Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरांत जाण्याच्या वेळेचे स्तोत्र.
121 मी वर डोंगरांकडे बघतो.
पण माझी मदत खरोखर कुठून येणार आहे?
2 माझी मदत परमेश्वराकडून,
स्वर्ग व पृथ्वी यांच्या निर्मात्याकडून येणार आहे.
3 देव तुला खाली पडू देणार नाही.
तुझा पाठीराखा झोपी जाणार नाही.
4 इस्राएलचा पाठीराखा झोपाळू होत नाही.
देव कधीही झोपत नाही.
5 परमेश्वर तुझा पाठीराखा आहे
तो त्याच्या महान शक्तीने तुझे रक्षण करतो.
6 दिवसा सूर्य तुला दु:ख पोहोचवणार नाही.
आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही.
7 परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील.
परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील.
8 परमेश्वरा तुला जाण्या-येण्यात मदत करील.
परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील.
4 “माझ्या लोकांनो, माझे ऐका.
नियम माझ्यापासूनच पुढे सुरू होतील.
मी लोकांना प्रकाश ठरेल असा न्याय ठरवीन.
5 मी न्यायी आहे हे मी लवकरच दाखवीन.
मी लवकरच तुम्हाला वाचवीन.
मी माझ्या सामर्थ्याच्या बळावर सर्व राष्ट्रांचा न्यायनिवाडा करीन.
दूरदूरची ठिकाणे माझी वाट पाहत आहेत.
ते त्यांच्या मदतीसाठी माझ्या सामर्थ्याची वाट पाहत आहेत.
6 वर स्वर्गाकडे पाहा,
खाली पृथ्वीवर तुमच्या सभोवती पाहा.
धुक्याच्या ढगाप्रमाणे आकाश नाहीसे होईल.
पृथ्वी वृध्द् होईल.
पृथ्वीवरची माणसे मरतील,
पण माझे तारण अनंत कालापर्यंत चालू राहील.
माझ्या चांगुलपणाला अंत नाही.
7 ज्यांना चांगुलपणा म्हणजे काय ते कळते त्यांनी माझे ऐकावे.
माझ्या शिकवणुकीप्रमाणे वागणाऱ्यांनी मी काय सांगतो ते ऐकावे.
दुष्टांना घाबरू नका.
त्यांनी तुमची निंदा केली तरी भिऊ नका.
8 का? त्यांची अवस्था जुन्या वस्त्राप्रमाणे होईल.
कसर त्याना खाईल.
ते लाकडाप्रमाणे होतील.
वाळवी त्यांना खाईल.
पण माझा चांगुलपणा चिरंतन राहील.
माझे तारण अखंड चालू राहील.”
येशू एका नोकराला बरे करतो(A)
7 ज्या बोधकथा लोकांनी ऐकाव्यात असे त्याला वाटत होते त्या सांगण्याचे संपविल्यावर तो कफर्णहूमास गेला. 2 तेथे एक रोमी शताधिपती होता. त्याचा गुलाम इतका आजारी होता की, तो मरावयास टेकला होता. हा गुलाम त्या शताधिपतीचा फार आवडता होता. 3 जेव्हा शताधिपतीने येशूविषयी ऐकले तेव्हा त्याने काही यहूदी वडील जनांना त्याच्याकडे पाठविले, व अशी विनंति केली की, त्याने येऊन त्याच्या गुलामाला वाचवावे. 4 जेव्हा ते येशूकडे आले तेव्हा त्यांनी मनःपूर्वक विनंति केली, ते म्हणाले, “तू त्याच्यासाठी हे करावेस कारण तो त्या योग्यतेचा आहे. 5 कारण तो आमच्या लोकांवर प्रेम करतो, त्याने आमचे सभास्थान आम्हांला बाधून दिले.”
6 म्हणून येशू त्यांच्याबरोबर गेला. तो घरापासून दूर नव्हता, तोच शताधिपतीने मित्रांना असे सांगण्यासाठी पाठविले की, “प्रभु, आपण त्रास करुन घेऊ नका, कारण आपण माझ्या घरी यावे इतकी माझी योग्यता नाही. 7 यासाठी मी स्वतः आपणाकडे येऊ नये असा विचार केला होता. परंतु तुम्ही फक्त शब्द बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. 8 कारण मीही ताबेदार असून माझ्या अधिपत्याखाली शिपाई आहेत. मी एखाद्याला, ‘जा’ असे म्हणतो, आणि तो जातो, दुसऱ्याला ‘ये’ म्हणतो आणि तो येतो. मी माझ्या गुलामाला म्हणतो, ‘हे कर!’ आणि तो ते करतो.”
9 जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा त्याला त्याच्याविषयी (शताधिपतीविषयी) आश्चर्य वाटले. तो त्याच्यामागे येणाऱ्या जमावाकडे वळून म्हणाला, “मी तुम्हांला सांगतो, असा विश्वास मला इस्राएलात देखील आढळला नाही.”
10 ज्यांना पाठविले होते, ते घराकडे परतले, तेव्हा त्यांना आढळून आले की, तो सेवक बरा झाला आहे.
2006 by World Bible Translation Center