे,’ आणि ती जर असे म्हणेल, ‘प्या बाबा, आणि मी तुमच्या उंटांसही पाणी पाजते;’ जर असे घडून येईल तर मग तीच इसहाकासाठी योग्य नवरी असल्याचे तू सिद्ध केले आहेस असे होईल आणि तू माझ्या स्वामीवर दया केली आहेस असे मला कळेल.”
नवरी सांपडते
15 मग त्या सेवकाची प्रार्थना संपली नाहीं तोंच अब्राहामाचा भाऊ नाहोर याजपासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची कन्या, रिबका नावाची एक तरुणी खांद्यावर घागर घेऊन विहिरीपाशी आली; 16 ती फार देखणी व सुंदर मुलगी होती; ती कुमारी होती; ती पुरुषाबरोबर कधीच निजली नव्हती. विहिरीत उतरुन तिने घागर भरली. 17 तेव्हा सेवक धावत जाऊन तिला म्हणाला, “मुली, तुझ्या घागरीतून मला थोडे पाणी पाज.”
18 तेव्हा ताबडतोब रिबकेने आपल्या खांद्यावरील घागर उतरुन त्याला पाणी पाजले; ती म्हणाली, “प्या बाबा;” 19 त्याचे पुरेसे पाणी पिऊन झाल्यावर ती म्हणाली, “तुमच्या उंटांनाही भरपूर पाणी पाजते.” 20 मग तिने लगेच उंटासाठी घागर डोणीत ओतली आणि आणखी पाणी आणण्याकरिता ती धावत विहिरीकडे गेली, या प्रमाणे तिने सगळ्या उंटांना भरपूर पाणी पाजले.
21 तेव्हा तो सेवक अचंबा करुन तिच्याकडे पाहात राहिला; परमेश्वराने आपल्या प्रार्थनेचे उत्तर देऊन आपला प्रवास यशस्वी केला की काय अशी खात्री करण्याकरिता तो शांतपणे विचार करीत उभा राहिला. 22 उंटाचे पाणी पिणे झाल्यावर त्या सेवकाने रिबकेला पांच औंस भाराची (म्हणजे अर्धा शेकेल भाराची) सोन्याची आंगठी दिली; तसेच त्याने प्रत्येकी पाच शेकेल भाराच्या दोन (म्हणजे दहा शेकेल भाराच्या दोन) सोन्याच्या बांगड्या तिला दिल्या. 23 त्याने तिला विचारले, “मुली, तू कोणाची मुलगी आहेस? तुझ्या बापाचे नाव काय? तुझ्या बापाच्या घरी आम्हा सर्वांना उतरुन रात्री मुक्काम करावयास जागा आहे काय?”
24 रिबकेने उत्तर दिले, “नाहोर व मिल्का यांचा मुलगा बथुवेल याची मी कन्या;” आणखी ती पुढे म्हणाली, 25 “हो, तुमच्या उंटासाठी आमच्यापाशी भरपूर गवत व पेंढा आहे आणि तुमच्या सर्वांसाठी मुक्काम करण्यास माझ्या बापाच्या घरी भरपूर जागा आहे.”
26 तेव्हा सेवकाने नमन करुन परमेश्वराची उपासना केली. 27 तो म्हणाला, “माझ्या स्वामीचा, अब्राहामाचा परमेश्वर धन्यवादित आहे; त्याची माझ्या स्वामीवर प्रेमदया आणि निष्ठा आहे, माझ्या स्वामिच्या, पुत्रासाठी योग्य अशा मुलीकडेच परमेश्वराने मला नेले आहे.”
1 वडिलाकडून, [a] देवाने निवडलेल्या बाईना [b] व तिच्या मुलांना, सत्यात सहभागी असलेल्या लोकांप्रमाणे ज्यांच्यावर मी प्रीति करतो, आणि तुमच्यावर प्रीति करणारा मी एकटाच नाही, तर ज्यांची सत्याशी ओळख झाली आहे असे सर्वजणसुद्धा प्रीति करतात. 2 या सत्यामुळे जे आमच्यामध्ये असते, ते आमच्यामध्ये अनंतकाळपर्यंत राहील.
3 देवपित्यापासून आणि पित्याचा पुत्र प्रभु येशू ख्रिस्त याजपासून कृपा, दया व शांति ही सत्यात व प्रीतित आपणबरोबर राहोत.
4 पित्याने आपल्याला दिलेल्या आज्ञेप्रमाणे तुमची काही मुले सत्यात चालतात असे मला दिसून आले म्हणून मला फार आनंद झाला. 5 आणि आता, बाई, कुरिया, मी तुला नम्रपणे विनंति करतो की, आपण एकमेकांवर प्रीति करावी. मी ही तुला नवी आज्ञा करतो असे नाही, तर जी प्रारंभापासून तुला देण्यात आलेली होती, 6 आणि त्याच्या आज्ञेत राहणे म्हणजेच प्रीति करणे होय. हीच आज्ञा आहे जी तुम्ही सुरुवातीपासून ऐकली आहे: की तुम्ही प्रीतीचे जीवन जगावे.
7 येशू मानवी देह धारण करुन या जगात आला या गोष्टीवर विश्वास न ठेवणारे अनेक फसवे भोंदू लोक जगात निघाले आहेत. असा फसविणारा भोंदू मनुष्य हाच ख्रिस्तविरोधी होय. 8 सावध असा! यासाठी की ज्यासाठी आम्ही काम केले ते तुम्ही हातचे जाऊ देऊ नये तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हांला मिळावे.
9 जो मनुष्य ख्रिस्ताविषयीच्या शिकवणुकीप्रमाणे चालत नाही, तर तिचे उल्लंघन करतो, त्याला देव मिळाला नाही. जो कोणी ख्रिस्ताविषयीच्या शिकवणुकीप्रमाणे चालतो त्याला देवपिता व पुत्र असे दोन्ही मिळाले आहेत. 10 जर एखादा मनुष्य तुमच्या घरी आला आणि ख्रिस्ताची शिकवण आचरणात आणीत नसला तर त्याला आपल्या घरात घेऊ नका. किंवा त्याला सलामही करु नका. 11 कारण अशा मनुष्याला जो कोणी सलाम करतो तो त्याच्या वाईट कामांमध्ये सहभागी होतो.
12 मला जरी अनेक गोष्टी तुम्हांला लिहायच्या आहेत तरी त्या तुम्हांला मी शाई व लेखणीने लिहू इच्छित नाही. तर त्याऐवजी तुम्हांला भेटावे व प्रत्यक्ष सर्व काही बोलावे अशी आशा मनात बाळगून आहे. म्हणजे आपला आनंद त्यामुळे परिपूर्ण होईल. 13 देवाने निवडून घेतलेल्या तुमच्या बहिणीची [c] मुले तुम्हांला सलाम सांगतात.
2006 by World Bible Translation Center