Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
निर्गम 17:1-7

17 सर्व इस्राएल लोक सीनच्या रानातून एकत्र प्रवास करत गेले, परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे ते ठिकठिकाणाहून प्रवास करत रफीदीम येथे गेले आणि त्यांनी तेथे तळ दिला; तेथे त्यांना प्यावयास पाणी नव्हते. तेव्हा इस्राएल लोक मोशेविरुद्ध उठले व त्याच्याशी भांडू लागले. ते म्हणाले, “आम्हाला प्यावयास पाणी दे.”

मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याविरुद्ध का उठला आहात? तुम्ही परमेश्वराची परीक्षा का पाहात आहात?”

परंतु लोक तहानेने कासावीस झाले होते म्हणून ते मोशेकडे कुरकुर करीतच राहिले; ते म्हणाले, “तू आम्हाला मिसर देशातून बाहेर का आणलेस? आमची मुलेबाळे, गुरेढोरे यांना पाण्यावाचून मारण्यासाठी तेथून आम्हाला तू येथे आणलेस काय?”

तेव्हा मोशे परमेश्वराकडे धावा करून म्हणाला, “मी ह्या लोकांना काय करु? ते मला ठार मारावयास उठले आहेत.”

परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांपुढे जा. त्यांच्यापैकी काही वडीलधारी म्हणजे पुढारी माणसे तुजबरोबर घे. नाईल नदीच्या पाण्यावर तू जी काठी आपटली होतीस ती तू तुझ्याबरोबर घे. होरेब डोंगरावरील एका खडकावर म्हणजे सिनाय डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन, त्या खडकावर ती आपट म्हणजे त्या खडकातून पाणी बाहेर येईल. मग लोकांनी ते प्यावे.”

मोशेने हे सर्व केले आणि इस्राएल लोकांच्या वडिलधाऱ्या माणसांनी म्हणजे पुढाऱ्यांनी ते पाहिले. मोशेने त्या ठिकाणाचे नांव मरीबा व मस्सा ठेवले; कारण या ठिकाणी इस्राएल लोकांनी परमेश्वराविरुद्ध बंड केले आणि त्यांनी त्याची परीक्षा पाहिली. परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे किंवा नाही हे त्यांना पाहावयाचे होते.

स्तोत्रसंहिता 95

95 चला, परमेश्वराची स्तुती करु या.
    जो खडक आपल्याला वाचवतो त्याचे गुणगान करु या.
परमेश्वराला धन्यावाद देणारी गाणे गाऊ या.
    त्याला आनंदी स्तुती गीते गाऊ या.
का? कारण परमेश्वर मोठा देव आहे,
    इतर “देवांवर” राज्य करणारा तो महान राजा आहे.
सगळ्यांत खोल दऱ्या आणि
    सर्वांत उंच पर्वत परमेश्वराचे आहेत.
महासागरही त्याचाच आहे-त्यानेच तो निर्मिर्ण केला.
    देवाने स्वःतच्या हाताने वाळवंट निर्माण केले.
चला, आपण त्याची वाकून उपासना करु या.
    ज्या देवाने आपल्याला निर्माण केले त्याची स्तुती करु या.
तो आपला देव आहे आणि आपण त्याची माणसे.
    आपण जर त्याचा आवाज ऐकला तर आपण त्याची मेंढरे होऊ.

देव म्हणतो, “तू मरिबात आणि मस्साच्या वाळवंटात
    जसा हटवादी होतास तसा होऊ नकोस.
तुझ्या पूर्वजांनी माझी परीक्षा पाहिली,
    त्यांनी माझी पारख केली आणि मी काय करु शकतो ते त्यांना दिसले.
10 मी त्या लोकांच्या बाबतीत चाळीस वर्षे सहनशील राहिलो
    आणि ते प्रमाणिक नव्हते हे मला माहीत आहे.
    त्या लोकांनी माझी शिकवण आचरणात आणायचे नाकारले.
11 म्हणून मी रागावलो आणि शपथ घेतली की
    ते माझ्या विसाव्याच्या जागेत प्रवेश करणार नाही.”

रोमकरांस 5:1-11

देवाशी नीतिमान

ज्याअर्थी विश्वासाने आपल्याला नीतिमान ठरविले आहे त्याअर्थी आपल्या विश्वासाचा परिणाम म्हणून आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे देवाकडून शांति मिळाली आहे. आता आपण ज्या कृपेमध्ये आहोत, त्यात त्याच्याद्धारे विश्वासाने आम्हीसुद्धा प्रवेश मिळविला आहे. आणि आम्ही देवाच्या गौरवाचे भागीदार होण्याच्या आशेने अभिमान बाळगतो. याशिवाय आम्ही संकटांतही अभिमान बाळगतो; कारण आम्हांस ठाऊक आहे की, या संकटांमुळे आम्हांला अधिक धीर येतो. आणि धीराने आम्ही कसोटीस उतरतो आणि कसोटीस उतरल्याने आशा उत्पन्र होते. आणि आशा लाजवित नाही. कारण आपणांस दिलेल्या पवित्र आत्म्याकडून आपल्या अंतःकरणात देवाची प्रीति ओतली आहे.

आम्ही जेव्हा आमचे स्वतःचे तारण करण्यासाठी अशक्त होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी आमच्यासाठी मरण पावला. आता नीतिमान मनुष्यासाठी सुध्दा कदाचित कोणी मरणार नाही. एखादा मनुष्य चांगला असेल तर त्याच्यासाठी मरण्याचे धाडस कदाचित कोणीतरी करील. परंतु आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. त्याद्वारे त्याने दाखवून दिले की, तो आमच्यावर फार प्रेम करतो.

तर मग आता आपण ख्रिस्ताच्या रक्ताने नीतिमान ठरलो आहोत, म्हणून ख्रिस्ताद्वारे देवाच्या रागापासून आपण वाचले जाणार आहोत. 10 आम्ही देवाचे शत्रू असताही त्याच्या पुत्राच्या मरणाद्वारे त्याने आमच्याशी समेट केला. त्यामुळे आता आम्ही देवाचे मित्र असल्यामुळे देव आम्हांला त्याच्या पुत्राच्या जीवनाद्वारे रक्षील. 11 इतकेच नव्हे तर ज्याच्याद्वारे आमचा देवाबरोबर समेट झाला त्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्हीसुद्धा देवाविषियी अभिमान बाळगतो.

योहान 4:5-42

शोमरोनातील सूखार नावाच्या गावात येशू आला. याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ हे गाव आहे. याकोबाची विहीर तेथे होती. लांबच्या प्रवासामुळे येशू थकला होता. म्हणून येशू विहीरीजवळ बसला. ती दुपारची वेळ होती. तेंव्हा पाणी नेण्यासाठी एक शोमरोनी [a] स्त्री त्या विहीरीवर आली. येशू तिला म्हणाला. “मला प्यावयास पाणी दे.” हे घडले तेव्हा येशूचे शिष्य अन्न विकत घेण्यासाठी गावात गेले होते.

ती शोमरोनी स्त्री म्हणाली, “तुम्ही यहूदी आहात आणि मी तर एक शोमरोनी स्त्री आहे. तुम्ही माझ्या हातून पाणी प्यावयास मागता याचे मला मोठे आश्चर्य वाटते.” (यहूदी लोकांचे शोमरोनी लोकांशी सलोख्याचे संबंध नव्हते. [b] )

10 येशूने उत्तर दिले, “देव काय दान देतो याविषयी तुला माहीत नाही आणि तुझ्या हातून पाणी मागणारा कोण हे देखील तुला माहीत नाही. तुला जर या गोष्टी माहीत असत्या तर तूच माझ्याकडे मागितले असतेस. आणि मी तुला जिवंत पाणी दिले असते.”

11 ती म्हणाली, “महाराज, जिवंत पाणी तुम्हांला कोठून मिळणार? विहीर तर फार खोल आहे. आणि पाणी काढण्यासाठी तुमच्याजवळ पोहरा वगैरे काही नाही. 12 आमचा पिता (पूर्वज) याकोब याच्यापेक्षाही तुम्ही मोठे आहात काय? याकोबानेच ही विहीर आम्हांला दिली. ते स्वतः या विहीरीचे पाणी पीत असत, शिवाय त्यांची मुले व गुरेढोरे याच विहीरीचे पाणी पीत असत.”

13 येशू म्हणाला, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल. 14 परंतु मी जे पाणी देतो ते पाणी जो पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. मी दिलेले पाणी त्याच्या अंतर्यामी जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखे होईल. त्या पाण्यामुळे त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल.”

15 ती स्त्री येशूला म्हणाली, महाराज, “ते पाणी मला द्या, म्हणजे मला पुन्हा तहान लागणार नाही. आणि पाणी आणण्यासाठी मला इकडे परत यावे लागणार नाही.”

16 येशूने तिला सांगितले. “जा, तुझ्या पतीला घेऊन इकडे ये!”

17 ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.”

येशू तिला म्हणाला, “हे तू बरोबर सांगितलेस की, तुला नवरा नाही. 18 खरे तर तुझे पाच पती झाले, आणि आता तू ज्याच्याबरोबर राहतेस तो तुझा पती नाही. तेव्हा तू मला सत्यच सांगितलेस.”

19 ती स्त्री म्हणाली, “महाराज, मला आता कळले की, तुम्ही एक संदेष्टा आहात. 20 आमचे वाडवडील या डोंगरावर उपासना करीत. परंतु तुम्ही यहूदी लोक म्हणता की, यरुशलेम हीच ती जागा आहे जेथे लोकांनी उपासना केली पाहीजे.”

21 येशू म्हणाला, “बाई, माझ्यावर विश्वास ठेव! अशी वेळ येत आहे की, आपल्या पित्याची (देवाची) उपासना करण्यासाठी यरुशलेमला अगर या डोंगरावर जाण्याची गरज पडणार नाही. 22 जे तुम्हांला समजत नाही त्याची तुम्ही शोमरोनी उपासना करता. आम्ही यहूदी लोक कशाची उपासना करतो हे आम्हांला चांगले कळते, कारण यहूदी लोकांकडूनच तारण येते. 23 असा काळ येत आहे की, खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपालना करतील. तशी वेळ आता आलेली आहे. आणि तशाच प्रकारचे उपासक पित्याला पाहिजेत. 24 देव आत्मा आहे. म्हणून त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे.”

25 ती स्त्री म्हणाली, “मशीहा येणार आहे हे मला माहीत आहे. मशीहा येईल तेव्हा तो आम्हांला प्रत्थेक गोष्ट समाजावून सांगेल.”

26 येशू म्हणाला, “ती व्यक्ति तुझ्याशी आता बोलत आहे. मीच तो मशीहा आहे.”

27 तेवढ्यात येशूचे शिष्य गावातून परत आले. येशू एका बाईशी बोलत आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. परंतु “तुम्हांला काय पाहिजे?” अगर “तुम्ही तिच्याशी का बोलत आहात?” असे त्यांच्यापैकी एकानेही विचारले नाही.

28 मग ती स्त्री आपली पाण्याची घागर तशीच विहिरीवर सोडून परत गावात गेली. तिने गावांतील लोकांना सांगितले, 29 “एका मनुष्याने मी आतापर्यंत जे काही केलेले आहे ते सर्व सांगितले. त्याला भेटायला चला. कदाचित तो ख्रिस्त असेल.” 30 मग लोक गावातून बाहेर पडले आणि येशूला भेटायला आले.

31 ती स्त्री गावात होती तेव्हा येशूचे शिष्य त्याला विनवणी करु लागले, “गुरुजी, दोन घास खाऊन घ्या!”

32 परंतु येशूने उत्तर दिले. “माझ्याजवळ खावयाला जे अन्न आहे त्याविषयी तुम्हांला काहीच माहिती नाही.”

33 म्हणून शिष्य एकमेकांना विचारु लागले, “येशूला कोणीतरी अगोदरच काही खावयास आणून दिले काय?”

34 येशू म्हणाला, “ज्याने मला पाठवीले त्याच्या ईच्छेप्रमाणे करणे हेच माझे अन्न! त्याने मला दिलेले काम पूर्ण करणे हेच माझे अन्न होय. 35 जेव्हा तुम्ही पेरणी करता तेव्हा तुम्ही नेहमी म्हणता, ‘पीक गोळा करायला अजून चार महिने आहेत.’ परंतु मी तुम्हांला सांगतो, तुम्ही तुमचे डोळे उघडा. लोकांकडे पाहा. पीक तयार असलेल्या शेतांसारखेच ते आहेत. 36 आताही पीक कापणाऱ्या मजुराला मजुरी दिली जात आहे, तो अनंतकाळासाठी पीक गोळा करीत आहे. म्हणून आता पेरणी करणारा कापणी करणारासह आनंदी आहे. 37 ‘एक पेरणी करतो तर दुसरा कापणी’ असे जे आपण म्हणतो ते किती खरे आहे. 38 ज्या पीकासाठी तुम्ही मेहनत केली नाही, त्याची कापणी करण्यासाठी मी तुम्हांस पाठविले. दुसऱ्या लोकांनी काम केले आणि त्यांनी केलेल्या श्रमाचा फायदा तुम्हांस मिळतो.”

39 त्या गावातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. त्या स्त्रीने येशूविषयी जे सांगितले त्यावरुन त्यांनी विश्वास ठेवला. तिने त्यांना सांगितले होते, “मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली.” 40 शोमरोनी लोक येशूकडे आले. त्यांनी येशूला त्यांच्याबरोबर राहण्याची विनंती केली. म्हणून येशू तेथे दोने दिवास राहिला. 41 आणखी पुष्कळ लोकांनी येशूच्या शिक्षणामुळे विश्वास ठेवला.

42 ते लोक त्या स्त्रीला म्हणाले, “पहिल्यांदा तू जे आम्हांला सांगितलेस त्यामुळे आम्ही येशूवर विश्वास ठेवला. परंतु आता आम्ही स्वतःच त्याचे बोलणे ऐकले त्यामुळे विश्वास ठेवतो. आता आम्हांला कळले की, खरोखर हाच मनुष्य जगाचे तारण करील.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center