Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
128 परमेश्वराचे सर्व भक्त सुखी आहेत.
ते देवाच्या इच्छे प्रमाणे जगतात.
2 तू ज्या गोष्टींसाठी काम करतोस
त्या गोष्टींचा तू उपभोग घेशील, तू आनंदी राहाशील आणि तुझ्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतील.
3 घरी तुझी बायको सुफलीत द्राक्षवेलीसारखी असेल.
मेजाभोवती तुझी मुले तू लावलेल्या जैतूनाच्या झाडांसारखी असतील.
4 परमेश्वर अशा रीतीने त्याच्या भक्तांना आशीर्वाद देईल.
5 परमेश्वर तुला सियोनवरुन आशीर्वाद देवो.
परमेश्वराच्या आशीर्वादाचा तू यरुशलेम मध्ये जन्मभर आनंद उपभोगावा अशी आशा करतो.
6 आणि तू तुझी नातवंडे पाही पर्यंत जगशील अशी मी आशा करतो.
इस्राएलमध्ये शांती नांदू दे.
22 म्हणून इस्राएलच्या लोकांना सांग की परमेश्वर, प्रभू पुढील गोष्टी सांगतो ‘इस्राएल लोकानो, तुम्ही जेथे जेथे गेलात, तेथे तेथे तुम्ही माझे पवित्र नाव बदनाम केलेत. हे थांबविण्यासाठी मी काहीतरी करीन. ते मी तुमच्यासाठी म्हणून करणार नाही, तर माझ्या पवित्र नावासाठी करीन. 23 मी त्या मोठ्या राष्ट्रांना दाखवून देईन की माझे नाव खरोखरच पवित्र आहे. तुम्ही त्या राष्ट्रांत माझ्या पवित्र नावाला कलंक लावलात. पण मी पवित्र आहे. हे मी तुम्हाला दाखवून देईन. मग त्या राष्ट्रांना, मी परमेश्वर असल्याचे, समजेल.’” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
24 देव म्हणाला, “मी तुम्हाला त्या राष्ट्रांतून बाहेर काढून एकत्र करीन आणि तुमच्या देशात तुम्हाला परत आणीन. 25 मग तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडून मी तुम्हाला शुद्ध करीन. तुमची घाण मी धुवून काढीन. त्या ओंगळ मूर्तीचीही घाण मी धुवून काढीन आणि तुम्हाला शुद्ध करीन.” 26 देव म्हणाला, “मी तुमच्यात नवीन आत्मा घालून नवे ह्दय बसवीन तुमचे दगडाचे ह्दय बदलून त्या जागी माणसाचे कोमल ह्दय बसवीन. 27 मी माझा आत्मा तुम्हाला देईन. मग तुम्ही बदलाल व माझे नियम पाळाल. काळजीपूर्वक माझ्या आज्ञा पाळाल. 28 मग तुम्ही, मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या, देशात राहाल. तुम्ही माझे व्हाल व मी तुमचा देव होईल.” 29 देव पुढे म्हणाला, “तसेच, मी तुमचे रक्षण करीन व तुम्हाला अपवित्र होऊ देणार नाही. मी पिकांना वाढायची आज्ञा देईन व तुमच्यावर उपासमारीची वेळ येऊ देणार नाही. 30 मी तुमच्या फळबागाचे आणि शेतांचे उत्पादन वाढवीन मग तुम्हाला कधीही परक्या देशात भुकेने व्याकूळ होऊन लज्जित व्हावे लागणार नाही. 31 तुम्ही केलेल्या वाईट गोष्टी तुम्हाला आठवतील. त्या गोष्टी चांगल्या नव्हत्या, हे तुम्हाला स्मरेल. मग तुम्ही केलेल्या पापाबद्दल आणि भयानक कृत्यांबद्दल स्वतःचाच तिरस्कार कराल.”
32 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “तुम्ही पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या असे मला वाटते. तुमच्या भल्याकरिता मी ह्या गोष्टी करीत नाही. मी माझ्या नावाकरिता त्या करीत आहे म्हणून इस्राएल लोकांनो, तुम्ही ज्या तऱ्हेने जगलात, त्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्ही ओशाळे झाले पाहिजे.”
व्यभिचार करताना पकडलेली स्त्री
53 नंतर ते सर्व यहूदी पुढारी आपापल्या घरी गेले.
8 येशू जैतुनाच्या डोंगरावर [a] निघून गेला. 2 दुसऱ्या दिवशी सकाळीच येशू परत मंदिरात गेला. सर्व लोक येशूकडे आले. येशू बसला आणि त्याने लोकांना शिक्षण दिले.
3 नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी एका स्त्रीला घेऊन तेथे आले. त्या स्त्रीला व्यभिचाराचे पाप करताना पकडले होते. या यहूदी लोकांनी त्या स्त्रीला बळजबरीने लोकांपुढे उभे केले. 4 ते येशूला म्हणाले, “गुरूजी, जो हिचा नवरा नाही, अशा माणसाशी व्यभिचार करताना ह्या स्त्रीला पकडले. 5 मोशेच्या नियमशस्त्रात अशी आज्ञा दिलेली आहे की, असे कर्म करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आम्ही धोंडमार करुन जिवे मारले पाहिजे. आम्ही काय करावे असे तुमचे मत आहे?”
6 येशूला पेचात पकडावे म्हणून यहूदी लोकांनी हा प्रश्न विचारला होता. काही तरी चुकीचे बोलताना येशूला धरावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणजे मग त्यांना येशूवर आरोप ठेवता आला असता. पण येशूने गुडघे टेकले व आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला. 7 यहूदी पुढारी येशूला प्रश्न विचारीतच राहिले, म्हणून येशू मान वर करुन त्यांच्याकडे पाहत म्हणाला, “ज्याने कधीच पाप केले नाही असा एकतरी मनुष्य येथे आहे काय? निष्पाप मनुष्य या स्त्रीवर पहिला दगड फेकू शकतो.” 8 मग येशूने पुन्हा गुडघे टेकले व जमिनीवर लिहू लागला.
9 येशूचे हे शब्द ज्या लोकांनी ऐकले, ते एक एक करुन निघून जाऊ लागले. जे वयस्कर होते ते अगोदर गेले. मग इतर लोक गेले. येशू एकटाच त्या स्त्रीसह तेथे राहिला होता. ती त्याच्यासमोर उभी होती. 10 येशूने पुन्हा वर पाहिले आणि तिला विचारले, “बाई, ते सर्व लोक निघून गेले आहेत, त्यातील एकानेही तुला दोषी ठरविले नाही काय?”
11 त्या स्त्रीने उत्तर दिले. “महाराज, मला कोणीही दोषी ठरविले नाही.”
मग येशू म्हणाला, “मग मीही तुझा न्याय करीत नाही. आता तू जाऊ शकतेस, पण परत पाप करु नकोस.”
(वचने 7:53 ते 8:11 अति जुन्या व उत्तम ग्रीक प्रतीमध्ये ही वचने नाहीत)
2006 by World Bible Translation Center